स्मार्टफोन हा आपल्या हातातील ताईत असतो त्याचप्रमाणे हल्ली तो लहान मुलांच्या गळ्यातीलही ताईत असतो. हल्ली कधी गरज म्हणून किंवा कधी व्यसन म्हणून लहान मुलं सतत मोबाइलला चिकटलेली दिसतात. यावर त्यांना भुलवणाऱ्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध असल्याने आणि पालकही आपली सोय म्हणून मुलांना हातात मोबाइल देत असल्याने त्याची सवय आणि व्यसन कधी, कसे लागते आपल्यालाही कळत नाही. एकदा मोबाइलची सवय लागली की ती शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी, घातक असते. यामुळे लठ्ठपणा, डोळ्यांच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन अशा तक्रारी तर उद्भवतातच पण मुलांच्या मानसिकतेवरही याचा वाईट परीणाम होतो. मुलांची मोबाइलची सवय कशी मोडायची हा पालकांसाठी यक्षप्रश्न असतो. कारण यामुळे मुलांना अभ्यास, खेळ, एकमेकांशी संवाद साधणे, इतर कला असा कोणत्याच गोष्टी सुचत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विकासात अडथळा ठरणारे हे मोबाइलचे व्यसन वेळीच दूर करायला हवे. यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी (3 Ways to Break Smartphone Addiction In Children)...
१. मोबाइलचे दुष्परिणाम मुलांना समजावून सांगा
मोबाइल जास्त प्रमाणात वापरणे योग्य नसते हे माहित असल्याने मुलांना त्यापासून दूर करण्यासाठी आपण त्यांना ओरडतो, मारतो, शिक्षा करतो. मात्र असे करण्यापेक्षा मुलांना शांतपणे मोबाइलच्या वापराचे दुष्परिणाम त्यांच्या भाषेत समजावून सांगा. दिवसातील ठराविक वेळ ठरवून देऊन त्याच वेळेला ते मोबाइल पाहतील असे बघा.
२. शारीरिक हालचाली वाढतील असे पाहा
मुले जेव्हा शारीरिकरित्या दमतात तेव्हा त्यांचा मेंदू आपोआप तल्लख होतो. इतकेच नाही तर मुलांची भूक, पचन, शारीरिक मानसिक वाढ सगळेच चांगले होते. पण हेच जर मूल सतत मोबाइल किंवा स्क्रीनसमोर असेल तर विकास खुंटतो. त्यामुळे मुले घरात, मैदानावर, राहतो त्या ठिकाणी भरपूर खेळतील असे बघा. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम नकळत कमी होईल.
३. झोपताना खोली मोबाइल फ्री राहील असे पाहा
मुलांचा किंवा आपला फोन झोपताना बेडरुममध्ये राहणार नाही याची काळजी घ्या. एकदा आपण झोपताना फोन जवळ घेतला की नकळत आपण त्यावर काही ना काही करत राहतो आणि त्यामुळे झोप तर जातेच पण विनाकारण फोन बघत राहायचा चाळा लागतो. त्यामुळे आपला आणि मुलांचा मोबाइल झोपायच्या वेळेला आवर्जून खोलीच्या बाहेर राहील असे पाहावे.