आपली मुले दिवसभर मोबाईल फोनला चिकटलेली असतात, हा आज कित्येक पालकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. सध्याच्या काळात लहान मुलं आणि मोबाईल फोन यांचं नात अधिक जवळच होत असल्याचे दिसत आहे. शक्यतो आजकालच्या लहान मुलांना जेवताना, झोपताना, अभ्यास करताना, खेळताना मोबाईल फोनच हातात हवा असतो. काही मुलं तर फोन हातात घेतल्याशिवाय जेवत नाहीत तसेच झोपताना देखील त्यांना हातात फोन हवा असतो. हातात मोबाईल दिल्यावरच पोटभर जेवण जाते असे अनेक मुलांबाबत घडताना आपल्याला आजूबाजूला दिसून येते. म्हणजेच, जर मुलाच्या पोटात चार घास जायला हवे असतील तर त्यांना फोन दाखवावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत मोबाईल फोन बघण्याने मुलांवर केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही घातक परिणाम होत आहे. अनेक मुले सकाळी उठल्यावर मोबाईल फोन हातात घेतात ते रात्रीपर्यंत त्यातच हरवलेली असतात.यामुळे मुलांच्या नाजूक डोळ्यांवर तर परिणाम होतो आहेच, पण त्यांच्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर देखील प्रचंड परिणाम होतोय.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मोबाईल फोन आणि इंटरनेट अॅक्सेसिबिलीटी असलेल्या इतर उपकरणाचा वापर करणाऱ्या मुलांवर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास केला आहे. त्यांनुसार २३. ८० % मुले झोपण्यापूर्वी स्मार्ट फोन वापरतात. वाढत्या वयानुसार ही प्रवृत्ती वाढत जाते, त्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. या अभ्यासांतून असे समोर आले आहे की, २३. ८०% मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरतात, ३१. १५% मुलांमध्ये स्मार्टफोनच्या वापरामुळे एकाग्रतेची कमतरता जाणवते. ५.३० % मुलं दिवसभरातील ४ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोनमध्ये घालवतात. ३२.७ % मुले अभ्यास करताना स्मार्टफोन चेक करतात(8 Creative Ways To Break Your Child's Smartphone Addiction).
मुलांच्या हातांतून मोबाईल फोन सोडवण्यासाठी नेमकं काय करावं ?
१. पालकांनी स्वतःपासून सुरुवात करावी :- पालकांना जर आपल्या मुलाच्या वाढत्या स्क्रीन टाइममध्ये समतोल ठेवायचा असेल, तर याची सुरुवात पालकांनी स्वत:पासून करण्याची गरज आहे. लहान मुलांना एखादी गोष्ट आपल्यासाठी किती चांगली किती वाईट हे समजून घेण्याइतपत निर्णयक्षमता नसते, हे लक्षात घेत पालकांनी या मोबाइलचा वापर किती, केव्हा, कसा करावा याबद्दल मुलांशी मुक्त संवाद साधावा. याचप्रमाणे लहान मुलं नेहमी आपल्यासारख्या मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात. आपण जसे वागतो, बोलतो, इतर काही गोष्टी करतो त्यांचे तंतोतंत अनुकरण करुन मुलं देखील तशीच वागत असतात. त्यामुळे पालकांनी देखील मुलांसमोर तासंतास वेळ मोबाईलवर घालवू नये. मोबाईलचा वापर कमी करावा किंवा गरजेपुरताच करावा असे अनेकदा स्वत:च्या कृती मधूनही पालकांना हे सांगता येऊ शकते,ही सर्वात महत्वाची गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे.
२. मुलांकडून मोबाईल फोन एकदम हिसकावून घेऊ नये :- आपल्या मुलाने सतत मोबाईल बघण्याची किंवा जेवताना, झोपताना मोबाईल बघण्याची सवय सोडावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी घाई करू नका. अर्थात ‘उद्यापासून मोबाईल बंद म्हणजे बंद’ असे करून चालणार नाही. 'उद्यापासून मोबाईलला हात देखील लावायचा नाही' असे ओरडणे आधी थांबवा. मुलांच्या हातातून एकदम मोबाइल फोन हिसकावून घेण्याऐवजी मुलांच्या कलाकलाने घेत मोबाइल अतिवापराचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगावेत. मुलांच्या हातांतून मोबाईल फोन एकदम हिसकावून चुकीचे आहे. मोबाइल अतिवापराचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगितल्याने ते स्वतःच हळुहळु मोबाईलचा वापर कमी करतील.
३. घरांतील इतर कामांमध्ये मुलांना सहभागी करुन घ्यावे :- मुलांच्या हातांतून मोबाईल फोन सोडवायचा असल्यास मुलांना घरांतील इतर कामांमध्ये सहभागी करुन घ्यावे. सतत मोबाईल फोन वापरण्याची मुलांची सवय सोडवण्यासाठी मुलांना घरातील लहान मोठ्या कामांमध्ये गुंतवून ठेवा. उदाहरणार्थ :- झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, टेबल पुसणे. अशी लहान लहान कामं सांगितली तर त्यांचं मन रमेल, तसंच एखादं काम करताना चूक झाली तर ती कशी सावरायची हे देखील त्यांना कळेल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो तसेच वारंवार मोबाईल वापरण्याची सवय हळुहळु मोडेल.
मुलांच्या हातात स्क्रीन देताय की त्यांना संकटात लोटता आहात? ५ सुरक्षा नियम मुलांना आजच सांगा...
४. मुलांना छंद जोपासण्यास प्रोत्साहित करा :- मुलांकडून मोबाईलचा सतत होणारा वापर रोखण्यासाठी मुलांना त्यांच्या आवडीचे छंद जोपासण्यास प्रवृत्त करा. मुलांमधील प्रत्येक कलागुणांना वाव देणं अत्यंत गरजेचं असत. त्यामुळे मुलांमधील कलागुण ओळखा व त्यात त्यांना आवड निर्माण करुन प्रोत्साहित करण्यास प्रयत्न करा. पेंटिंग, डान्स, म्युझिक किंवा अन्य कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात ते त्यांच्याकडून जाणून घ्या. व जेव्हा जेव्हा मुलं हातात फोन घेऊन बसतील तेव्हा त्यांना याच कलांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा.
५. व्यायाम व मैदानी खेळ खेळायची सवय लावा :- अनेक लहान मुलं सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल फोन हातात घेऊन बसतात. पण, त्याऐवजी मुलांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय लावावी. याचबरोबर मैदानी खेळ खेळायला बाहेर पाठवावे. मुलांचं हे वय घरात बसण्याचं नसून मैदानात खेळण्याचं आहे. यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते.
६. पालकांनी मुलांना मोबाईल फोनचे आमिष दाखवू नये:- अनेक पालक मुलं जेवत नसतील किंवा ऐकत नसतील तर त्यांना मोबाईल फोन देण्याचं आमिष दाखवतात. अमूक काम केलं तर मोबाईल देईन असं सांगतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे. मुलांमध्ये त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते व कोणतंही काम करण्यापूर्वी ते प्रथम बदल्यात काय देणार असा प्रश्न उपस्थित करु लागतात. यामुळे पालकांनी वारंवार मुलांना मोबाईल फोन देण्याचे आमिष दाखवू नये.
मोबाइल हातात दिला नाही तर मुलं जेवतच नाहीत? ५ टिप्स, मोबाइल सोडवा-मुलांना पोटभर भरवा...
७. मोबाईल फोन पाहण्याची एकच वेळ निश्चित करावी :- मुलं सतत मोबाईल फोन घेऊन बसत असतील किंवा जेवताना, झोपताना मोबाईल फोन मागत असतील तर त्यांच्यासाठी मोबाईल पाहण्याची एकच वेळ निश्चित करावी. दिवसांतून एखादवेळी अर्धा तास किंवा आपल्या व मुलांच्या आवडीनुसार मोबाईल फोन वापरण्याची एक वेळ निश्चित करावी. तसेच नेमून दिलेल्या या वेळातच मुलांनी व पालकांनी मोबाईल फोनचा वापर करावा. यामुळे मुलांच्या दिवसभर मोबाईल वापरण्याच्या सवयीवर नियंत्रण येईल आणि हळूहळू ही सवय सुध्दा निघून जाईल.
८. झोपताना खोली मोबाइल फ्री राहील असे पाहा :- मुलांचा किंवा आपला फोन झोपताना बेडरुममध्ये राहणार नाही याची काळजी घ्या. एकदा आपण झोपताना फोन जवळ घेतला की नकळत आपण त्यावर काही ना काही करत राहतो आणि त्यामुळे झोप तर जातेच पण विनाकारण फोन बघत राहायची सवय लागते, त्यामुळे आपला आणि मुलांचा मोबाइल झोपायच्या वेळेला आवर्जून खोलीच्या बाहेर राहील असे पाहावे.