घरातील मोठ्या व्यक्तींनाच पालेभाज्या आवडत नाही म्हटल्यावर लहानांची काय तऱ्हा... मुलांचे खाण्याच्या बाबतील खूप नखरे असतात. अशी तक्रार प्रत्येक आई - वडील करतात. त्यातही पालेभाज्या फळे खायचं म्हटलं की मुलं नकोच म्हणतात. पालेभाज्या, फळं खाणं यासोबत मुलांनाच कायमचा ३६ चा आकडा असतो. भाज्यांमधून मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळणार असलयाने त्यांनी फळं, पालेभाज्या पुरेशा प्रमाणांत खायला हवे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांच्या समोर पिझ्झा - बर्गर, चॉकलेट किंवा अजून कोणताही चमचमीत पदार्थ ठेवा मुलं हसत हसत अगदी आवडीने सगळं संपवतात. पण जेव्हा पालेभाज्या खाण्याचा विषय येतो, तेव्हा मात्र ही मुलं नाकं मुरडतात.
मुलांना कितीही समजावून सांगितले तरी पालेभाज्या, फळं त्यांना खाऊ घालणं हे पालकांच्या दृष्टीने फारच कठीण काम असत. त्यांच्यासमोर कितीही सुंदर पद्धतीने पालेभाजी बनवून ठेवली तरी मुलं त्याच्याकडे बघत देखील नाहीत. अशा परिस्थितीत, मुलांना सकस, पौष्टिक आहार व पालेभाज्या खायला घालणे पालकांसाठी एक मोठा टास्कच असतो. काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण मुलांना पालेभाज्या खाण्याची गोडी लावू शकतो( 5 clever ways to trick your kids into eating vegetables).
मुलांनी आवडीने पालेभाज्या खाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स...
१. लहानपणीच सवय लावावी :- आपले मुलं लहान असतानाच शक्यतो त्याला सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खाण्याची सवय लावावी. बाळ लहान असेल आणि जेव्हा त्याला आईच्या दुधाशिवाय इतर पदार्थ खायला दिले जातात तेव्हाच त्याच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. जेणेकरुन मुलांना लहान वयातच पालेभाज्या खाण्याची सवय लागेल.
२. त्यांच्यासोबत तुम्ही देखील पालेभाजी खा :- स्वतः पालकांनी पालेभाजी न खाता मुलांना पालेभाजी खायला लावणे चुकीचे आहे. तुमच्या मुलांपुढे जर तुम्हीच पालेभाजी खाल्ली नाही तर मुलं देखील खाणार नाही. तुम्ही त्यांच्यासमोर भाजी खाल्ली तर मुलं देखील खाईल हे साधं उदाहरण आहे.
३. मुलांच्या आवडत्या डिशमध्ये पालेभाज्यांचा समावेश करा :- मुलांना बाहेरचे विकतचे अन्नपदार्थ आणि फास्ट फूड खायला खूप आवडत. त्यामुळे त्यांच्या आवडीचे असे पदार्थ घरी तयार करताना त्यात पालेभाज्यांचा समावेश करावा. उदाहरण :- जर मुलांना नूडल्स आवडत असतील तर ते बनवताना त्यात पालेभाज्या बारीक चिरुन घाला. पिझ्झा किंवा बर्गरसोबत देखील तुम्ही असे प्रयोग करुन पाहू शकता.
४. पालेभाज्यांची पौष्टिकता समजावून सांगा :- मुलांना पालेभाज्या खाण्याचे महत्व समजावून सांगा. पालेभाज्यांची पौष्टिकता किती आहे ? ते खाणे किती महत्वाचे आहे? ते खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो. यांसारख्या गोष्टींचे महत्व मुलांना सांगा, याचे महत्व मुलांना पटल्यावर मुलं आपोआप स्वतःहून पालेभाज्या खाऊ लागतील.
५. पालेभाज्या खाण्याची जबरदस्ती करु नका :- मुलांना पालेभाज्या खाण्याची जबरदस्ती करु नका. तसेच मुलांच्या मागे पालेभाजी खा असा लाकडा लावू नका. यामुळे मुलांना पौष्टिक पदार्थ खाण्याचा तिरस्कार वाटू शकतो. यामुळे मुलांच्या पाठीमागे वारंवार भाजी खा अशी जबरदस्ती करु नका. त्यापेक्षा त्यांच्या आवडत्या डिशमध्ये पालेभाज्या मिक्स करा किंवा पालेभाज्यांची प्युरी करून त्यांचे सूप बनवून द्या.