आपल्या मुलांना चांगली शिस्त आणि वळण असावं असं आपल्या प्रत्येकांना वाटतं. त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. मुलांना कळायला लागल्यापासून आपला त्यांना चांगली वळणं लावण्यासाठी अट्टाहास सुरू होतो. चारचौघात मुलांनी शहाण्यासारखं वागावं, त्यांना चांगल्या-वाईटातील फरक कळावा आणि पालक म्हणून मुलांनी आपलं नाव काढावं अशी आपली अपेक्षा असते. या प्रक्रियेत आई आणि वडील दोघांचाही तितकाच सहभाग असायला हवा. मुलांना वाढवणं आणि चांगल्या सवयी लावणं ही कोणा एकाची जबाबदारी नसून ती पालकांपैकी दोघांचीही जबाबदारी असायला हवी. पालक म्हणून दोघांनी मुलांना वाढवताना काही गोष्टींवर अवश्य चर्चा व्हायला हवी. आई आणि बाबांनी मुलांना वाढवण्याबाबत कोणत्या गोष्टींवर चर्चा करायला हवी ते समजून घेऊया (3 Parenting rules you should discuss with your partner)...
१. मुलांसमोर भांडू नका
पालकांनी मुलांसमोर आपसात भांडू नये हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम आहे. मुलांसमोर कधी ना कधी काहीतरी वादविवाद होणारच. त्यांना सतत यापासून पूर्णपणे लांब ठेवणे शक्य नाही. पण हे वादविवाद न राहता जेव्हा त्यांचे मोठ्या भांडणांत रुपांतर होते तेव्हा मुलांना या परिस्थितीत स्वत:ला सांभाळणे अवघड होते. कारण अनेकदा पालक भांडणांमध्ये आदळआपट, शिव्या देणे अशा गोष्टीही करतात. मुलं आपल्या पालकांकडे सतत पाहत असतात, तेव्हा त्यांच्यासमोर पालक म्हणून आपण असं वागणं अजिबात योग्य नाही हे वेळीच समजून घ्यायला हवं.
२. जोडीदार समोर नसताना त्याच्याविषयी चांगलं बोलायला हवं
जोडीदारांपैकी एक जण सोबत नसेल तेव्हा दुसऱ्याने समोर नसलेल्या जोडीदाराविषयी चांगले बोलायला हवे. असे केल्याने मुलांना आई आणि बाबा दोघांबद्दलही चांगल्या गोष्टी समजतील. नकळत ते दोघांनाही आदर द्यायला शिकतील. विशेष म्हणजे मुलांना तुम्ही दुसऱ्याचे कौतुक करत असल्याने नकळत तुमचेही कौतुक वाटेल.
३. मुलांसमोर एकमेकांना काऊंटर करु नका
अनेकदा पालक मुलांसमोर एकमेकांना काऊंटर करत असतात. मुलांबाबत एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्यासमोरच त्याबाबत चर्चा होते आणि एकमेकांना काऊंटर केले जाते. आईने मुलाला एखादी गोष्ट करु नको सांगितलं तर बाबांनीही त्या गोष्टीला सपोर्ट करायला हवा. मुलांच्या गोष्टींबाबत आई आणि वडिलांमध्ये एकमत असायला हवे. अन्यथा मुलं परिस्थितीचा फायदा घेण्याचीच शक्यता जास्त असते.