Join us  

लेकरांवर कितीही प्रेम असलं तरी आईनं करायलाच हव्यात ३ गोष्टी-मुलांच्या विकासासाठीही आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2023 9:48 AM

3 Things that every Mother Should Do for Child : मुलांच्या वाढीत आईची भूमिका महत्त्वाची असल्याने आईने काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते.

प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी सतत काही ना काही करत असतात. मुलांचा विकास व्हावा, मोठं झाल्यावर त्यांनी नाव कमवावं, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक क्षणोक्षणी प्रयत्न करत असतात. असे असले तरी नेमके काय करायला हवे हे पालकांना अनेकदा कळत नाही. मुलांची जन्मापासून आईशी नाळ जुळलेली असल्याने आणि एकूणच मुलांच्या वाढीत आईची भूमिका महत्त्वाची असल्याने आईने काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. प्रसिद्ध समुपदेशक रिद्धि देवरा आईने मुलांच्या निकोप वाढीसाठी करायला हव्यात अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. याचा मुलांच्या वाढीत चांगला फायदा होणार असून यासाठी नेमके काय करायला हवे हे समजून घ्यायला हवे (3 Things that every Mother Should Do for Child). 

१. स्वीकार

आपले मूल जसे आहे तसे त्याला स्वीकारणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला मूल कसे हवे आहे त्यानुसार त्याला बदलणे एका प्रमाणाबाहेर शक्य नाही. अनेकदा पालक मुलांवर काही गोष्टी इतक्या जास्त प्रमाणात लादतात की मुलांचे जगणे अवघड होऊन जाते. असे न करता मुलं जशी आहेत तसा त्यांचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. 

२. मुलांच्या पलीकडे आयुष्य असूदे 

अनेकदा लग्नानंतर मूल झाले की विशेषत: महिलांचे आयुष्य त्यांच्या मुलाभोवतीच फिरते. हे जरी स्वाभाविक असले तरी मुलांच्या आयुष्याच्या पलीकडे आपल्याला आपलेही काहीतरी आयुष्य असायला हवे हे लक्षात ठेवा. मुलांच्या पलीकडे आपले छंद, मित्रमंडळी आपल्या आवडीनिवडी यांना प्राधान्य द्यायला हवे. 

३. मुलांच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करु नका

आपलं मूल आपलं असलं आणि लहान असेपर्यंत त्याच्यावर आपला अधिकार असला तरी मुलांचे आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करु नका. मुलं जशी मोठी होत जातात तशी त्यांना त्यांची मते, त्यांचे विचार, आवडीनिवडी असतात. त्यामुळे एका मर्यादेपलिकडे मुलांचे आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करु नका. सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींकडे मात्र आवर्जून योग्य तसे लक्ष द्या. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं