Join us  

आई कुठे काय करते म्हणत ईशा आईसह घरच्यांना सतत का छळते, ‘अशी’ का वागते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 3:43 PM

घरोघरचे लाडावलेले ‘बबडे’ आणि ‘ईशा’ आई-वडिलांना छळतात, त्यांना कसं आवरायचं?

ठळक मुद्दे घरोघर बंड्या, बबड्या, ईशा यांची संख्या वाढते आहे, हा काळजीचा विषय आहे!

डॉ. विजय पांढरीपांडे

आईच्या अति लाडाने वाया गेलेला ‘बबड्या’ आपण याआधी एका मराठी मालिकेत पाहिला. आता सध्या ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेतील ईशाने त्या आधीच्या बबड्याची जागा घेतली आहे. या मालिकेतील कुटुंब जुन्या-नव्याचा छान संगम असलेले, एकमेकांवर प्रेम करणारे असले तरी यातले प्रत्येक पात्र संघर्षग्रस्त आहे. प्रत्येकाची वाटचाल चुका करीतच पुढे जाते. घरातील मोठी माणसे त्या-त्या वेळी सर्वांना सांभाळून घेतात. तरी चुका व्हायच्या थांबत नाहीत. कारण प्रत्येकाला वाटते, आपलेच खरे, आपणच बरोबर. असे वागणे हा आपला हक्क. हे आपले स्वातंत्र्य! आपण हवे तसे वागण्यास मोकळे. त्यात दुसऱ्याला काय वाटेल, आपल्या वागण्याचा कुटुंबावर, घरातील नात्यावर काय परिणाम होईल याची पर्वा नाही.

ही खरी याच नव्हे, तर आपल्या अवतीभोवतीच्या अनेक कुटुंबाची शोकांतिका असते.आपण प्रत्येक जण आपल्या परीने योग्यच असतो. कारण आपण फक्त आपला स्वकेंद्रित विचार करीत असतो; पण आपण घरात, बाहेर, समाजात एकटे नाही हे विसरतो. माणसे घरात एकत्र असली तरी ती परक्यासारखी वागतात. आपल्याच विश्वात रमलेली असतात.आई कुठे काय करते मालिकेत सध्या ईशा विरुद्ध आई हा कटू सामना म्हणजे कळस वाटतो आईच्या दुर्लक्षित मायेचा. तिच्या घरासाठी केलेल्या विस्मृतीत गेलेल्या त्यागाचा. खरे तर ईशाचे घरात नको तितके लाड झाले आहेत. तिला साऱ्यांनी फुलासारखे जपले आहे. तिच्या चुका सांभाळून घेतल्या आहेत. तिचा अल्लडपणा सहन केलाय. ती फक्त वयाने वाढली. विचाराने नाही.आजच्या पिढीतील बहुतेकांना (प्रत्येक बाबतीत अपवाद असतातच) सगळे इन्स्टंट हवे असते. कष्ट न करता पदरी पाडून घ्यायचे असते. पायरी पायरीने चढणे यांना मान्य नसते. एकदम उडी मारत थेट शिखरावर पोहोचायचे असते. आपण म्हणू तेव्हा म्हणू ते सुख पायघड्या घालत आपसूक नशिबात यावे ही यांची अपेक्षा असते. हवे ते हवे तेव्हा मिळाले नाही तर यांचा त्रागा होतो. ते आकाशपाताळ एक करणार! ईशा या बेधुंद, बेजबाबदार तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. अभ्यास न करता क्यारी ऑन मागणाऱ्या विद्यार्थ्याची, कसातरी जुगाड करून पदवीचा कागद मिळविण्याची धडपड करणाऱ्या विद्यार्थ्याचं ईशा प्रतिनिधित्व करते की काय असं वाटतं! त्यामुळे तिची फक्त कीव करावीशी वाटते.पालकांनी आपला हट्ट पुरविणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अन् तो आम्ही मिळविणारच ही ईशासारख्या मुलांची प्रतिज्ञा असते. मला हवे ते, हवे तितके, हवे तेव्हा मिळालेच पाहिजे. हे त्यांचे घोषवाक्य. बाकी दुनिया जाये भाडमे ही बेदरकार वृत्ती!

ईशा मालिकेत आताशा तसेच वागते आहे. ती चक्क आपल्या आईशी स्पर्धा करते आहे. तिला नवे ठेवण्यात, तिच्यातले दोष शोधण्यात तिला धन्यता वाटते! आपली योग्यता, आपले वय, आपला जीवनाचा अनुभव, या कसल्याचाही विचार न करता ती तोंडाला येईल ते बोलत सुटते. आपल्या प्रियकराने, नुकत्याच लग्न झालेल्या नवऱ्याने आपल्या तालावर नाचावे ही तिची अपेक्षा.इथे ही पिढी फक्त स्वार्थाचा, स्वतःचा विचार करताना दिसते. स्वतःचे खरे करून घेण्यासाठी प्रसंगी घरच्यांना इमोशनली ब्लॅकमेल करते. अश्रूंचादेखील बाजार करता येतो. रडून आपले म्हणणे खरे असे भासविता येते. ईशा तेच करते आहे.खरे तर तरुण वयात आल्यावर समज यायला हवी. मागचापुढचा विवेकी विचार हवा. मुख्य म्हणजे आपल्या बोलण्यावागण्याचा घरच्यांवर, अवतीभवतीच्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला हवा; पण तात्पुरते सुख, इन्स्टंट आनंद, तत्काळ इच्छापूर्ती हाच एकमेव उद्देश असल्यानं मग पुढे गेल्यावर, चूक उमगल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण तेव्हा उपयोग नसतो. वेळ निघून गेलेली असते. घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत! हे ‘ईशाला’ कधी कळणार? शिकल्यासवरलेल्या, सो कॉल्ड संस्कारी घरातही हे प्रकार घडतात. लहानांबरोबर मोठेही कधीकधी लहान होतात. चुका सावरण्याऐवजी चुकीची बाजू घेतात. कडक भाषेत समजावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिची बाजू घेतात.ईशा हे एक उदाहरण झाले. आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या ईशासारख्या अनेक मुला-मुलींचं वागणं ही घातक आधुनिक प्रवृत्ती झाली आहे. घरोघर बंड्या, बबड्या, ईशा यांची संख्या वाढते आहे, हा काळजीचा विषय आहे!

टॅग्स :पालकत्वआई कुठे काय करते मालिका