महिलांना अनेकदा सतत थकवा येतो. सततची घरातली कामं, ऑफीस, सणवार, येणारजाणार हे सगळे करुन त्यांना थकवा आला असेल असा आपण अंदाज लावतो. एखादवेळी ही कारणे असतातच. पण सततच असे होत असेल तर शरीरात असणाऱ्या विविध प्रकारच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे, चिडचिडीचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह तसेच हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसते. लोह हे आपल्या शरीरातले सर्वात महत्त्वाचे खनिज असून शरीरात लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर आरोग्याच्या समस्या भेडसावतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शरीराला लोहाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते (6 Foods to fight iron deficiencies).
लोह आणि हिमोग्लोबिन हे घटक एकमेकांशी कनेक्टेड असल्याने दोघांचे शरीरातील प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. लोह वाढवण्यासाठी आहारात लोह असलेल्या पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते. लोहाची आवश्यकता सगळ्यांनाच असते मात्र लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वयस्कर व्यक्ती यांना रक्ताची आणि त्यातील लोहाचे प्रमाण योग्य असण्याची आवश्यकता असते. लोहाची कमतरता झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी डॉक्टर अनेकदा सप्लिमेंटसही लिहून देतात. मात्र त्यापेक्षा आहारातून नैसर्गिकपणे हा घटक पोटात गेल्यास केव्हाही जास्त चांगले. पाहूया लोहाची कमतरता होऊ नये यासाठी आहारात असायलाच हवेत असे पदार्थ...
१. पाल्यासहित बीट
बीटात लोहाचे प्रमाण जास्त असते हे आपल्याला माहित आहे. ही पाने आपण क्वचितच आणतो. या पानांची चव ही पालकासारखीच असते मात्र त्यामध्ये लोहाचे प्रमाण खूप चांगले असल्याने बीटासोबतच त्याची पानेही आवर्जून खायला हवीत.
२. काळे मनुके
गर्भवती महिला, लहान मुले आणि सगळ्यांनीच रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे मनुके आवर्जून खायला हवेत. भिजवलेले हे मनुके नुसते किंवा ओटस, शेक यामध्ये घालूनही खाऊ शकतो.
३. तीळ
थंडीच्या दिवसांत खाल्ले जाणारे तीळ हे प्रकृतीने उष्ण आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतात हे आपल्याला माहित आहे. मात्र त्यात लोहाचे प्रमाणही चांगले असते. म्हणूनच तिळाची चटणी, लाडू, कूट यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
४. बाजरी
आपण बाजरी फारच कमी प्रमाणात खातो. मात्र त्यातही लोहाचे प्रमाण चांगले असल्याने बाजरीची भाकरी, खिचडी, डोसे खायला हवेत.
५. शेवग्याची पाने
शेवगा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असल्याने आमटी, कढीत आपण शेवग्याचा वापर करतो. पण या शेवग्याची पाने मात्र विशेष खाल्ली जात नाहीत. पण या पानांमध्ये लोह जास्त असल्याने आमटी, सांबार, यांमध्ये ही पाने आवर्जून वापरायला हवीत.
६. खारीक पावडर
खजूर हा लोहाचा चांगला स्त्रोत असतो हे आपल्याला माहित आहे. पण त्यापेक्षाही खारीक किंवा खारकेच्या पूडमध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्याने लाडूत किंवा दूधातून घेण्यासाठी खारीक पावडरचा अवश्य वापर करायला हवा.