Join us  

अभिनेत्री आदिती शारंगधरने मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी शोधला भन्नाट उपाय, मोबाइलचा नाद सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 3:51 PM

Aditi Sarangdhar Parenting Tips for Mobile addiction of Child : तुम्हीही करु शकता मुलांचा मोबाइल दूर होण्यासाठी असे उपाय...

ठळक मुद्देमुलांना स्क्रीनपासून दूर करायचं तर त्यांना तसा सक्षम पर्याय द्यायला हवा

हल्ली कधीही बघावं तेव्हा मुलं स्क्रीनलाच चिकटलेली असतात. कधी ती मोबाइलची स्क्रीन, कधी टीव्हीची तर कधी लॅपटॉप नाहीतर टॅबलेटची. अशाप्रकारे मुलं सतत स्क्रीनवर असणं त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी किंवा विकासासाठी अजिबात चांगलं नाही. हे पालकांना माहित असूनही मुलांचं हे व्यसन कसं सोडायचं असा प्रश्न पालकांसमोर असतो.(Mobile Addiction) कधीतरी पालकांनीच त्यांच्या हातात फोन दिल्यामुळे किंवा त्यांच्यासमोर टिव्ही पाहिल्यामुळे नकळत त्यांनाही ते व्यसन लागते. एकदा स्क्रीनची सवय लागली की मोठ्यांना ती सोडणे अवघड जाते तर लहान मुलांची वेगळी काय गत असणार (Parenting Tips). वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, व्हिडिओ, गाणी यांमध्ये मुले इतकी रमून जातात की त्यांना आजुबाजूला सुरू असणाऱ्या कोणत्याच गोष्टींचे भान राहत नाही. ही समस्या घरोघरची आहे. अभिनेत्री आदिती सारंगधरने मात्र त्यावर एक फार कल्पक आणि आनंददायी उपाय शोधला आहे.  (Aditi Sarangdhar). 

(Image : Google)

'वादळवाट' फेम अभिनेत्री आदिती सारंगधर ही आपल्याला काही दिवसांपूर्वी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’या मालिकेद्वारे भेटली होती. अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या आदितीने आजवर अनेक चांगल्या भूमिका साकारलेल्या आहेत. पण पडद्यावर भूमिका साकारत असताना ती एका मुलाच्या आईची भूमिका खऱ्या आयुष्यात निभावत आहे. नुकताच याबद्दलचा आपला अनुभव ‘राजश्री मराठी’शी बोलताना सांगितला. आपण मुलाला मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी काय काय करतो याविषयी आदितीने या मुलाखतीत सांगितले. तर मुलाचा स्क्रीन टाईम कमी व्हावा यासाठी तिने अनोखी शक्कल लढवली आहे.

लहान मुलांच्या मनावरही असतो स्ट्रेस; ५ उपाय-मुलांची मानसिक वाढही होईल उत्तम

तिच्या मुलाचे नाव अरिन असून त्याच्यासोबतचे काही फोटो किंवा व्हिडिओ आदिती सोशल मीडियावर बरेचवेळा शेअर करताना दिसते. अनेकदा आपण मुलं स्क्रीनपासून दूर व्हावीत म्हणून त्यांना काहीतरी दुसरे करायला देतो. मात्र त्यामध्ये ते रमतातच असे नाही. अशावेळी त्यांना काय आवडेल ते शोधून काढून ते करायला दिल्यास ते त्यामध्ये जास्त काळ रमताना दिसतात. 

 

आदिती म्हणते, “मुलाचा स्क्रीन टाइम कमी व्हावा म्हणून अनेकदा मी त्याला काहीतरी करायला दिलं आणि बाहेर पडले तर तो थोड्या वेळाने कंटाळतो हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे  टीव्ही किंवा मोबाइलचा वेळ कमी करण्यासाठी त्याच्या सुट्टीच्यावेळी मी विविध रंगाचे प्लेन टीशर्ट मागवते, त्यासोबत काही ॲक्रेलिक रंगही मागवते. मुलानं त्यावर हवं ते चित्र किंवा डिझाइन काढावं. तो त्यावर त्याला हवी ती चित्रं काढतो. विशेष म्हणजे त्याने रंगवलेले हे कपडे मी रोज, अगदी बाहेर जाताना सुद्धा घालते. त्याची ही कलाकुसर मी सगळीकडे मिरवते. त्यालाही स्वत:च्या चित्रांविषयी छान वाटते.  न्यू एज पॅरेंटिंगचा फंडा आता मी असा स्वीकारते आहे.’’आदितीचा हा प्रयत्न अत्यंत कल्पक आणि सुंदर आहे. मुलांच्या हातातून मोबाइल काढायचे तर असे सृजनशील पर्याय पालकांनीही शोधायला हवे.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल