Join us  

रागाच्या भरात मुलांना मारता? हे योग्य की अयोग्य, मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2023 2:54 PM

4 Reasons Why Hitting Child is Not Good Idea Parenting Tips : मुलं कधी आपलं ऐकत नाहीत तर कधी आपले पेशन्स चेक करतात

मुलं अनेकदा आपण प्रेमाने सांगून एखादी गोष्ट ऐकत नाहीत. वेळच्या वेळी अभ्यास न करता नुसते खेळत बसतात. काही वेळा सतत मोबाइलला चिकटून राहतात तर कधी उलटी उत्तरं देतात. अनेकदा पालक म्हणून आपण त्यांना काही गोष्टी समजावून सांगतो. त्यांच्यासाठी काय फायद्याचे आणि काय तोट्याचे हेही समजावून देतो. पण तरी मुलं कधी आपलं ऐकत नाहीत तर कधी आपले पेशन्स चेक करतात. समजावून सांगूनही त्यांनी ऐकले नाही आणि आपल्याला ते डोईजड झाले की आपला पारा चढतो आणि नकळत आपण त्यांच्यावर हात उगारतो (4 Reasons Why Hitting Child is Not Good Idea Parenting Tips). 

मारणं चुकीचं असून त्याचा मुलांच्या मनावर वाईट परीणाम होत असल्याचे माहित असूनही आपण मुलांना खूप मारतो. पण अशाप्रकारे मारण्याचा त्यांच्या मनावर दिर्घकालीन काय परीणाम होतो आणि त्याचे भविष्यात काय परीणाम होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याच्या अभ्यासक फातिमा माय आयडीयल पॅरेंटींग या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून याविषयी महत्त्वाची माहिती शेअर करतात. यामध्ये मारण्याचे नेमके काय परीणाम होतात याबाबत त्या सांगतात. 

(Image : Google)

१. मुलंही इतरांना मारतील

पालक हे मुलांपुढील सर्वात पहिला आदर्श असतात. त्यामुळे आपलं पाहून मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. मुलांची आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर आपण त्यांना मारतो. त्यामुळे अशाप्रकारे मारायचे असते असा संस्कार नकळत त्यांच्या मनावर होऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांना मारतो त्याप्रमाणे तेही इतरांना मारु शकतात. 

२. राग वाढत जाईल

आपल्याला राग अनावर झाल्यानंतर आपण हात उगारतो आणि मुलांना मारतो. त्याप्रमाणे मुलांनाही राग अनावर होण्याची शक्यता असते. अशावेळी हा राग नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल हे पाहायला हवे. नाहीतर मुलंही आपल्यासारखीच चिडचिडी होतील.

३. खोटं बोलण्याची शक्यता 

अमुक गोष्ट केल्यानंतर आपल्याला मार बसतो असे वाटल्याने मुलं नकळत आपल्यासमोर खोटं बोलायला सुरुवात करतात. मार टाळण्यासाठी खोटं बोलण्याचं आयुध ते वापरण्याची शक्यता असल्याने त्यांना खोटं बोलण्याची सवय लागेल, त्यामुळे मुलांना मारणं चुकीचच आहे. 

४. आत्मसन्मान कमी होतो

मोठ्या व्यक्तींना ज्याप्रमाणे आत्मसन्मान असतो त्याचप्रमाणे लहान मुलांनाही तो असतो. पण आपण जेव्हा त्यांना मारतो तेव्हा त्यांच्या आत्मसन्मानावर आघात होतो. मुलांनाही आपल्याकडून आदराची अपेक्षा असते. मात्र तो आदर त्यांना मिळाला नाही तर त्यांचा आत्मसन्मान दुखावला जाण्याची शक्यता असते. 

पालक म्हणून आपण काय करायला हवं? 

१. प्रतिक्रिया देण्याआधी थोडा पॉझ घ्या

२. चुका सुधारण्याआधी मुलांशी कनेक्ट करायला शिका

३. बोलण्याआधी त्यांचे म्हणणे ऐकून घ्या

४. सहानुभूती करण्यापूर्वी सहानुभूती दाखवा

५. उपदेश करण्यापूर्वी सराव करा

टॅग्स :पालकत्वलहान मुलं