मुलं आपल्यासोबत आनंदी आणि कम्फर्टेबल असणं कोणत्याही पालकांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. रोजची धावपळ, कामाचा व्याप, घरातील जबाबदाऱ्या आणि बाकी गोष्टींमध्ये आपले मुलांकडे अनेकदा लक्ष द्यायचेच राहून जाते. मूल सकाळी उठल्यापासून आपल्या जवळ येते, आसपास लुडबूड करते, आई -आई करत आपल्यालाा काही बाही दाखवत राहते. पण आपल्याला मात्र त्याच्या गोष्टींकडे शांतपणे पाहायला वेळ होतोच असे नाही. अशावेळी ही मुलं काहीशी हिरमुसून जाऊ शकतात (4 Things To Tell Your Child Right Before Sleeping).
दिवसभर सगळी धावपळ असली तरी संध्याकाळी घरी आल्यावर मात्र आपण मुलांना थोडा का होईना वेळ आवर्जून द्यायला हवा. यामुळे मुलं आणि आपल्यातील नातं तर पक्क होईलच पण मुलं आनंदी व्हायला, त्यांच्यात आत्मविश्वास यायला याची चांगली मदत होईल. आता रात्री मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. तर मुलांसोबत लहान खेळ खेळणं, त्यांच्याशी गप्पा मारणे, गाणी किंवा गोष्टी म्हणून दाखवणे, एकत्र जेवण करणे अशा काही गोष्टी आपण मुलांसोबत आवर्जून करु शकतो. याशिवाय रात्री झोपताना मुलांना घेऊन ४ गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्या कोणत्या याविषयी समजून घेऊया...
१. तुला रात्री झोपताना ज्या गोष्टी लागतील त्या मी तुला देणार आहे. उदा. पाणी भरलेली बाटली रात्रभर आपल्या जवळ असणार आहे असं मुलांना सांगितलं तर त्यांना कम्फर्टेबल वाटायला मदत होते.
२. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू आमच्या आजुबाजूला असलास की सगळं वातावरण कसं आनंदी असतं. भविष्यातही आम्ही कायम तुझ्यावर असंच प्रेम करत राहणार आहे.
३. दिवसभरात अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आमच्याशी शेअर करावीशी वाटते? तुला आमच्याशी शेअर करावीशी वाटेल अशी कोणतीही आणि प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्या आजुबाजूला आहोत.
४. आपण कायम एकमेकांच्या मनात आणि हृदयात असणार आहोत. जरी काही वेळा काही कारणाने आपण एकमेकांच्या सोबत नसलो तरी आपण एकमेकांच्या तितकेच जवळ असणार आहोत. तू जेव्हा बाहेर खेळत असशील किंवा मी घरात नसेन तरी आपण एकमेकांचाच विचार करत असू आणि एकमेकांवर प्रेम करत असू.