Join us  

मुलं भयंकर चिडतात-आरडाओरडा करतात, अजिबात ऐकत नाहीत...3 टिप्स, मुलांना वाढवताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 2:19 PM

3 Steps If Your Child Is Acting Stubborn Parenting Tips : मुलांचे वागणे काही प्रमाणात का होईना नियंत्रणात येईल आणि परिस्थिती सुधारण्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल.

लहान मुलांना वाढवणं हा एक शिक्षणाचा भाग असतो. आई-वडील म्हणून त्यांची जबाबदारी घेताना कदाचित आपण इतका पुढचा विचार केलेला नसतो. पण मुलांना जशी समज यायला लागते तसा त्यांचा हट्टीपणा वाढायला लागतो. मुलांना समज आली की त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हव्या असतात. अनेकदा एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर ते खूप चिडतात, आरडाओरडी करतात. प्रसंगी रडारड आणि आदळआपटही केली जाते. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असं नाही. मात्र मुलांनी खूप चिडचिड आणि आरडाओरडा करणे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते (3 Steps If Your Child Is Acting Stubborn). 

काही वेळा मुलांचे पेशन्स लवकर संपतात आणि मग त्यांना सहन झाले नाही की ते अग्रेसिव्ह होतात. अशावेळी पालकांनी त्यांच्यावर न चिडता, न ओरडता डील करायला हवं. मुलांना आणि स्वत:ला अशा परिस्थितीत शांत करण्यासाठी नेमकं काय करता येईल. मुलं खूपच हट्टीपणा करायला लागली तर त्यांच्याशी कसं डील करायचं अशा गोष्टींबाबत आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स समजून घेणार आहोत. त्यामुळे मुलांचे वागणे काही प्रमाणात का होईना नियंत्रणात येईल आणि परिस्थिती सुधारण्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. 

मुलं अशी का वागतात?

लहान मुलांनी असं वागणं अगदीच सामान्य आहे. कारण इतक्या लहान वयात ते त्यांच्या भावना व्यक्त करु शकत नसल्याने ते या पद्धतींचा अवलंब करतात. त्यामुळे मूल असे वागत असेल तर ती आपली चूक आहे असे न समजता सगळीच मुले अशी वागतात हे समजून घ्यायला हवे. 

उपाय काय करावेत? 

१. शांत राहणे

आपण शांत राहतो तेव्हा आपल्या मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्स आपोआप शांत राहण्यास मदत होते. असे झाल्याने मूलाचा त्रागा, आरडाओरडा कमी होऊन ते नकळत शांत होतात. यामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात येण्यास उपयोग होतो.

२. मुलांची फिजिकल सिच्युएशन बदलणे

मुलं खूप चिडचिड आणि आरडाओरडा करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीच्या शारीरिक गोष्टींमध्ये गुंतवावे. यामध्ये धावणे, उड्या मारणे, सायकलवर राऊंड मारुन येणे किंवा आणखी काहीही करता येऊ शकते. अशा शारीरिक हालचालींमध्ये त्यांना एंगेज केल्यास याचा नक्कीच फायदा होतो. 

३. मुलांकडून जे करुन घ्यायचे ते शांतपणे घ्या

मुलांची फिजिकल अॅक्टीव्हीटी झाली की त्यांचे लक्ष आधीच्या गोष्टीपासून विचलित होण्यास मदत होईल. त्यामुळे ही अॅक्टीव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला मुलांकडून जे करुन घ्यायचे आहे ते करुन घ्या. अशावेळी नकळत तुम्हाला मुलांकडून अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळेल. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं