लहान मुलांना वाढवणं ही एक कला आणि सहनशक्तीचे काम असते. मुलांनी आपण म्हटलेलं सगळं ऐकावं आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं अशी आपली इच्छा असते. पण मुलं मात्र त्यांच्याच नादात वावरत असतात. मुलांना चांगली शिस्त लागावी, चारचौघात त्यांनी नीट वागावे यासाठी आपण त्यांना वारंवार सूचना देत राहतो. सकाळची शाळा असली की मुलं झोपेतून उठायला त्रास देतात आणि मग आवरायला होणारा उशीर, रीक्षा किंवा व्हॅनवाले काका निघून जाणे अशा गोष्टी घडतात. यावरुन आपली मुलांवर चिडचिड होते आणि सकाळी सकाळी घरातले सगळे वातावरणच बिघडून जाते. रात्री मुलं उशीरापर्यंत खेळत बसतात आणि मग सकाळी झोप पूर्ण होत नाही म्हणून झोपून राहतात. असे होऊ नये आणि रात्री मुलांनी वेळेवर झोपावे यासाठी करता येतील असे ६ सोपे उपाय पाहूया (6 Easy ways to make child sleep in time at night)...
१. मुलांची दुपारची झोप कमी करायला हवी. दुपारी ते २ ते ३ तास झोपले तर रात्री ते लवकर झोपत नाहीत. म्हणून दुपारची झोप ही अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त १ तासाची असेल असे पाहावे.
२. संध्याकाळच्या वेळी मुलांना घरात खेळवण्यापेक्षा घराबाहेरचे मैदानी खेळ खेळायला पाठवायला हवे. शारीरिक श्रम झाल्याने साहजिकच ते दमतात आणि रात्री वेळेत झोपतात.
३. झोपण्याआधी मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घाला किंवा करायला सांगा. असे केल्याने त्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते, ज्यामुळे रात्री शांत आणि गाढ झोप यायला मदत होते.
४. आंघोळ झाली की मुलांना शक्यतो लगेचच कमीत कमी लाईट असलेल्या, स्क्रीनशी संपर्क येणार नाही अशा खोलीत न्यायला हवे. त्यामुळे झोपण्याच्या वातावरणाची निर्मिती होईल आणि त्यांच्या मेंदूला आता झोपायचे आहे असा सिग्नल मिळेल.
५. झोपताना मुलांशी गप्पा मारणे, गोष्ट सांगणे, सोबत पुस्तके वाचणे, एकत्र आंथरुण घालणे अशा गोष्टी करायला हव्यात म्हणजे मुलांना झोपायची वेळ झाली हे लक्षात येते आणि ठरलेल्या वेळेला ते नकळत झोपतात.
६. झोपताना मुलांच्या पायाला कोमट तेलाचा मसाज केल्यास त्यांना शांत आणि गाढ झोप यायला मदत होते. ज्यामुळे मुलं वेळेत झोपतात आणि झोप पूर्ण झाली की सकाळी वेळेत उठतातही.