Join us  

मुलं अचानक थयथयाट-रडरड करतात? ५ महत्त्वाची कारणं, म्हणून मुलं बिथरल्यासारखं वागतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 5:17 PM

5 things to consider when your child misbehaves : विचित्र वागण्यामागचं नेमकं कारण समजून घ्यायला हवं...

मुलांना वाढवणं, त्यांच्यासोबत डील करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नसते. काहीवेळा काहीच झालेलं नसताना मुलं एकाएकी चिडचिड करायला लागतात. अशावेळी मुलं अचानक वेड्यासारखी वागायला लागतात. कधीकधी इतका थयथयाट करतात की काय करावं आपल्यालाही कळत नाही. कोणतेही कारण दिसत नसताना मूल असं का करतं असा प्रश्न आपल्याला पडतो. मग मुलांची चिडचिड पाहून एकतर सुरुवातीला आपण त्यांना समजावतो किंवा अगदीच ऐकलं नाही तर ओरडतो. पण त्यांनी विचित्र वागण्यामागचं नेमकं कारण मात्र आपल्याला समजत नाही. तर मुलं एकाएकी विचित्र वागत असतील तर त्यामागे काही कारणं असतात हे लक्षात घ्यायला हवं. ही कारणं वेळीच लक्षात आली तर मुलांशी डील करणं नक्कीच सोपं होऊ शकतं (5 things to consider when your child misbehaves) .   

१. भूक लागल्यास 

बरेचदा असं होतं की मुलांना भूक लागलेली असते आणि त्यांना ते सांगता येत नाही. काहीवेळा गडबडीत आपल्याही लक्षात येत नाही. अशावेळी मुलं एकाएकी खूप चिडचिड आणि थयथयाट करायला लागतात. 

(Image : Google)

२. दमलेले असताना 

मुलं अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त खेळतात. दिवसभर शाळा, क्लास, ग्राऊंड असं सगळं करुन थकलेली असतील तरीही त्यांना खेळायचंच असतं. अनेकदा आपण दमलो आहोत आणि आपल्याला आता आरामाची गरज आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मुलं खूप चिडचिड करत असतील तर त्यांना जवळ घ्या आणि ते दमले आहेत का याचा अंदाज घ्या.

३. एकटे वाटतं तेव्हा

काहीवेळा मुलं बराच वेळ एकटीच अभ्यास करत असतात, खेळत असतात. अशावेळी एकटं राहून त्यांना कंटाळा येण्याची शक्यता असते पण ते आपल्या लक्षात येत नाही.  अशावेळी मी तुझ्यासोबत खेळू का असं मुलांना आवर्जून विचारा.

४. मुलं उदास असताना 

काहीवेळी मुलं आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकत नाहीत. एखादी गोष्टी त्यांना खटकलेली असते किंवा त्यांच्या मनात रुजलेली असते पण ती त्यांना सांगता येत नाही. अशावेळी मुलांना जवळ घेऊन त्यांना कोणत्या गोष्टीमुळे उदास वाटतंय, त्याबाबत त्यांना आपल्याशी काही बोलायचं आहे का हे तपासून पाहावे. 

५. लक्ष वेधून घेण्यासाठी 

काहीवेळा आपण आपली कामं, रुटीन यामध्ये इतके बिझी असतो की आपलं मुलांकडे पुरेसं लक्ष जात नाही. अशावेळी मुलं काहीसं विचित्र वागायला लागतात. मात्र पालक म्हणून आपण दिवसातला ठराविक वेळ मुलांना अवश्य द्यायला हवा.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं