ऋता भिडे
कोरोनानंतर आता २ वर्षांनी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. शाळेत जाण्याची मजा काही औरच हे जरी खरं असलं तरी आता मुलांना बऱ्याच मोठ्या गॅपनंतर अभ्यास करावा लागणार आहे. आणखी महिन्याभरात शाळांमध्ये चाचणी परीक्षा होतील. शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासाबरोबरच मुलांनी आणखीही अभ्यास करावा अशी पालकांची अपेक्षा असते. जास्तीचा नाही तर किमान घरचा अभ्यास तरी वेळेत आणि नीट पूर्ण करावा असं पालकांना वाटत असत. पण मुलांना मात्र अभ्यासाला बस म्हटलं की ती टाळाटाळ करतात, विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तरं देत नाहीत, लिहायला खूप वेळ लावतात. सुरुवातीला आपण त्यांना प्रेमाने समजावतातही, पण जास्तच त्रास दिला तर आपली चिडचिड चालू होते, आवाज वाढतो, हात उचलला जातो. हे सगळे झाले की होणारी रडारड आणि त्यात अपूर्णच राहतो पण घरातले वातावरण बिघडते ते वेगळेच (5 Ways to Make Your Children Study).
आपण जो अभ्यास करत आहोत तो विषय समजून घेऊन, त्याविषयीची आवड निर्माण झाली पाहिजे. मुलांना ज्या गोष्टी आवडतात, जे विषय आवडतात, त्याचा अभ्यास त्यांच्याकडून पटकन आणि छान होतो. तसेच त्यांना एकदा खेळ आवडत असेल तर त्या खेळाचा कधीच कंटाळा येत नाही. मग, अभ्यासाचाच कंटाळा का येतो? तर अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आपण पालक म्हणून सुरुवातीपासूनच काही गोष्टी करायला हव्यात.
१. मुलं लहान असल्यापासूनच म्हणजे अगदी ४ वर्षांपासूनच त्यांच्या बरोबर पाटी पेन्सिल घेऊन चित्र काढणं, गोष्टी सांगणं, एखाद्या विषयाची त्यांच्या वयानुसार ओळख करून देणं ह्या गोष्टी पालकांनी करायला हव्यात. म्हणजे मुलांना ऐकण्याची, एका जागी बसण्याची सवय लागेल.
२. लिखाणासाठी मुलांच्या बोटांची पकड वाढवण्याच्या अॅक्टीव्हीटीज घ्यायला हव्यात. यासाठी खोडरबरने खोडणे, मणी ओवणे, कात्रीने कागद कापणे, लहान वस्तू निवडणे असे केल्यास फायदा होतो. मात्र मूल खूप लहान असताना त्याला लिखाणाचा आग्रह करु नका.
३. अभ्यास घेताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणेही महत्त्वाचे आहे. यामध्ये कधी गोष्टी सांगून, कधी चित्रांच्या माध्यमातून कधी हातवारे करुन एखादा विषय समजावून देऊ शकता. मूल थोडे मोठे असेल तर प्रश्नमंजुषेसारखे खेळ खेळून मुलांचा अभ्यास घेता येतो. वेगवेगळी उदाहरणं देऊन, गाणी म्हणून,इतिहासातले प्रसंग रंगून सांगून, नाट्यमय पद्धतीने मुलांना विषय समजावून सांगितला तर मुलांच मनोरंजन पण होईल आणि अभ्यासही होईल. विषयानुसार, मुलाच्या वयानुसार पद्धतीचा वापर केलात तर मुलांना नवीन विषय शिकायला कंटाळा येणार नाही.
४. अभ्यासाची वेळ मुलाला विचारून ठरवा. खूपदा पालकांनी सांगिलेल्या वेळेस मुलांना अभ्यास करायचा नसतो मग मुलं वेगवेगळी कारण देतात. अशावेळेस पालकांनी मुलांना अभ्यास नक्की किती वाजता किंवा काय केल्यानंतर करणार आहेत हे विचारुन ठरवलं तर वाद होणार नाहीत. मुलं एक विशिष्ट वेळ ठरवून सुद्धा अभ्यासाला बसायला टाळाटाळ करत असतील तर पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद साधून त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायला हवे.
५. मूल जास्त काळ एका जागी बसावं यासाठी योगा, बसून करण्याच्या काही अॅक्टीव्हीटीज घेऊन मुलांची बैठक वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसंच अभ्यास करताना मुलांचं लक्ष विचलीत होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. यासाठी टीव्ही, मोबाइल बंद ठेवणे, कमीत कमी आवाजात बोलणे या गोष्टी करायला हव्यात. मुलांना अभ्यास हा स्वतःसाठी आहे हे अतिशय योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवे.
अभ्यास घेताना हे टाळा
१. धमकी देणं - अभ्यास संपवला नाहीस तर तुला जेवायला देणार नाही, कोंडूनच ठेवीन, बाहेर खेळायला पाठवणार नाही अशाप्रकारच्या धमक्या मुलांना देऊ नका. अशामुळे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण न होता, त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता असते.
२. अमिश दाखवणं - मुलांना अभ्यास कर तर मग तुला चॉकलेट देईन, अभ्यास कर मग तुला पिझ्झा करून देईन वगैरे अमिश दाखवू नका. त्यामुळे मुलांना अभ्यास हा काहीतरी मिळवण्यासाठी करायचा असतो असेच कायम वाटत राहील.
३. चिडणे, मारणे- मुलाला एखाद्या प्रश्नाचे बरोबर किंवा वेळेत उत्तर आलं नाही तर मुलावर ओरडायचं, मारायचं टाळायला हवं. तुला किती वेळा सांगितलं तरी समजतच नाही, तुला अक्कलच नाही, असे बोलू नका. त्यामुळे तुम्ही मुलांचा आत्मविश्वास कमी करता.
४. तुलना करणे - पालकांनी स्वःताच्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलांशी करणं टाळायला हवं. त्या ऐवजी तुम्ही मुलाच्या प्रगतीची तुलना त्याच्याशीच करा. तुमचा मुलांनी वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या विषयापासून सुरुवात केली आणि काही महिन्यांनी त्याने त्या विषयांमध्ये किती प्रगती केली हे पाहा आणि त्यांनाही ते सांगून कौतुक करा.
(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)
rhutajbhide@gmail.com