थंडीच्या दिवसांत कोठा जड होणे ही समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भेडसावते. थंडीत पाणी कमी प्यायले जात असल्याने आणि वातावरणात कोरडेपणा असल्याने खाल्लेले अन्न नीट पचत नाही. अन्न नीट पचले नाही तर पोट साफ होताना त्रास होतो. मुलं तर पाणी प्यायचा कायम कंटाळा करतात आणि मग त्यांना २-३ दिवस संडासलाच होत नाही. जेव्हा होते तेव्हा करताना खूप त्रास होतो, जोर द्यावा लागतो, खालच्या बाजुला आग होते. याचे कारण म्हणजे पाणी कमी प्यायल्याने खडे झालेले असतात आणि ते बाहेर येताना त्रास होतो. मग त्याठिकाणी खाज येणे, रक्त आल्यासारखे होणे अशा समस्या उद्भवतात. वरचे अन्न सुरू केल्यानंतर वय वर्षे १ ते ४ वयोगटातील मुलांमध्ये या समस्या दिसून येतात. पण लहान वयात मुलांना या समस्या उद्भवू नयेत यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी यासाठी काही सोपे उपाय सांगतात ते कोणते पाहूया (5 Easy Tips and tricks to get relief from constipation)...
१. व्यायाम
लहान मुलांचा पुरेसा व्यायाम होईल असे पाहावे. यामध्ये पोटाला मसाज करणे, सायकलिंग सारख्या अॅक्टीव्हीटीज करायला लावणे याचा चांगला उपयोग होतो. यामुळे मुलांची पोटाची हालचाल होईल आणि संडासला त्रास होणार नाही.
२. फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्यांमधून शरीराला व्हिटॅमिन्स, खनिजे यांसारखे घटक तर मिळतातच. पण त्याचबरोबर यातून शरीराला फायबर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने फळं आणि भाज्यांचा समावेश आहारात वाढवावा. गाईचे दूध आणि गव्हाचे पीठ यांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढत असल्याने या २ गोष्टी आहारात कमी प्रमाणात असतील असे पाहावे.
३. पाण्याचे प्रमाण
मुलं अनेकदा पाणी पिण्याचा कंटाळा करतात. कमी पाणी प्यायल्याने कोठा जड होतो आणि साफ होण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र मुलांना सतत आठवण करुन पाणी पिण्यास सांगावे. त्यासोबत सरबते आणि द्रव पदार्थ यांचा आहारातील समावेश वाढवावा. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
४. पॉटी ट्रेनिंग
साधारणपणे मूल १.५ वर्षाचे झाल्यानंतर त्याला पॉटी ट्रेन करायला हवे. त्यामुळे पोटात प्रेशर आल्यावर संडासमध्ये जाऊन कशाप्रकारे पॉटी केली जाते हे मुलांना समजणे सोपे जाते. यामुळे मुलं अगदी सहजपणे पोट साफ करण्याची क्रिया करतात.
५. प्रेमाने बोला
याचा मुलांच्या मानसिकतेशी संबंध असून मुलांशी प्रेमाने काही गोष्टी बोलायला हव्यात. त्यामुळे मुलांचे पोट साफ होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.