ऑनलाइन गृहपाठापासून ते मित्रांसोबत गप्पा मारण्यापर्यंत किंवा गेम खेळण्यापर्यंत, आजकाल बहुतेक मुलांसाठी स्क्रीन टाइम हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आजच्या डिजिटल जगात, इंटरनेटचा वापर थोरा-मोठ्यापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येक व्यक्ती करतो. त्यामुळेच लहान मुले स्मार्टफोनवर गेमिंग, गाणी, चित्रपट यांसारख्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी सहजपणे शिकतात. इंटरनेटवरील माहिती एका क्लिकच्या अंतरावर उपलब्ध असते. इंटरनेटचा वापर करून आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो, परंतु चुकीच्या गोष्टी देखील आहेत ज्या मुलांपासून दूर ठेवल्या पाहिजेत.
मुलांना इंटरनेटवर सहसा ऑनलाइन व्हिडिओ किंवा त्यांच्या वयोगटाशी संबंधित लहान लहान व्हिडीओ, गाणी, कार्टून्स अशा प्रकारचे कंटेंट पाहायला आवडते. परंतु इंटरनेटवर अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध असतात. ज्यामुळे मुले भरकटू शकतात किंवा त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. असे होऊ नये याकरिता मुलांच्या इंटरनेट अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि त्यासाठी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यालासुद्धा मुलांचा इंटरनेट वापर सुरक्षित ठेवायचा असेल तर काही खास टिप्स नक्की ट्राय करुन पाहूयात. मनोचिकित्सक व पॅरेंटिंग तज्ज्ञ जेस वँडरवियर (Jess VanderWier) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, मुलांसाठी पाच स्क्रीन सुरक्षा नियम कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे(5 Screen Safety Rules Every Parent Should Teach Their Kids).
नक्की कोणते आहेत ५ नियम :-
१. देखरेखीखाली मुलांना इंटरनेट वापरायला द्या :- आपली मुलं जेव्हा मोबाईल, टॅबलेट, इंटरनेट किंवा इतर कुठलीही गॅजेट्स वापरत असतील. अशावेळी मुलांना ती गॅजेट्स वापरायला द्यावीत. मुलं गॅजेट्सचा वापर करत असताना मुलांना आपल्या देखरेखीखाली ठेवावे. उदाहरणार्थ :- तुम्ही त्यांना टॅबलेटवर गेम खेळण्याची परवानगी देऊ शकता, परंतु केवळ लिव्हिंग रूम किंवा स्वयंपाकघर यांसारख्या नियुक्त भागात जिथे तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता. मुलं गॅजेट्सचा वापर करत असताना सुरक्षिततेच्या हेतूने, पालकांनी आपल्या देखरेखीखाली मुलांना गॅजेट्स वापरायला द्यावेत.
२. चॅटिंग / इंटरनेटचा वापर करतांना :- इंटरनेटचा वापर करताना मुलांना सावधानता बाळगायला शिकवावे. मुलांच्या हातांत मोबाईल दिल्यानंतर ते कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी चॅट करत नाही ना, याची खबरदारी घ्यावी. आपल्या मुलाच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीचे बारकाईने निरीक्षण करून आणि त्यांना अनोळखी व्यक्तींशी चॅट करण्यापासून रोखून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. मुलांना इंटरनेटवरील धोक्यांची माहिती देणे आणि व इंटरनेट वापरण्याच्या योग्य मार्गांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. यासोबतच मुलांना ऑनलाइन पेमेंट आणि व्हायरसच्या धोक्यांबाबत आवश्यक माहिती दिली पाहिजे. लहान मुलांचे मोबाईलद्वारे होणारे ऑनलाइन परस्परसंवाद यांवर वेळेची मर्यादा ठेवावी. मोबाईल किंवा टॅबलेट्स सारख्या गॅजेट्सचा वापर करताना मुलांना दिवसातील विशिष्ट वेळ ठरवून द्यावी. तसेच तेवढ्याच वेळेपुरता मुलांना गॅजेट्सचा वापर करु द्यावा. मुलांचा स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी त्यांना चॅट करण्याऐवजी एखाद्या मित्राला फोन लावून गप्पा मारण्यास सांगावे. मुलांच्या मित्र मैत्रिणींसोबत प्ले डेटची एक तारीख निश्चित करून त्यांना गॅजेट्स वापरण्याऐवजी खेळायला पाठवावे.
३. सोशल मीडियावर कसे वागावे हे शिकवा :- सोशल मीडियाचा वापर करताना त्यावर कसे वागावे, बोलावे, त्याचा वापर कसा करावा हे मुलांना शिकवा. मुलांना सुरक्षित व असुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते संभाव्य धोके अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील. तसेच त्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलू शकतील. मुलांना जर गॅजेट्स वापरताना किंवा ऑनलाईन काही अडथळे आले तर त्यांनी अस्वस्थ न होता मोठ्यांची मदत घ्यावी, हा विचार पालकांनी मुलांना पटवून देणें गरजेचे आहे.
४. मर्यादा आखा :- मुलं सोशल मीडिया, इंटरनेट व गॅजेट्सचा वापर करत असतील तर त्याबाबतच्या मर्यादा आखून घ्या. इंटरनेट आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करत असताना मुलांना त्यांच्याबद्दलच्या मर्यादांची शिकवण देणे गरजेचे आहे. इंटरनेट किंवा या सगळ्या गोष्टींचा वापर करताना जर समोरच्या माणसाने आपली मर्यादा ओलांडली तर ते कसे ओळखावे. त्यावेळी कसे वागावे, याबद्दलचे ज्ञान मुलांना देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ :- एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याचे फोटो काढणे चुकीचे आहे, तसेच आपल्या बाबतीत कुणी वागले तर काय करावे ? हे त्यांना समजून देण्यात पालकांनी मदत करावी.
५. इंटरनेटवर मुलं काय पाहत आहे याकडे लक्ष द्या :- आपली मुलं इंटरनेटवर काय पाहत आहे याकडे पालकांनी फार बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मुलं इंटरनेटवर कोणत्या प्रकारचा कंटेंट बघत आहेत, तो कंटेंट त्यांच्या वयाला साजेसा आहे का?, या वयात त्याने हे पाहिले पाहिजे का? अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे पालकांनी जरुर लक्ष द्यावे. मुलं इंटरनेटवर त्यांच्या वयाला, बुद्धीला, योग्य असा कंटेंट पाहत आहेत, याची प्रत्येकवेळी पालकांनी खात्री करावी. उदाहरणार्थ :- मुलांना इंटरनेटवर मुक्तपणे ब्राउझ करण्याची परवानगी देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्यासाठी काही निवडक व्हिडीओ, चित्रपट शोधून काढून त्यांची एक प्ले लिस्ट तयार करुन त्यांना तोच निवडक कंटेंट पाहायला देऊ शकता.