सध्याच्या वातावरणात आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी सुरू असताना आनंदी राहणे ही सोपी गोष्ट थोडीच आहे. पण काही गोष्टींवर ठरवून लक्ष दिले तर तुम्ही हे नक्कीच साध्य करु शकता. इतरांना दाखवण्यासाठी किंवा बाह्य गोष्टींवर हा आनंद अवलंबून न ठेवता तो आतून असला तर दीर्घकाळ टीकणारा असतो. आपला आनंद हा स्वत:च्या आरोग्यासाठी जसा चांगला असतो तसाच आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या आसपासचे वातावरण आनंदी ठेवायचे असेल तर मूळात तुम्ही आनंदी असणे गरजेचे आहे. लॉ ऑफ अॅट्रॅक्शनच्या नियमानुसार आनंदी लोक आपसूकच आनंदाकडे खेचले जातात. आनंदी असण्याचे मनावर ज्याप्रमाणे परिणाम होतात त्याच प्रमाणे शरीरावरही होतात. हॉर्मोन्सचे संतुलन बिघडले तरीही त्याचा तुमच्या मनावर आणि भावनांवर परीणाम होऊ शकतो. शरीरातून आनंदी हॉर्मोन स्त्रवल्याने अनेक आजारांपासून तुमची सुटका होते. त्यामुळे तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर काही सोप्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात जेणेकरुन तुम्हाला त्याची निश्चितच मदत होईल.
१. आनंद ही तुमची निवड – आपल्यापैकी अनेकांना हे माहित नसते की आनंद ही आपल्या आत असणार गोष्ट आहे. पैसा, संपत्ती, नाती यांसारख्या बाह्य गोष्टींमधून आनंद मिळतो असे आपल्याला वाटते, पण तसे नसते. आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून तो तुमच्या आत असावा लागतो. ‘आनंद मिळवणे’ ही संकल्पना काहीशी चुकीची असून आनंदी असणे असे असायला हवे. याबाबत लॉ ऑफ ऑट्रॅक्शनचे प्राध्यापक अब्राहम हिक्स म्हणतात, आनंद हा शोधायचा नसतो तर कोणत्याही अटीशिवाय आनंदी असणे महत्त्वाचे आहे. आनंद ही तुमच्या मनाची अवस्था असून ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
२. तुम्ही आनंद निर्माण करु शकता – आपले विचार बदलणे हे आपल्या हातात असून त्यासाठी शिस्त आणि सवय आवश्यक असते. ज्यांच्या मन अस्थिर असते त्यांच्यासाठी आनंद निर्माण करणे हे आव्हान असते, त्यामुळे तुमचे मन स्थिर असल्यास त्याचा आनंदी राहण्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकतो. आनंदी राहणे ही एक कला असून ती तुम्ही वेळीच आत्मसात केल्यास तुमचे आयुष्य सुखकर होऊ शकते.
३. गोष्टी स्वत:ला लावून घेऊ नका – तुमच्या आजुबाजूला घडणारी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जास्त विचार केला आणि ती स्वत:ला लावून घेतली तर तुम्ही निराश व्हाल. पण काही मते, विचार हे तुमच्यासाठी नसतात. तेव्हा अशा गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवे. इतर लोक आपल्यबद्दल काय विचार करतात याकडे दुर्लक्ष केले तरच तुम्ही स्वत:ला आनंदी ठेऊ शकता. तुमच्या आयुष्यात थोडा तरी सेन्स ऑफ ह्युमर असायला हवा, त्यामुळे तुम्हाला आनंदी राहायला मदत होईल.
४. तुमच्या आनंदाची जबाबदारी घ्या – तुमचा आनंद हा इतर कोणावर अवलंबून नसून तो तुमच्यावर अवलंबून असतो हे समजून घ्या. तुमच्या भावनांवर तुमचेच नियंत्रण असते त्यामुळे त्या भावनांची जबाबदारी घ्या.
५. कायम परफेक्ट असण्याचा अट्टाहास नको – प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी यासाठी आपण अट्टाहास करतो. तसेच आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असे आपल्याला वाटते. पण तसे केल्याने आपण जीवनातला आनंद हरवून बसतो. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही दोष असतात. ते वेळीच ओळखून त्यांना मान्य करणे आणि त्यावर काम करणे गरजेचे असते. या दोषांमुळे दु:खी झालो तर आपण आनंदी राहू शकत नाही.
६. तुमच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या – तुम्ही दुसऱ्यांबद्दल कुचाळक्या करण्यात वेळ घालवला तर त्याचा तुमच्यावर निश्चितच परिणाम होतो. तसेच सतत नकारात्मक बातम्या बघणे, चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देणे यामुळे तुमचा आनंद तुम्ही हिरावून बसता. आपण काय करतो, काय बोलतो, काय पाहतो यावर आपले नियंत्रण असते त्यामुळे तुम्ही इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:कडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे.