Join us  

मुलं सतत आजारी पडतात, काय करावं कळेना? प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ५ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 11:10 AM

5 Factors that Can Weaken Child’s Immunity System : प्रतिकारशक्ती कमी असण्यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात याविषयी...

ऋतू बदलला, हवेत थोडा बदल झाला की लहान मुलं लगेचच आजारी पडतात. काही वेळा त्यांनी बदलत्या वातावरणाला प्रतिसाद देणे योग्य असले तरी सतत आजारी पडणे चांगले नाही. अनेकदा मुलांना हवेत थोडा गारवा निर्माण झाला की ताप येणे, सर्दीने नाक भरणे, खोकला अशा समस्या निर्माण होतात. एकदा हे सगळे सुरू झाले की मग ते चक्र लवकर काही थांबायचे नाव घेत नाही. मग काही घरगुती उपाय करणे सुरू होते, त्यानी समस्या नियंत्रणात न आल्यास डॉक्टरांकडे जाणे आणि औषधे घेणे सुरू होते. असे सतत होत असेल तर प्रतिकारशक्ती कमी असणे हेच महत्त्वाचे कारण असते. आता ही प्रतिकारशक्ती कमी असण्यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात आणि ती वाढावी म्हणून काय करावे याविषयी (5 Factors that Can Weaken Child’s Immunity System)...

१. आहार

मुलांच्या आहारात साखरयुक्त चॉकलेट, टॉफी, सोडा असे घटक जास्त असतील तर शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. तसेच साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर मुलांच्या शरीरात साधारणपणे ५ तास एनर्जी टिकून राहते. या ५ तासांच्या काळात कोणत्या विषाणूने त्यांच्या शरीरावर आघात केला तर त्या विषाणूशी लढण्यासाठी शरीराची तयारी नसते. तसेच तळलेल्या पदार्थांमुळेही शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. 

(Image : Google)

२. पाणी कमी पिणे 

तसंच पावसाळ्याच्या काळात घाम येतो त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पण खेळण्याच्या नादात मुलांकडून तितक्या प्रमाणात पाणी प्यायलं जात नाही. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर प्रतिकारशक्ती कमी होण्यावर याचा परीणाम होतो. 

३. कमी झोप

आजकाल व्यवधानं वाढल्यामुळे मुलांची झोप नकळत कमी झाली आहे. कधी पालकांसोबत बाहेर गेल्यामुळे, घरी पाहुणे आल्याने, मोबाइल किंवा टीव्ही पाहत बसल्यामुळे अशा विविध कारणांमुळे मुलं रात्री लवकर झोपत नाहीत. पण सकाळी शाळेसाठी मात्र उठावेच लागते. यामध्ये मुलांची झोप खूप कमी होते आणि अँटीबॉडीज कमी प्रमाणात तयार होतात. त्याचा प्रतिकारशक्ती कमी होण्यावर परीणाम होतो. 

४. आऊटडोअर एक्सपोजर

मुलं घराबाहेर खेळायला जातात तेव्हा त्यांना व्हिटॅमिन डी मिळते. हॅपी हार्मोन्स तयार होतात. बाहेरच्या वातावरणामुळे नकळत त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बाहेर गेल्याने मुलांचा असंख्य विषाणूंशी संपर्क येतो आणि नकळत त्यांच्याशी फाईट करण्याची क्षमता वाढते.  

५. ताण आणि भिती

मुलांना कोणत्या गोष्टीचा ताण येत असेल किंवा भिती वाटत असेल तर नकळत त्याचा परीणाम त्यांच्या शरीरावर होतो. इतकेच नाही तर यामुळे मुलांची प्रतिकारशक्तीही कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना शक्यतो कोणत्या गोष्टीचा ताण येणार नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त भिती वाटणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्यपावसाळा आणि पावसाळी आजारपण