Join us  

पालकांनी फक्त ४ सवयी बदलल्या तर मुलंही होतील समंजस आणि स्मार्ट, वळण लावायचंच तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 5:27 PM

4 parenting tips to make children smart and intelligent : मुलांमध्ये काही गुण रुजवण्यासाठी पालकांनी काही प्रयत्न करावे लागतात.

आपल्या मुलांनी जगात सुरू असलेल्या स्पर्धेत कायम आघाडीवर राहावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यासाठी आवश्यक तो स्मार्टपणा तसेच समजदारपणा आपल्या मुलांकडे असावा अशी पालकांची साहजिकच इच्छा असते. हे गुण मुलांमध्ये कायम टिकून राहीले तर मुलांच्या प्रगतीसाठी ते फायदेशीर ठरतात. समाजात वावरण्यासाठी स्मार्टपणा आणि समजूतदारपणा हे दोन्ही गुण अतिशय आवश्यक असून ते गुण मुलांमध्ये रुजवावे लागतात. हे गुण रुजवण्यासाठी पालकांनी काही प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊन ते गुण मुलांमध्ये यावेत यासाठी काय करायला हवं पाहूया (4 parenting tips to make children smart and intelligent)..

१. मुलांची उत्सुकता कायम ठेवायला हवी

मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीबाबत खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेपोटी मुलं आपल्याला त्यांच्या वयाप्रमाणे आणि आकलनाप्रमाणे सतत काही ना काही प्रश्न विचारत असतात. पण काहीवेळी गडबडीत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं टाळतो. पण असं करता कामा नये, त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. 

(Image : Google)

२. सकारात्मक उदाहरण देणे 

मुलांना आपण अनेकदा काही ना काही गोष्टी सांगत असतो. या गोष्टी सांगताना आपण नकळत त्यांना काही उदाहरणे देत असतो. ही उदाहरणे सकारात्मक असतील तर त्याचा मुलांवर चांगला परीणाम होण्यास मदत होते. मात्र त्यासाठी आपले विचारही सकारात्मक असायला हवेत. अशा सकारात्मक गोष्टी सांगितल्याने मुलांना आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. 

३. सामाजिक गुणांकडे लक्ष देणे

मुलं घरात भरपूर बोलतात किंवा दंगा करतात. पण सामाजिक ठिकाणी जेव्हा काही सादरीकरण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुलं खूप घाबरतात. पण असे होऊ नये यासाठी मुलांमधील सामाजिक गुणांचा विकास करायला हवा. इतर मुलांशी बोलल्यावर आणि दबाव न टाकता हळूहळू त्यांना कम्फर्टेबल केल्यास त्यांची स्कील्स तयार होतात. 

४. आव्हानात्मक गोष्टी करण्यास शिकवणे

आपण जसे मोठे होतो तशी आपल्या आयुष्यातील आव्हाने वाढत जातात. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे स्मार्टपणा असणे गरजेचे असते. यासाठी मुलांना लहानपणापासूनच लहान मोठी आव्हाने द्यायला हवीत. मुलांना एखाद्या गोष्टीत किंवा खेळात मदत करण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करुन एखादी गोष्ट स्वत: पूर्ण करायला लावल्यास त्यांचा स्मार्टपणा वाढण्यास मदत होते.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं