मुलं आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी शिकतात. लहानपणापासूनच मुलांमध्ये कधी चांगल्या सवयी तर कधी वाईट सवयी निर्माण होतात. पालक विशेषतः लहानपणापासूनच मुलांना अशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात ज्या आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतील. प्रत्येक आई-बाबांना असं वाटतं की, त्यांचं मूल आयुष्यात नेहमीच पुढे जावं. काही चांगल्या सवयी या लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवल्या पाहिजेत. लहानपणी मुलं जे काही शिकतात ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतं आणि कुठेतरी त्यांच्या आयुष्यावर परिणाम करतं. लहानपणापासूनच मुलांना कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत ते जाणून घेऊया...
घरच्या जेवणाची सवय
लहान मुलं घरचं अन्न पाहिलं की नाक मुरडतात, त्यांना चटपटीत, बाहेरचे पदार्थ हे खाण्यासाठी हवे असतात. त्यामुळे मुलांना खूश करण्यासाठी प्रोसेस्ड फूड खायला देऊ नये. पालकांनी मुलांना घरी शिजवलेलं अन्न आणि फळं खाण्याची सवय लावावी.
फिजिकल एक्टिव्हिटी शिकवणं
मुलांना निरोगी ठेवण्यासाठी फिजिकल एक्टिव्हिटी शिकवण्याची आवश्यकता आहे. मुलांना सकाळी धावायला, गार्डनमध्ये फिरायला घेऊन जा, घरी योगा करा, व्यायाम करा किंवा डान्स करा इत्यादी सवयी पालक लहानपणापासूनच मुलांना शिकवू शकतात. यामुळे मुले फिट राहतात.
बचत करण्याची सवय
पालकांनी त्यांच्या मुलांना काही पैसे देऊन बचतीबद्दल नक्कीच समजावून सांगितलं पाहिजे. मुलांना बचतीबद्दल सांगून आणि बचत कशी करावी हे शिकवून, पालक त्यांना जीवनातील सर्वात मोठा धडा शिकवू शकतात.
कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेचं महत्त्व
मुलांना कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेचं महत्त्व शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. मुलं दिवसभर मित्रा-मैत्रिणींसोबत कितीही वेळ घालवत असली तरी त्यांना कुटुंबाच्या वेळेचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे. संध्याकाळी मुलांसोबत जेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा.
स्वच्छतेची आवड
मुलांना स्वच्छतेची सवय लावणं देखील खूप महत्त्वाचं आहे. मुलांना स्वच्छता कशी करायची हे शिकवा. यामुळे मुले मोठी झाल्यावरही त्यांची खोली आणि परिसर स्वच्छ ठेवतील.
आदराची भावना
मुलांना हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे की, केवळ वय किंवा स्थिती पाहून नव्हे तर सर्वांनाच आदर दिला पाहिजे. स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या किंवा स्वतःसाठी काम करणाऱ्या लोकांचाही आदर केला पाहिजे.