Join us  

मुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतात? मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचे ३ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2023 5:13 PM

3 Ways to Control your Child's Screen time : स्क्रीनचे वेड इतके वाईट असते की ते एकदा लागले की त्याचे अक्षरश: व्यसन लागते.

मोबाइल किंवा टीव्ही पाहणे हे लहान मुलांसाठी अतिशय आवडीचे काम असते.  मोठ्यांच्याच हातात सतत मोबाइल असल्याने लहान मुलांनाही कमी वयापासूनच या मोबाइलचे आकर्षण असते. कधी गाणी बघण्याच्या नादाने तर कधी आई-वडीलांच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहात मुलं मोबाइलचा वापर करतात. सुरुवातीला गंमत म्हणून मोबाइल पाहणारी मुलं काही काळाने सतत स्क्रीनचा हट्ट करतात. अशावेळी मुलं काही केल्या ऐकत नाहीत आणि तासनतास स्क्रीनसमोर असतात. स्क्रीनचे वेड इतके वाईट असते की ते एकदा लागले की त्याचे अक्षरश: व्यसन लागते. 

मग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहणे, कार्टून पाहणे, गेम्स खेळणे अशा एक ना अनेक गोष्टी मुलं मोबाईल किंवा टीव्हीवर करत राहतात. मुलांच्या हातातला मोबाइल कसा सोडवायचा असा प्रश्न या पालकांना पडलेला दिसतो. आता मुलांच्या हातातला मोबाइल सोडवायचा म्हणजे ओरडून, मारुन किंवा त्रागा करुन उपयोग नाही. तर हा विषय शांतपणे, योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज असते. आजकाल मुलं खाण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींसाठी पालकांना स्क्रीन दाखवण्याची डीमांड करतात आणि एकप्रकारे ब्लॅकमेल करतात. पॅरेंटींग विथ ब्रेनिफाय या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रसिद्ध समुपदेशक याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. त्या कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)

१. मुलं आजुबाजूला असताना स्क्रीनचा वापर टाळा

मुलं आपल्या आजुबाजूला असतील तेव्हा शक्यतो स्क्रीनचा वापर करु नका. कारण मुलं आपल्याला फॉलो करतात, आपण जे करु ते पाहूनच ते शिकत असतात. त्यामुळे मुलांसमोर आपण कमीत कमी प्रमाणात टीव्ही, मोबाइल किंवा लॅपटॉप पाहायला हवा. 

२. सवय मोडण्यासाठी थोडं कठोर व्हावं लागेल

आपण मुलांना स्क्रीन पाहायला जर नाही म्हणत असलो तर ते स्ट्रीक्टली नाही असते हे लक्षात ठेवा. आपल्या पालकांनीही आपल्याला लहानपणी केबलच्या बाबतीत असेच केले होते. आपण केबल पाहू नये म्हणून वर्षभर घरातील केबल बंद असायची आणि फक्त उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत केबल सुरू केली जायची. 

३. इतर पर्याय द्यायला हवेत

अनेकदा मुलं टीव्ही किंवा मोबाइलसाठी खूप मागे लागतात, आपण नकार दिला तर ते अॅग्रेसिव्ह होतात. प्रसंगी आदळआपट करतात. अशावेळी त्यांना स्क्रीनशिवाय पुस्तकं, खेळणी किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये गुंतवायला हवे. एकदा त्यांचे लक्ष विचलित झाले की ते स्क्रीन विसरतात आणि इतर गोष्टींमध्ये गुंतून जातात. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल