लहान मुलांना सांभाळणं हा एक मोठा टास्क असतो. त्यांच्या कलानी घेत, प्रेमाने समजावून सांगत त्यांच्याशी डील करावं लागतं. जसं वय वाढतं तशी त्यांची समज आणि दंगा वाढत जातो. मग त्यांचे खाण्या-पिण्याकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागते आणि त्यांना सतत नुसते खेळायचे असते. कधी कधी एक तर एकच गोष्ट करायची असते. आपल्याला मात्र घरातली कामं, ऑफीस आणि त्यांचे रुटीन असे सगळे सांभाळताना नाकात दम येतो (3 Things Which Parents Do not Do when Child is Showing Tantrums).
बरेचदा आपण त्यांच्या कलानी घेतोही. पण मग आपणच खूप थकलेले किंवा वैतागलेले असू तर मात्र आपल्या अंगात त्यांना समजावण्याची शक्ती नसते. अशावेळी आपलाही पारा वाढतो आणि मग ते नखरे करायला लागले की आपण वैतागतो, त्यांना ओरडतो प्रसंगी हातही उचलतो. पण अशामुळे त्यांचे नखरे कमी होण्याऐवजी ते जास्त हट्टीपणा करतात. म्हणूनच मुलं जास्त नखरे करत असतील, अजिबात ऐकत नसतील तर पालकांनी काय टाळायला हवं याविषयी प्रसिद्ध समुपदेशक प्रिती काही महत्त्वाचे सल्ले देतात. कोणत्या ३ गोष्टी पालकांनी करु नयेत याविषयी त्या अतिशय नेमकेपणाने सांगतात, काय आहेत या टिप्स पाहूया...
१. ओरडणे, किंचाळणे, मारणे टाळा
मुलं दंगा, हट्ट करत असतील तर त्यांच्यावर ओरडणे, मारणे अजिबात योग्य नाही. कारण अशावेळी मूल भावनिक आंदोलनातून जात असते. एखादी गोष्ट त्यांना हवी असते, ज्याला पालक म्हणून आपण नाही म्हणत असतो. त्यामुळे मुलांच्या मनात आधीच खूप केऑस सुरू असतो. त्यात आपण ओरडलो, किंचाळलो तर त्यांच्या डोक्यातला गोंधळ आणखी वाढतो. त्यामुळे कोणालाच फायदा होणार नसतो. त्यामुळे असे करणे टाळा.
२. दुसरीकडे निघून जाऊ नका
अनेकदा मुलं आरडाओरडा, दंग करत असतील आणि एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करत असतील तर काही पालक आवाजाला किंवा त्यांच्या रडण्याला वैतागून दुसऱ्या खोलीत निघून जातात. असे केल्याने त्यांचा आरडाओरडा आणि रडणे आणखी वाढते. त्यापेक्षा मुलांना समजावून सांगायला हवे. त्यांना जवळ घेऊन प्रेमाने समजवायला हवे. त्यामुळे त्यांच्या भावना नेमक्या पद्धतीने सांभाळल्या जातात. सहानुभूती दाखवली तर ते लवकर शांत होतात नाहीतर हा दंगा आणखी वाढत जातो.
३. लॉजिक समजावू नका
आपण अनेकदा मुलांना ते हट्ट करत असताना, दंगा करत असताना लॉजिकल काहीतरी सांगायला जातो. एखादी गोष्ट त्यांच्यासाठी का फायद्याची नाही, त्यामुळे काय तोटा होईल हे समजावण्याचा प्रयत्न करतो. पण हट्टीपणा करत असताना किंवा रडत, ओरडत असताना मुलं हे सगळे लॉजिक ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नसतात. त्यामुळे असे काही सांगून आपली एनर्जी घालवण्यापेक्षा ते शांत झाल्यावर काही तासांनी त्यांना आपण अमुक गोष्टीसाठी का नाही म्हणत होतो हे समजून सांगायला हवे.