वाचाल तर वाचाल हे आपण सर्वांनीच लहानपणापासून ऐकलेलं असतं. ( World Book Day 2022 ) मात्र शाळा-कॉलेज सुटलं की अनेकींचं वाचन थांबतं. कारण किंवा सबब एकच सांगितली जाते, आता वेळच मिळत नाही. घरकामातून सवडच मिळत नाही, ऑफिसचं काम सांभाळून कधी वाचणार? मुलं लहान आहेत, ती कुठं वाचू देतात. मात्र वाचन आणि आपलं मानसिक स्वास्थ्य, मनावरचा ताण उतरणं, चिडचिड-एन्झायटी कमी होणं याचा संबंध असतो हे लक्षातच येत नाही. गार्डिअनमध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झालेला एक लेख म्हणतो की, पुरुष महिलांपेक्षा जास्त वाचतात. ( आता जगभर ते साहजिकच आहे, महिलांना जेवढी कामं असतात तेवढी जगभरात कुठल्याच पुरुषांना नसतात.) मात्र पुरुषांपेक्षा वाचनाची गरज महिलांना जास्त आहे आणि त्यांनी त्यासाठी वेळ काढायलाच हवा असं हा अभ्यास सांगतो. आता मुद्दा तसा वेळ काढता येतो का? तर इच्छा असेल तर काढता येतो, सध्या टीव्ही मालिकेत लोकप्रिय असलेल्या अरुंधती उर्फ मधुराणी प्रभूलकरने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट केली आहे. त्यात ती सांगते, वाचनासाठी ती कसा वेळ काढते. वाचलं नाही तर अस्वस्थ होतं, त्यामुळे जमेल तसं ती वाचते..
आता मुद्दा असा आहे, की तिला जमतं तर आपल्याला का नाही?
मानसिक ताण आणि रिलॅक्स होण्याचे मार्ग यासंदर्भात नॅशनल लायब्ररी मेडीसीननेही दिलेली माहितीही हेच सांगते. त्यांचं म्हणणं की वाढत्या वयातच नाही तर १४ ते २५ या वयात येण्याच्या, तरुण होण्याच्या काळात महिलांना येणाऱ्या डिप्रेशनचं प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट असतं. एकतर शरीरात होणारे हार्मेानल बदल, समाजासह कुटूंबाचे ताण, जबाबदाऱ्या, लग्नाचे प्रेशर ते मनासारखं आयुष्य जगण्याची ओढ, घरकाम यासाऱ्याचा ताण मुलींवर असतो. त्याकाळात त्यांनी आनंदी राहणं, स्वत:च्या आहाराकडे, व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं असतं. मात्र यासह त्यांच्या आनंदाचा आणि ताणाचा निचरा करण्याचं काम पुस्तकं जास्त चांगली करतात. वाचन असेल तर मनावरचा ताण कमी होतो.
त्यामुळे आजवरचे वाचन अभ्यास निरिक्षणं असं सांगतात की महिलांनी वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. त्यातून त्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम रहायला मदत होते.
(Image : Google)
महिलांनी का वाचलं पाहिजे?
१. गार्डिअनचा लेख सांगतो की महिलांना आपला आवाज बुलंद करायला वाचन बळ देते. आपण बोलणं, आपली मतं महत्त्वाची आहेत याचा आत्मविश्वास वाचनाने मिळतो.
२. वाचनाने सर्वांचाच जगाकडे-जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.
३. आपणही आपलं जगणं लिहिलं पाहिजे अशी ओढ काहीजणींना तरी वाटू शकते.
हे सारं नाही झालं तरी..
१. वाचनाने आपल्या कल्पनाशक्तीला बहर येतो.
२. अतिशय रिलॅक्स वाटतं, मनावरचा ताण हलका होतो.
३. अनेक कारणांमुळे आलेली अन्झायटी, अनेकदा येणारे पॅनिक अटॅक कमी होतात.
४. स्मरणशक्ती वाढते.
५. सगळ्यात महत्त्वाचं, वाचनानं एक नवीन जग फिरल्याचा, नवा अनुभव घेतल्याचा आनंद मिळतो.