Lokmat Sakhi >Mental Health > World Mental Health Day: आपला मेंदू ’इमोशनल हायजॅक’ तर झाला नाही? भावना सांभाळणं कसं शिकाल?

World Mental Health Day: आपला मेंदू ’इमोशनल हायजॅक’ तर झाला नाही? भावना सांभाळणं कसं शिकाल?

World Mental Health Day २०२२ : भावना हाताळता येणं, बॅलन्स सांभाळून भावनांचं नियमन  शिकणं हे आताच्या काळात महत्त्वाचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 04:11 PM2022-10-10T16:11:54+5:302022-10-10T16:15:00+5:30

World Mental Health Day २०२२ : भावना हाताळता येणं, बॅलन्स सांभाळून भावनांचं नियमन  शिकणं हे आताच्या काळात महत्त्वाचं आहे.

World Mental Health Day: Has our brain been 'emotionally hijacked'? How do you learn to manage your emotions? | World Mental Health Day: आपला मेंदू ’इमोशनल हायजॅक’ तर झाला नाही? भावना सांभाळणं कसं शिकाल?

World Mental Health Day: आपला मेंदू ’इमोशनल हायजॅक’ तर झाला नाही? भावना सांभाळणं कसं शिकाल?

Highlights आपल्या भावनांचं 'भयंकरीकरण किंवा क्षुल्लकीकरण' होऊ न देणं ही आपलीच जबाबदारी आहे. 

- रेणुका अशोकराव सरनाईक

'ढासळत जाणारं मानसिक आरोग्य' ही एकविसाव्या शतकातील संपूर्ण जगाला भेडसावणारी एक गंभीर समस्या झालेली आहे. आपल्या देशातील एकुण लोकसंख्येच्या ७ टक्के लोक, मानसिक आजाराच्या विळख्यात अडकलेली आहेत. दर चार कुटुंबांपैकी एका कुटुंबात कमीत कमी एक तरी व्यक्ती कमी-अधिक तीव्रतेने, 'व्यवहार विकार' (Behavioral Disorder) किंवा 'मानसिक विकाराने' (Mental Disorder) ग्रासलेली आढळते. दुर्दैवाने, जागरूकतेअभावी, यापैकी ९० टक्क्यांहूनही अधिक व्यक्ती उपचारहीन आयुष्यं जगताना दिसतात. आपल्या आजूबाजूला अनेकांच्या वागणुकीत होणारे नकारात्मक बदल आपण बघतो, नातेसंबंधातील वाढत जाणारी भावनिक कोंडी आपण अनुभवतो. १० ऑक्टोबर हा दिवस आपण 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणूनच साजरा करतो. मनाच्या आजारांविषयी जनजागृती व्हावी हेच या दिनाचे महत्त्व.

'भावनिकता' ही आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मुळातंच, भावना कुठलीही (सुखद किंवा दुःखद) असो, मनावरती उमटणारे त्या त्या भावनेचे तरंग जणु अटळच! वैद्यकीय शास्त्रात यंत्राच्या सहाय्याने देह जिवंत ठेवता येणारे अनेक उपचार आपण बघतो, परंतु सजीव असण्याची व खऱ्या अर्थाने जिवंत असण्याची जाणीव भावनाच आपल्याला करून देत असतात. वैयक्तिक स्वभाव कितीही निरनिराळे असोत परंतू आपली स्वप्नं, ध्येयं, व्यतीत केलेले क्षण, कामाच्या ठिकाणी मिळालेली कौतुकाची थाप, दुःखात मिळालेली साथ, प्रवासात लाभलेला सुसंवाद, नकळतपणे गरजूला आपल्या हातून घडलेली एखादी मदत, गर्दीमुळे जाणवणारी सुरक्षितता अशा रोज घडणाऱ्या कितीतरी प्रसंगात, भावनांचं आपल्या आयुष्यातील स्थान नाकारता येत नाही. पण मग भावनांच्या या विश्वात वावरताना आपण नुसतंच वावरतोय की खरंच 'कुशलतेने वावरतोय'? यावर विचार होणं आयुष्याचा लांबचा पल्ला गाठताना आपल्या हिताचं ठरू शकतं. केवळ 'मानसिक आजाराचा अभाव' म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या सुदृढ आहोत असं मुळीच नाही.
डॉक्टर प्लुटचिक ह्यांच्या मॉडेलनुसार, मानवी मनात साधारणपणे आठ मुलभूत भावना (आनंद, घृणा, राग, भीती, दुःख, आश्चर्य, अपेक्षा, स्वीकार) आणि इतर अनेक (34,000) भावनिक छटा निर्माण होऊ शकतात. यातील काहीशा नकारात्मक वाटणाऱ्या भावनांची (राग,भीती,निराशा) तीव्रता दैनंदिन व्यवहारात, जवळच्या नातेसंबंधात अडथळा निर्माण करायला लागलेली आहे असं दिसूनयेत असेल तर मात्र आपलं 'भावनिक नियमन' कमी पडत असण्याची शक्यता वाढीस लागते.

(Image : google)


भावनिक मेंदूचे काय?

