आपण दिवसभर ऑफीसला जातो, अशावेळी मुलंही शाळा, डे केअर यामध्ये बिझी असतात. मुलांना आपला फार कमी वेळ मिळतो त्यामुळे पालक म्हणून आपल्यालाही वारंवार गिल्ट येतो. मग जितका वेळ आपण मुलांना देतो तो क्वालिटी टाइम असावा अशी आपली इच्छा असते. पण या क्वालिटी टाइम म्हणजे नक्की काय, या वेळेत मुलांसोबत कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबाबत पालकांना माहिती असतेच असे नाही. त्यामुळे मुलांसोबत वेळ घालवायचा म्हणजे त्यांचा अभ्यास घ्यायचा किंवा त्यांना फिरायला घेऊन जायचं. काहीच नाही तर मुलांना काहीतरी करायला सांगून आपण मोबाइल वेळ घालवायचा. मात्र अशाने आपण मुलांना खरंच क्वालिटी टाइम देतो असं पालक म्हणून तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण यामुळे आपण मुलांना वेळ देतच नाही, मग क्वालिटी टाइम द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं याबाबत समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांचा आणि आपला बॉंड स्ट्रॉंग व्हावा असं वाटत असेल तर नियमितपणे मुलांसोबत काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. या गोष्टी कोणत्या आणि त्या कशापद्धतीने केल्यास मुलं आपली राहतील ते समजून घेऊया (5 Activities You Should Do With Children Regularly)...
१. एकत्र वाचन
मुलांची कल्पनाशक्ती, भाषा यांचा विकास व्हायचा असेल तर वाचन करणे हा अतिशय सोपा आणि उत्तम उपाय आहे. त्यामुळे दिवसातली किमान १५ मिनीटे तरी मुलांसोबत काही ना काही वाचायला हवे. यामध्ये चित्रांचे पुस्तक, गोष्टींचे, गाण्यांचे पुस्तक असे काहीही असू शकते. या वाचनात मुलं सहभागी होतील यासाठी प्रयत्न करा.
२. मोकळ्या जागी खेळणे
मुलांनी शारीरिक हालचालींचे खेळ खेळणे त्यांच्या शारीरिक, मानसिक वाढीसाठी चांगले असते. यामध्ये बागेत खेळण्यापासून ते सायकल चालवणे, इतर मुलांसोबत खेळणे, निसर्गात फेरफटका मारणे अशा कोणत्याही घराबाहेरच्या अॅक्टीव्हिटीचा समावेश असायला हवा.
३. क्रिएटीव्ह वेळ
चित्र काढणे, चित्र रंगवणे, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे, ब्लॉक्सपासून काहीतरी तयार करण्याचे खेळ अशा कल्पकता वाढवणाऱ्या गोष्टी मुलांसोबत आवर्जून खेळायला हव्यात. यामुळे त्यांची कल्पकता तर वाढेलच पण त्यासोबत मोटार स्कील्स, प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी कौतुक करा म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
४. एकत्र जेवणे
दिवसभरातील नाश्ता, रात्रीचे जेवण असा एखादा तरी वेळ सगळे मिळून एकत्र जेवतील असा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांचे कुटुंबासोबतच बॉंडींग चांगले होण्यास मदत होईल. यामध्ये एकमेकांशी गप्पा, मतं शेअर करणे, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे असे सगळे झाल्याने मुलं आपोआप आनंदी राहण्यास मदत होईल.
५. नियमित कामं आणि जबाबदाऱ्या
घरातील कामं ही सगळ्यांनी करायला हवीत यानुसार मुलांचे वय, क्षमता लक्षात घेऊन ते करु शकतील अशी लहान लहान कामं मुलांना करायला सांगा. त्यांना काम करायला दिल्याने जबाबजारीची जाणीव होण्याची शक्यता असते. तसेच ही कामं करताना ते टिम वर्क, नियोजन यांसारख्या गोष्टी आपोआप शिकतील. यामध्ये त्यांची खोली आवरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, झाडांना पाणी घालणे, जेवायला वाढून घेण्यासाठी मदत करणे अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. ही कामं केल्यानंतर त्यांचे कौतुक करायचे विसरु नका.