सकाळी झोपेतून उठल्यापासून आपल्या डोक्यात घरातल्या कामांची, आपल्या कामांची, ऑफीसच्या कामांची यादी सुरु व्हायला लागते. एक झालं की एक असं अविरत सुरू असतं. आठवडे, महिने आणि वर्ष संपत असतात. कधी करीयरचा ताण तर कधी नातेसंबंधांचा, कधी मुलांचा तर कधी ऑफीसमधल्या राजकारणाचा अशा एकाहून एक गोष्टी आपल्या मेंदूवर येऊन आदळत असतात. या सगळ्या गोष्टींमुळे आपला मेंदू थकतो. अनेकदा त्याला एकावेळी असंख्य गोष्टींचा येणारा ताण असह्य होतो. मग आपण निराश राहतो किंवा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी कटकट करत राहतो. पण असे न होता आपला मेंदू आपल्याला कायम तरुण आणि ताजातवाना ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. मेंदूला चालना देण्यासाठी सतत काहीतरी नवं करत राहणं गरजेचं असतं, नाहीतर मेंदू थकून जातो. आता हे प्रयत्न म्हणजे नेमके काय? तर मेंदूला रिफ्रेश ठेवणाऱ्या काही गोष्टी आवर्जून करत राहणे...पाहूया या गोष्टी कोणत्या...
१. कला शिका
गायन, एखादे वाद्य किंवा अगदी चित्रकला या गोष्टी तुम्ही नव्याने शिकू शकता. कोणत्याही वयात असाल तरी मेंदू रिफ्रेश ठेवण्यासाठी एखादी तरी कला यायलाच हवी. इतकेच नाही तर तुम्ही यासाठी एखादा क्लास, अॅक्टीव्हिटी सेंटर नक्की लावू शकता. यामध्ये तुमचा वेळ तर छान जाईलच पण रोजच्या रुटीनमधून थोडे बाहेर येऊन तुम्ही स्वत:ला फ्रेश करु शकाल. लहानपणी किंवा अगदी तरुणपणी करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आता केल्याने नकळतच तुम्हाला फ्रेश आणि आनंदी वाटेल.
२. नृत्य किंवा एखादा खेळ
सध्या सर्व गटातील लोकांसाठी नृत्य, झुंबा किंवा एखाद्या खेळाचे क्लासेस असतात. कोणत्याही वयात तुम्ही या अॅक्टीव्हीटीज आपल्या क्षमतेप्रमाणे करु शकता. हालचाल होणाऱ्या अॅक्टीव्हीटी केल्याने शरीर तर मोकळे होतेच फण मेंदूलाही चालना मिळण्यास मदत होते. शरीराची हालचाल झाल्याने नकळत मेंदू फ्रेश होतो. इतकेच नाही तर अशा अॅक्टीव्हीटीमुळे आपला व्यायामही होतो.
३. उत्सुकता कायम ठेवा
लहान मुलं प्रत्येक गोष्टीबाबत कायम उत्सुक असतात. त्यामुळे ते फ्रेश आणि आनंदी असतात. एखादी गोष्ट अशी का असे प्रश्न या लहानग्यांना कायम पडत असतात. त्यामुळे त्यांना सतत नव्याचा ध्यास असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबाबत ते उत्सुक असतात. उत्सुक असायला तुम्ही तितके लहानच असायला हवे असे नाही. तर कोणत्याही वयात तुम्ही स्वत:मधील उत्सुकता कायम ठेऊ शकता. यामुळे तुमचा मेंदू नक्कीच आनंदी आणि ताजातवाना राहील.
४. नियमित व्यायाम
आपले शरीर आणि मन यांच्यात एकप्रकारचे अतूट असे नाते असते. त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या अॅक्टीव्ह राहीलात तर नकळत तुमचे मन आणि पर्यायाने मेंदू तरतरीत राहतो. याचप्रमाणे मेंदू आणि मन ताजेतवाने असेल तर शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमितपणे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण आवर्जून करायला हावा. त्याचा तुम्ही फ्रेश राहण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.