मुलांशी पालक म्हणून आपण कसे वागतो यावर मुलांच्या वागण्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. मुलं ही एकप्रकारे कोरी पाटी असतात, आपण त्यावर जसे चित्र किंवा काहीही काढतो तसे ते घडत जातात. आपल्या रोजच्या वागण्याबोलण्यातल्या खूप गोष्टींचा मुलांच्या मनावर खोलवर परीणाम होत असतो. अनेकदा काही गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत पण मुलांसाठी त्या खूप जास्त महत्त्वाच्या असू शकतात. मुलांशी किंवा घरातल्या इतर मंडळींशी आपण कसे वागतो, बोलतो हे मुलं अतिशय बारकाईने टिपत असतात. त्याचा त्यांच्या मनावर एकप्रकारे प्रभाव पडतो आणि त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते (4 Times of day when you should smile at your child).
आपल्या घरात जर आनंदाचे वातावरण असेल तर मुलंही नकळत आनंदी असतात. पण घरात तणावाचे किंवा भांडणाचे वातावरण असेल तर मुलंही तणावाखाली असलेली आपल्याला जाणवते. यासाठीच सकाळी उठल्यापासून काही गोष्टी आवर्जून केल्यास त्याचा मुलांच्या वाढीवर अतिशय चांगला परीणाम दिसून येतो. दिवसभर आपण मुलांना देत असलेली स्माईल ही त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट असून त्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. मुलांवर याचा सकारात्मक परीणाम होत असून त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. कोणत्या वेळेला आपण मुलांना अशी स्माईल दिली की मुलं आनंदी राहू शकतात याविषयी समुपदेशक प्रिती वैष्णवी काय सांगतात ते पाहूया...
१. सकाळी मुलं उठण्याच्या वेळेला त्यांना सुप्रभात किंवा गुड मॉर्निंग म्हणून उठवावे. त्यावेळी त्यांना एक मोठी स्माईल आवर्जून द्यावी. यामुळे मुलं खूश होतात आणि त्यांची सकाळ आणि एकूणच दिवस अतिशय चांगला जाण्याची शक्यता असते.
२. शाळेतून आल्यावर बहुतांशवेला मुलं थकलेली असतात. बराच वेळ शाळेत असल्याने याठिकाणी त्यांना वेगवेगळ्या स्वरुपाचे अनुभव आलेले असू शकतात अशावेळी मुलांना अतिशय छान स्माईल देऊन ग्रीट करावे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण नकळत कमी होण्यास मदत होते.
३. आपण ऑफीसमधून घरी येतो तेव्हा बरेचदा मुलं अतिशय आतुरतेने आपली वाट पाहत बसलेली दिसतात. अशावेळी आपल्या डोक्यात असंख्य विचार आणि कामं असतात. तसेच ऑफीसमध्ये आणि प्रवासाने आपण थकलेले असतो. मात्र तरीही यावेळी मुलांना आपण १ छान स्माईल आवर्जून द्यायला हवी. ९ ते १० तासांनी मुलांना भेटल्यावर अशी स्माईल दिली तर आपला आणि त्यांचा थकवा जाऊन मूड फ्रेश होण्यास मदत होते.
४. मुलांना रात्री झोपवताना आपल्या आवाजात एकप्रकारचा शांतपणा हवा. तसेच चेहऱ्यावर हसू असेल तर नकळत झोपतानाही मुलांचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी आपण सगळेच दमलेले असल्याने कधी एकदा सगळं आवरुन झोपू असे आपल्याला झालेले असते आणि मुलांमध्ये बराच उत्साह असतो. मात्र तरीही अशावेळी त्यांच्यावर न ओरडता शांतपणे चेहऱ्यावर स्माईल ठेवून दिवस संपवायला हवा.