सकाळ ही लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाची वेळ असते. रात्री चांगली झोप झाल्याने सकाळी ते एकदम फ्रेश असतात. अशावेळी त्यांचे डोके आणि मन पूर्ण शांत झाल्याने आपण जे सांगू ते त्यांच्या अतिशय चांगले लक्षात राहते. त्यांचा मेंदू यावेळी अतिशय वेगाने चालत असल्याने आपण जे काही करतो त्याची त्यांच्या मेंदूत परफेक्ट नोंद होते. पण पालक म्हणून आपण मात्र सकाळी खूप घाईत असतो. एकीकडे घरातली कामं, ऑफीसला जायची घाई, स्वयंपाक, दिवसभराचे नियोजन अशा अनेक गोष्टी करायच्या असल्याने आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण मुलांचा चांगला विकास व्हावा यासाठी सकाळच्या घाईतही मुलांसोबत आवर्जून करायला हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (4 must do things with your child in the morning)...
१. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना सांगा
सकाळी उठल्या उठल्या मुलांना जवळ घेणे, त्यांची पापी घेणे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे सांगणे अतिशय गरजेचे असते. यामुळे मुलांना सुरक्षित वाटेल आणि दिवसभर विविध गोष्टी शिकण्यासाठी त्यांना याची चांगली मदत होईल.
२. सकारात्मक बोला
आपली मुलं किती चांगली आहेत, हुशार आहेत अशाप्रकारची सकारात्मक वाक्य सकाळी सकाळी त्यांच्याशी आवर्जून बोलायला हवीत. पूर्ण दिवसभरात त्यांचे कौतुक होईल की नाही माहित नाही. पण तुम्ही सकाळी त्यांचे कौतुक केलेत तर त्यांचा आत्मविश्वास आणि एनर्जी वाढण्यासाठी याची चांगली मदत होईल.
३. मुलांना त्यांचा दिवसभराचा प्लॅन सांगा किंवा विचारा
मुलं दररोज नेमके काय करणार आहेत याबाबत त्यांना सकाळीच पुरेशी कल्पना द्या. दिवसभराचे नियोजन आधीच माहिती असल्याने प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या मनाची पुरेशी तयारी झालेली असेल.
४. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात ते सांगा आणि त्यांनाही विचारा
आपल्याला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवाचे किंवा आणखी कोणाचे कृतज्ञ आहोत हे मुलांपर्यंत पोहोचू द्या. इतकेच नाही तर मुलांनाही त्यांना आयुष्यात जे मिळत आहे त्यासाठी कृतज्ञ राहायला सांगा. याचा त्यांच्या मनावर दिर्घकालिन चांगला परीणाम होईल.