Join us  

मुलांना वाढवताना ३ गोष्टी करता की टाळता? पालक म्हणून तुम्ही नक्की कसे वागता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 1:56 PM

Parenting Tips : डाएट एक्सपर्ट ऋजुता दिवेकर यांनी पालकांना ३ सल्ले दिले आहेत. अर्थात ते काही पालकांना पटले तर ऑनलाइन अनेक पालकांनी त्यावर टीकाही केली आहे. बघा त्यांनी सांगितलेल्या ३ गोष्टी तुम्ही करताय का?

ठळक मुद्देपालक या गोष्टी मुलांसाठी करत असतील तर ते मुलांना चांगल्या घरात वाढवतात हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. पालकत्व ही एक महत्त्वाची जबाबदारी असून ती योग्य पद्धतीने निभावायला हवी

मुलांना जन्माला घालणं एकवेळ सोपं असेल पण त्यांना वाढवणं वाटतं तेवढं सोपं काम नक्कीच नाही. मुलांचं उत्तम संगोपन करत त्यांना चांगल्या सवयी लावणे, चांगले-वाईट शिकवणे, उत्तम शिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक, बौद्धिक, मानसिकरित्या सक्षम करणे ही एक मोठी पालकत्वाची मोठीच जबाबदारीची गोष्ट आहे. नव्या पालकत्वात मुलांशी असलेला संवाद महत्त्वाचा ठरतो. आहार तज्ज्ञ  ऋजुता दिवेकर यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी पालकांना विचारलं आहे की मुलांना शिस्त लावणं आणि बालसंगोपन यासाठी तुम्ही ३ गोष्टी करता, आणि त्यामुळे तुमची मुलं तुमच्यावर चिडतात ाका? तसं असेल तर तुम्ही चांगले पालक आहात. (Parenting Tips) .

(Image : Google)

हे सगळे खरे असले तरी लाड कोणत्या बाबतीत करायचे आणि शिस्त कोणत्या बाबतीत लावायची हे पालक म्हणून आपल्याला समजायला हवे. मूल मागे लागते, हट्ट करते किंवा रडून गोंधळ करते म्हणून त्यांचे ऐकणे योग्य की त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शिस्तीने वागायला लावणे योग्य हा निर्णय वेळोवेळी पालकांनी घ्यायचा असतो. आपण मुलांना योग्य पद्धतीने सांभाळतो की नाही. योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतो की नाही यावर आपले पालकत्त्व बरोबर आहे की चूक हे ठरते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी मुलं कोणत्या ३ गोष्टींबाबत सतत तक्रार करतात हे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलं ही तक्रार करत असतील तर ते चांगलं आहे, कारण आपण पालकत्वाची भूमिका योग्य पद्धतीने निभावत असल्याची ती पोचपावती आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

१. खाण्यासाठी कमीत कमी पर्याय देणे 

अनेकदा मुलं अमुक भाजी आवडत नाही पोळीसोबत दुसरं काहीतरी दे, पोळी - भाजी खाणार नाही, त्याऐवजी तमुक दे अशी मागणी पालकांकडे करतात. अशावेळी मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्यांनी असेल ती पोळी-भाजी किंवा घरात केलेले पदार्थ खाणे आवश्यक असते. त्यामुळे मुलांना जेवणासाठी पर्याय देणे योग्य नाही. एखादवेळी बाहेर गेल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांचे खाण्याचे हट्ट पुरवणे ठिक आहे. पण एरवी त्यांनी घरात केलेले पौष्टीक खायला हवे.

२. आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज अॅक्सेस नसणे 

हल्ली मुले लहानपणापासूनच सतत टीव्ही, मोबाइल, टॅब, लॅपटॉप या गोष्टींचा सतत आणि जास्त प्रमाणात वापर करतात. या उपकरणांच्या जास्त वापराने मुलांच्या मेंदूवर, शरीरावर आणि मानसिकतेवर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे मुले या उपकरणांपासून जितके दूर राहतील तितके चांगले. त्यामुळे मुलांसमोर आपणही कमीत कमी स्क्रीन वापरणे आणि मुलेही त्यापासून दूर राहतील असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

३. उशीरा झोपून उशीरा उठायला परवानगी नसणे 

अनेकदा मुले आई आपल्याला रात्री लवकर झोपायला लावते आणि सकाळी लवकर उठवते म्हणून तक्रार करताना दिसतात. मात्र आरोग्यासाठी आणि मेंदूची चांगली वाढ व्हावी यासाठी ही सवय अतिशय चांगली आहे हे लक्षात घ्यायला हवे. रात्री उशीरा झोपून सकाळी उशीरा उठणे चांगली सवय नाही. पालक या गोष्टी मुलांसाठी करत असतील तर ते मुलांना चांगल्या घरात वाढवतात हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

अर्थात अनेक पालकांनी हे फार सुलभीकरण झालं असं म्हणत मुलांच्या झोपेच्या संदर्भात हे काही आक्षेपही नोंदवले. पालकांना सरसकट सल्ले आणि सोपं करणं सगळं हे काही खरं नाही असंही काही पालकांनी त्यांच्या पोस्टवर टिका करत म्हंटलं आहे.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं