Join us  

मुलांना परीक्षेचा ताण येतो म्हणून आईबाबाही कासाविस होतात, ४ गोष्टी करा- परीक्षा होईल सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 5:21 PM

4 Parenting tips for exam season of child : ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलांची तब्येत आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी

शाळेच्या परीक्षा हा मुलांच्या शैक्षणिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मुलांची परीक्षा म्हणजे एका अर्थी आई वडिलांचीच परीक्षा असते. मुलांच्या अभ्यासाचा ताण हा त्यांना जितका असतो तितकाच तो अनेकदा आईवडीलांनाही येतो.  वर्षभर नीट अभ्यास करणारे मूल असेल तर ठिक नाहीतर ऐनवेळी अभ्यासाला बसल्याने मुलांना काहीच समजत नाही आणि मग ते परीक्षेत काय लिहीणार याबाबत पालकांना काळजी वाटायला लागते. दहावी, बारावी यांसारखी महत्त्वाची परीक्षा असेल तर पालकांना ताण आल्याशिवाय राहत नाही. पण असे होऊ नये आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलांची तब्येत आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी काही गोष्टींकडे पालकांनी आवर्जून लक्ष द्यायला हवे. या गोष्टी कोणत्या पाहूया (4 Parenting tips for exam season of child)...

१. आहार

परीक्षेच्या काळात मुलांचा आहार जास्तीत जास्त पोषण देणारा असायला हवा. तसेच हा आहार ताजा आणि हलका असेल याची काळजी घ्यायला हवी. आहारमुळे पचनाच्या समस्या उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी. पाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात समावेश असेल याची काळजी घ्या

(Image : Google)

२. झोप

अनेकदा अभ्यासाचा ताण आला की मुलं रात्री उशिरापर्यंत जागून नाहीतर सकाळी लवकर उठून अभ्यास करत बसतात. यामुळे अभ्यास होत असला तरी ऐन पेपरच्या वेळी झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण ७ ते ८ तास होईल याची काळजी घ्या. 

३. ताण

मुलांना परीक्षेचा आणि चांगले गुण मिळण्याचा ताण येणार नाही यासाठी त्यांच्याशी संवाद साधत राहा. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, परीक्षा चांगली जाईल अशी भावना तयार होण्यासाठी सकारात्मक गोष्टींवर चर्चा करा. 

(Image : Google)

४. अभ्यासाशिवाय मोकळा वेळ

परीक्षा आहे म्हणून २४ तास मुलांच्या डोळ्यासमोर पुस्तक असायला हवे असे नाही. तर २ ते ३ तास सलग अभ्यास केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक घेणे आवश्यक असतो. तसा ब्रेक घेतला तरच अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकते. नाहीतर सलग वह्या पुस्तकं डोळ्यासमोर असतील तर अभ्यास तर होत नाहीच पण विनाकारण ताण येत राहतो. मोकळ्या वेळात मुलांशी खेळणे, वेगळ्या विषयावर गप्पा मारणे, मोकळ्या हवेत फेरफटका मारुन येणे अशा गोष्टी अवश्य करायला हव्यात.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंपरीक्षाशाळा