मानवी मेंदूमधे दोन महत्वाचे भाग असतात. एक वैचारिक मेंदू व दुसरा भावनिक मेंदू. वैचारिक मेंदूमुळे, माणूस असंख्य शक्यतांवर विचार करू शकतो, परिणामांचा विचार करून निर्णय घेऊ शकतो तर भावनिक मेंदू, भावना व कृती ह्यांमधील संदेशवहनाचं काम करू शकत असतो. थॅलॅमस आणि अमिग्डाला हे भावनिक मेंदू चे दोन भाग. मेंदूकडे येणाऱ्या प्रत्येक संवेदनेमधील धोका ओळखण्याचं महत्वाचं काम थॅलॅमस करतो तर त्या संवेदनेनुसार भावना निर्मितीचं आणि त्यावरून पुढील वर्तन ठरविण्याचं काम अमिग्डाला करतो. भावनिक मेंदू चा वेग हा वैचारिक मेंदूच्या वेगापेक्षा 80,000 पटींनी अधिक असतो.
उदा. अचानक एखाद्या दिवशी कॉल वरून आपली अतिशय जवळची व्यक्ती अत्यवस्थ असल्याची बातमी आपल्याला कळली. आता ही संवेदना आपल्या थॅलॅमस वर जाऊन आदळते. थॅलॅमस ने पुर्णपणे धोका म्हणुन ही संवेदना जर ओळखली तर तीला वैचारिक मेंदूकडे न पाठविता भावनिक मेंदू कडे पाठविल्या जातं. साहजिकच भावनांचं मुख्यालय असलेल्या अमिग्डाला ह्या ठिकाणी भीती किंवा चिंता ह्या भावनांची निर्मिती होणारी भरपूर रसायनं स्त्रवल्या जातात आणि ती सर्व आपल्या वर्तनातून(रडु फुटणे, थरथर कापणे, सुन्न होणे, रक्तदाब वाढणे, इतरांवर चिडचिड होणे) दिसून यायला लागतात. आता हे सर्व काही सेकंद घडणं अर्थातच स्वाभाविक असु शकेल परंतु गरजेपेक्षा जास्त नकारात्मक भावनांची निर्मिती सातत्याने होऊन, ती संवेदना वैचारिक मेंदूकडे न जाता दिर्घकाळ तिचं संपूर्ण नियंत्रण भावनिक मेंदूच घेऊन टाकत असेल तर ह्याला 'इमोशनल हायजॅकींग' होणे असे म्हणतात. ह्यामुळे वेळीच योग्य विचार करायला जमून, त्या अत्यवस्थ व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करायला लागणाऱ्या विविध योग्य कृती आपल्या हातून न घडता उलट आपलंच मन ह्या इमोशनल हायजॅक ला बळी पडलेलं असु शकतं.
उत्तम भावनिक नियमन जमणाऱ्या व्यक्तीला, वैचारिक आणि भावनिक मेंदू ह्या दोहोंमधील समन्वय साधता येऊन अनुरूप कृती घडवून आणणं शक्य होत असतं. वरील उदाहरणात मुळातंच अनपेक्षित भयावह परिस्थिती होती. परंतू, सामान्य परिस्थितीत, व्यवहारिक आयुष्यातही, बऱ्याचदा पाठीशी अनुभव असलेल्या, शैक्षणिक पात्रता उत्तम असलेल्या व्यक्ती भावनिक नियमनात कमी पडताना दिसून येतात.

(Image : google)

करायचं काय?

१. मनात भावना निर्माण होणं जरीही आपल्या पुर्णपणे नियंत्रणात नसलं तरीही त्यांचा स्वीकार करून, विचारांमधील लवचिकता काहीशी वाढवून आपल्यातील एखादी मदत न करणारी भावना बळावू न देण्याचं कौशल्यं सरावाने, तज्ज्ञांची मदत घेऊन विकसित करता येणं आजही आपल्या हातात आहे.
२. एखादा मोठा आघात व्हावा, नातीगोती गृहीत धरल्या जाऊन त्यातील वीण उसविल्या जावी, संयमाचा अंत पाहणाऱ्या घटनांमागून घटना घडू द्याव्यात आणि मग कुठे मनाचा प्रवास जागरूकतेकडे वळविला जावा ही दुर्बुद्धी सुचण्याआधीच जाग यावी कारण ह्यात मोजावी लागणारी किंमत ही न परवडणारी असते.
३. आपल्या सर्वांमधे गुणदोष आहेत. भविष्यातही अनेक व्यक्ती, अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतील आणि जातीलही. ह्या ना त्या टप्प्यांवर माणसं चुकत राहतील. आपलं अस्तित्व अमान्य करणाऱ्या, अस्तित्वाला तडा जाणाऱ्या घटना ही कदाचित घडतील पण तरीही ह्या गुंतागुंतीच्या प्रसंगांमधे, आपण आपल्या भावनांचं 'भयंकरीकरण किंवा क्षुल्लकीकरण' होऊ न देणं ही आपलीच जबाबदारी आहे. 
४. या दोन्ही टोकांपासून स्वतःचा बचाव करायला शिकण्याची एक प्रामाणिक इच्छा बाळगणं गरजेचं आहे. मार्टिन ल्युथर किंग ह्यांचं वाक्य केवढं बळ देणारं आहे. ते म्हणतात, We must accept finite Disappointments but never lose infinite Hope.
५. असंख्य लहानमोठ्या समस्या सोडविण्यासाठी, स्वतःची स्वतःशी सुंदर मैत्री होण्यासाठी, प्रयत्नपूर्वक आनंदी नातेसंबंधांसाठी आणि साहजिकच पुढे एक 'संतुलित मन' असलेला, काळानुरुप बदलांचा स्वीकार करू शकणारा, सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी आस्थेची भावना ठेवून, स्वयंस्फुर्तीने, 'भावनिक बुद्धीमत्तेला' प्राथमिकता द्यायला शिकूया. ह्यासाठी भावनिक साक्षरतेविषयी जाणकारांची मदत घेऊन, माध्यमांचा योग्य वापर करून आधी स्वतःला डोळसपणे जागरूक करता येणं जमायला आणि शिकायला हवं.

(लेखिका सायकॉलॉजिस्ट आहेत.)

Web Title: World Mental Health Day: Has our brain been 'emotionally hijacked'? How do you learn to manage your emotions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.