Lokmat Sakhi >Mental Health > आपल्याच वाट्याला सतत दु:ख का येतं? -कारण आपण नेहमी या ४ चुका करतो..

आपल्याच वाट्याला सतत दु:ख का येतं? -कारण आपण नेहमी या ४ चुका करतो..

विचार हे प्रभावी असतात. आणि जर ते अस्थिर झाले, विस्कळित झाले तर आपल्या विचार प्रक्रियांमधे अडथळे येतात . विचार प्रक्रिया चुकीच्या होतात आणि त्यामुळे भावना आणि वर्तनात विसंवाद निर्माण होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:49 PM2021-04-08T18:49:39+5:302021-04-09T13:43:36+5:30

विचार हे प्रभावी असतात. आणि जर ते अस्थिर झाले, विस्कळित झाले तर आपल्या विचार प्रक्रियांमधे अडथळे येतात . विचार प्रक्रिया चुकीच्या होतात आणि त्यामुळे भावना आणि वर्तनात विसंवाद निर्माण होतो.

Your thoughts make you sad or angry! The four mistakes in the thought process must be avoided! | आपल्याच वाट्याला सतत दु:ख का येतं? -कारण आपण नेहमी या ४ चुका करतो..

आपल्याच वाट्याला सतत दु:ख का येतं? -कारण आपण नेहमी या ४ चुका करतो..

Highlightsआपल्यापैकी अनेकजण आपण काळे पांढरे विचार करणारे आहोत याची जाणीव नसताना प्रसंगाचा, व्यक्तींचा टोकाचा विचार करत बसतात. त्याचा परिणाम त्यांच्या स्वत:वर, नातेसंबंधावर होतो.मेण्टल फिल्टरिंग या पध्दतीने विचार करणाऱ्यांची सवय असते की ते कोणत्याही प्रसंगातली फक्त नकारात्मक बाजूच बघतात. त्यातल्या सकारात्मक बाजूकडे ते पूर्ण दुर्लक्ष करतात.लेबलिंग करण्याची सवय. नावं ठेवण्याची वृत्ती. यामुळे आपल्या आणि इतरांच्य्या बाबतीत आपण त्या त्या प्रसंगापूरतं न पाहाता सरसकट विचार करुन मोकळे होतो.

-अनुराधा प्रभूदेसाई

तर्कशक्ती ही आनंदी होण्याची गुरुकिल्ली आहे- अल्बर्ट एलिस
कसं ते बघण्यासाठी समीर आणि विकीचं उदाहरण पाहू. हे दोघेही शाळेपासूनचे मित्र. पण आता वेगवेगळ्या शहरांमधे शिकत आहेत. एकदा उन्हाळ्याच्या सुटीत दोघेही एकाच वेळी एकाच शहरात होते. एका संध्याकाळी त्यांनी एकत्र सिनेमाला जायचं ठरवलं.
ठरलेल्या दिवशी, संध्याकाळी वेळेवर समीर चित्रपटगृहात पोहोचला. तो विकीची वाट पाहात राहिला. किती तरी वेळ वाट पाहात राहिला. .... पण विकी काही आला नाही. शेवटी समीरनं विकीला फोन केला. समीरचा फोन आल्यानंतर विकी उडालाच. त्याने समीरला आपण सिनेमा पाहायचा प्लॅन पूर्णत: विसरलो असल्याचं आणि आता चूलत भावंडांसोबत सहलीला आल्याचं सांगितलं.
समीरला अतिशय राग आला आणि तो खूप निराशही झाला. हा विकी माझ्याशी असा कसा वागू शकतो? असं कसं केलेलं प्रॉमिस विसरु शकतो? समीर त्या विकीशी कधीही न बोलायचं ठरवतो.
समीरला कशामुळे राग आला? का बरं त्याने विकीशी पुन्हा कधीच न बोलण्याचा निर्णय घेतला?
हे खरंतर समीरच्या विचारांनी केलं होतं. समीर जो विचार करत होता त्यामुळे तो चिडला आणि त्याने पुन्हा विकीशी कधीच बोलायचं नाही असं ठरवलं. हे फक्त समीरच्याच बाबत आहे असं नाही. तर सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे. आपले विचार हेच आपल्या भावनांना आणि वर्तनाला चालना देत असतात.


 समीरच्या मनातले विचार
विकीला आपण महत्त्वाचेच वाटत नाही. म्हणूनच तो आपल्या प्लॅनिंगबद्दल विसरला. मग अशा व्यक्तीसोबत मी कशाला राहू जो मला काही भावच देत नाही?
या अशा विचारांमुळे समीरला खूप राग आला आणि त्याने विकीशी कधीही न बोलायचं ठरवलं.
हे आहे आपल्या विचार भावना आणि कृतीमधलं कनेक्शन. वायरलेस कनेक्शन.
काय असतात विचार?
आपले विचार हे खूप महत्त्वाचे असतात. हे विचार म्हणजे आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग असतात जे आपल्याला  फिरवत असतात. जर हे स्टेअरिंगच एका सरळ रेषेत चालत नसेल तर आपला प्रवास हा धक्क्यांचा होईल हे नक्कीच आणि अशा परिस्थितीत आपला अपघातही होण्याची दाट शक्यता असते. आपण जर गाडीचं स्टेअरिंग स्थिर , एकाच रेषेत ठेवलं तर आपला पूर्ण प्रवास हा हळुवार आणि आरामदायी होईल.
विचार हे प्रभावी असतात. आणि जर ते अस्थिर झाले, विस्कळित झाले तर आपल्या विचार प्रक्रियांमधे अडथळे येतात . विचार प्रक्रिया चूकीच्या होतात आणि त्यामुळे भावना आणि वर्तनात विसंवाद निर्माण होतो.
विचार प्रक्रियेतल्या सर्वसामान्य चुका कोणत्या?
समीरचं उदाहरण हे केवळ अंदाज येण्यासाठी आहे. सर्वांच्याच बाबतीत विचार प्रक्रियेत या सर्वसामान्य चुका होतात.

 विचार प्रक्रियेतल्या चुका


१- काळे किंवा पाढरे विचार.
यालाच ब्लॅक ऑर व्हाइट थिकिंग एरर असं म्हणतात. दोन टोकाचे विचार. कोणत्याही प्रसंगाला फक्त काळी किंवा पांढरीच बाजू असणार. कोणत्याही प्रसंगात फक्त टोकाचाच विचार. काही मधला मार्ग नाहीच. काळ्या पांढऱ्या बाजूशिवाय परिस्थितीला वेगळी बाजू नसतेच असा विचार यात होतो. या टोकाच्या विचाराचा परिणाम म्हणून टोकाच्याच भावना निर्माण होतात आणि टोकाचीच कृती केली जाते.
आपल्यापैकी अनेकजण आपण काळे पांढरे विचार करणारे आहोत याची जाणीव नसताना प्रसंगाचा, व्यक्तींचा टोकाचा विचार करत बसतात. त्याचा परिणाम त्यांच्या स्वत:वर, नातेसंबंधावर होतो. ते स्वत:च्या आणि इतरांच्या बाबतीतही टोकाचे विचार करतात. त्यांच्यालेखी स्वत:ला किंवा इतरांना माफी नसतेच. समीरच्या लेखीही ती नव्हती. म्हणूनच तर त्याने विकीच्या या चूकीबद्दल त्याच्याशी कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला.


२- मानसिक गाळण करणारे विचार
मेण्टल फिल्टरिंग या पध्दतीने विचार करणायांची सवय असते की ते कोणत्याही प्रसंगातली फक्त नकारात्मक बाजूच बघतात. त्यातल्या सकारात्मक बाजूकडे ते पूर्ण दूर्लक्ष करतात. एक बोगदा सदृश्य दृष्टिकोन तयार करतात. त्यांच्यामते बोगद्यात काय फक्त अंधारच. या अशा विचारांमूळे त्यांच्यापर्यंत फक्त नकारात्मक माहितीच पोहोचते. आणि सकारात्मक बाबी सरळ गाळल्या जातात. ही विचार प्रक्रिया आपल्याला आणखीनच नकारात्मक करते. आपल्यात कडवटपणा निर्माण करते. या विचार प्रक्रियेमूळे आपल्यासमोर परिस्थितीचं पूर्ण चित्रं उभं राहातच नाही.


३- आपत्तीजनक विचार
या पद्धतीने विचार करणारे समस्या आहे त्यापेक्षा खूप मोठी करुन ठेवतात. त्यांच्यालेखी आयुष्यापेक्षाही ती समस्या मोठी होऊन जाते. समीरनं विकीच्या वागण्यावर जी प्रतिक्रिया दिली ती याच विचार प्रक्रियेचं उदाहरण आहे.

४- नावे ठेवणारे विचार
लेबलिंग करण्याची सवय. नावं ठेवण्याची वृत्ती. यामूळे आपल्या आणि इतरांच्य्या बाबतीत आपण त्या त्या प्रसंगापूरतं न पाहाता सरसकट विचार करुन मोकळे होतो, अमूक समूहातील व्यक्ती काय अशाच असतात अशी लेबलिंग करण्याची सवय या प्रकारच्या विचार करणाऱ्यांमधे असते. ते फक्त इत़रांनाच असं लेबलिंग करतात असं नाही तर स्वत:लाही असंच लेबल लावतात. एखादं काम नाही जमलं तर आपण काय अकार्यक्षमच आहोत असं ठरवून मोकळे होऊन जातात.
विचार प्रक्रियेतल्या या काही ठळक चुका आहेत. तर्कवादी विचार कसा करायचा याबाबत पुढील भागात.

( लेखिका मानसशास्त्रज्ञ, कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)
www.dishaforu.com
dishacounselingcenter@gmail.com

Web Title: Your thoughts make you sad or angry! The four mistakes in the thought process must be avoided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.