नवीन वर्ष म्हणजे नव्या संकल्पांचं, नव्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचं. येणाऱ्या वर्षात आपण हे करुया, ते करुया असे बरेच संकल्प केले जातात. सुरुवातीचे काही दिवस, महिने हे संकल्प पूर्णही केले जातात. पण दिर्घकाळासाठी हे संकल्प टिकतीलच असं नाही. त्यामुळे फार मोठ्या मोठ्या गोष्टी ठरवण्यापेक्षा अगदी लहान, आपल्याला सहज जमतील अशा गोष्टी ठरवल्या तर त्या पाळणेही सोपे जाते. या गोष्टी करताना आपण मुलांनाही त्यात सहभागी करुन घेतले तर त्यांनाही चांगल्या गोष्टींची सवय लागण्यास मदत होईल. विशेष म्हणजे मुलांना आपल्याबरोबर घेतल्याने एकमेकांच्या सोबतीने, साह्याने या गोष्टी करणेही सोपे जाईल. आता रोजच्या रोज करता येतील अशा कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील पाहूया....
१. शक्य असेल तिथे झाडे लावा, झडांना पाणी घाला -
गेल्या २ वर्षात कोविड नामक आजाराने आपल्याला ऑक्सिजनची गरज लक्षात आणून दिली. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन हवा असेल तर झा़डं लावायला हवीत. घरात रोपे लावण्यापासून ते टेकडीवरच्या आपण फिरायला जात असलेल्या ठिकाणच्या झाडांना पाणी घालण्यापासून सुरुवात करुया. आपण राहतो ते ठिकाण जास्तीत जास्त हिरवाईने नटेल असा प्रयत्न करुया. या सगळ्या गोष्टी लहान मुले तर एन्जॉय करतीलच पण आपणही त्यांच्या मनात एक चांगला विचार रुजवू शकू. घरात, सोसायटीच्या आवारात, आपल्या घराच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावूया, त्यांना नियमित पाणी घालूया. वीकेंडला आपण फिरायला जातो, त्याठिकाणच्या झाडांना आवर्जून पाणी घालूया, ज्याठिकाणी आपण नियमितपणे जाऊ शकू अशा घराजवळील एखाद्या टेकडीवर, मोकळ्या जागेत काही रोपे लावून त्यांची नियमित मशागत करुया.
२. प्राण्यांशी दोस्ती करा -
लहानपणापासून आपण ज्या प्राण्यांची नावे घेत लहान मुलांना खेळवतो, रमवतो, खाऊ-पिऊ घालतो त्या प्राण्यांची भिती न दाखवता त्यांना या प्राण्यांशी दोस्त करायला शिकवा. तुमच्या आसपास कोणाकडे पाळीव प्राणी असतील तर त्यांच्याकडे तुम्हीही जा आणि मुलांनाही आवर्जून न्या. या प्राण्यांशी दोस्ती कशी करायची हे त्यांना शिकवा. तसेच आपल्या घराच्या आजुबाजूला बऱ्याचदा कुत्री, मांजरी, गाय यांसारखे प्राणी आणि चिमणी, कावळे, कबुतरे, पोपट यांसारखे पक्षी असतात. या प्राण्यांशी आणि पक्ष्यांशी गप्पा मारायला शिकवा. यामुळे नकळतच मुलांची आणि पर्यायाने तुमचीही प्राण्यांशी दोस्ती होईल. त्या प्राण्यांचे रंग, त्यांच्या सवयी, आवाज सांगत मुलांची त्यांच्याशी ओळख करुन द्या.
३. गरजूंना मदत करा -
अनेकदा आपल्याकडे घरात खूप न लागणारे कपडे, खेळणी, पुस्तके असतात. या गोष्टी आपण वापरत नसल्याने कपाटात किंवा इतर ठिकाणी पडून असतात. या वस्तू मुलांना एकत्र करुन नीट पिशवीत भरायला सांगा. त्या वस्तू आपण कोणाला द्यायच्या का असे विचारुन मुलांना त्यासाठी तयार करा. नंतर जवळपास एखादी संस्था असेल किंवा गरजू लोक असतील अशांना या वस्तू नेऊन द्या. यासाठी मुलांना सोबत घेऊन जा. म्हणजे आपल्याला सहज मिळत असलेल्या गोष्टी अनेकांना मिळत नाहीत, त्यामुळे त्याची किंमत करण्याचा संस्कार नकळत मुलांवर होईल. महिन्याकाठी एकदा त्यांना एखादा अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी आवर्जून न्या. त्यांना त्याबाबत माहिती सांगा आणि त्याबद्दल त्यांना काही प्रश्न पडले तर त्याची योग्य ती उत्तरे द्या. इतकेच नाही वाटेत ज्येष्ठ व्यक्ती, अंध व्यक्ती दिसले तर त्यांना रस्ता ओलांडायला, जीने चढायला मदत करा. त्यामुळे अशाप्रकारे मदत करायची असते हे मुलांना काहीही न सांगता आपल्या कृतीतून लक्षात येईल.
४. अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या -
अनेकदा आपण घरात शिळे अन्न उरले की ते आवडत नसल्याने टाकून देतो. मात्र तसे न करता, करतानाच बेताने करा. शिळे उरलेच आणि ते चांगले असेल तर घरातील सगळ्यांनी मिळून ते थोड थोडे करुन खाऊन टाका. अगदीच जास्त असेल तर आपल्या कामवाल्या मावशी, सिक्युरीटीवाले काका यांना खाणार का असे विचारा आणि द्या. तसेच हॉटेलमध्ये गेल्यावरही आपण अनेकदा जास्त झाले म्हणून उरलेले अन्न तसेच ठेवतो. मग कित्येक रुपये देऊन घेतलेले हे अन्न वाया जाते. मात्र हॉटेलमध्ये गेल्यावर अन्न उरले असेल तर ते पॅक करुन घ्या आणि वाटेत कोणी गरजू दिसले तर त्यांना द्या.