मुलगी वयात यायला लागली, पाळी सुरु झाली की तिचं शरीर बदलू लागते. मुलीच्या छातीचा आकार वाढतो आणि आई तिला एकेक सूचना देणं सुरु करते. आईला मुलीची काळजी असते, या वयातले धोके आणि हवेहवेसे बदलही तिला माहिती असतात. पण आई बोलते भलतंच, चिडून सांगते भलतंच. असं का होतं? आपली काळजी मुलीच्या वाढीच्या वयात तिच्या शरीर-मनावर तर परिणाम करणार नाही ना, यासाठी आईने काय करायला हवं.
हे सुमिताचंच उदाहरण घ्या. सुमिता गेल्या काही दिवसांपासून खूपच संकोचल्यासारखी वागत होती. कोणी तिच्याकडे बघायला लागलं की ती अस्वस्थ व्हायची. पटकन तिथून निघून जायची. खो-खो तर तिला प्रचंड आवडतो, पण गेल्या कित्येक दिवसांपासून खो खोच्या प्रॅक्टिसला जाणंही बंद होतं तिचं. सकाळी आंघोळीला गेल्यावर लवकर बाहेर येत नव्हती. आंघोळ करुन आल्यावर तर फारच टेन्स दिसायची. सुमिताला काय होतंय हे काही तिच्या आईला कळत नव्हतं.इकडे आईला सुमिता मोठी होत चालल्याच्या खुणा तिच्या शरीरावर दिसू लागल्या होत्या. म्हणून तिचं सारखं आपलं सुमिता जास्त घट्ट कपडे घालू नको. बाहेर वागताना जरा नीट वाग अशा सूचना देणं चालू होतं. आईच्या या सूचना ऐकल्यावर सुमिताला 'आपण काहीतरी विचित्र दिसतोय' असं वाटायचं आणि ती आणखीनच बिचकून जायची. तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागला.
(Image : google)आंघोळ करताना हाताला गाठीसारख्या लागणाऱ्या छातीमुळे सुमिताला फार टेन्शन आलं होतं. ही आपली वाढलेली छाती कोणाला दिसू नये म्हणून सुमिता धडपड करायची. आणि सुमिताची आई मात्र सुमिताचा अस्वस्थपणा, तिच्या मनातली चलबिचल समजून न घेता तिला फक्त वागण्याच्या सूचना देत राहायची. सुमिताला जवळ घेवून सुचनांच्या पलिकडे जावून तिच्या आईने तिच्याशी बोलण्याची गरज होती. आपल्या मुलीच्या शरीरावर जे नवीन उमलून येत आहे त्या अवयवाबद्दल आईने सुमिताशी संवेदनशीलपणे पण तिला समजेल अशा शास्त्रीय भाषेत समजावून सांगणे, बदलत चालेल्या तिच्या शरीराची तिला ओळख करुन देणे हे महत्त्वाचं होतं. पण तसं घडत मात्र नव्हतं. म्हणूनच तर सुमिताच्या मनावरचा ताण वाढत चालला होता.
आईने सुमिताशी काय बोलायला हवं ?१. तू असं दडपून वागण्याची, संकोचून जाण्याची, अंग चोरुन वावरण्याची काहीच गरज नाही. तुझी फक्त एकटीचीच छाती वाढतेय असं अजिबात नाही. तुझ्या वयाच्या सर्व मुलींच्या बाबातीत हे असंच होतं. हा शरीराच्या वाढीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. छातीचा आकार वाढण्यासारखे शरीरात जे बदल होतात ते आपल्या शरीरातल्या बदलत जाणाऱ्या हार्मोन्समुळे. हार्मोन्समुळे शरीरात जे अनेक बदल होतात त्या बदलातला एक भाग म्हणजे छातीची अर्थात स्तनांची वाढ होणे.- स्तनांची वाढ होते कारण आपण सस्तन प्राणी आहोत. सस्तन प्राणी पूर्ण वाढ झालेल्या बाळांना जन्म देतात. मग ही बाळं स्तनांच्याद्वारे आईचं दूध पितात. म्हणून सस्तन प्राण्यांना स्तन असतात.२. मुलं आणि मुली दोघांमध्येही या पेशी असतात. पण या पेशींची वाढ मात्र फक्त मुलींमधेच होते. कारण स्तनांची वाढ होण्यासाठी लागणारं इस्ट्रोजन नावाचं हार्मोन मुलींमध्ये अधिक प्रमाणात असतं.
(Image : google)
३. स्तन वाढताय म्हणून सुरुवातीला अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण म्हणून आपली नेहमीची कामं बाजूला सारण्याची गरज नाही. तुला छान वाटण्यासाठी तू फिटिंग्जच्या स्लिप घाल. तुला हवी असल्यास स्पोर्ट्स ब्रा घाल. आणि नियमित खो खोच्या प्रॅक्टिसला जा..४. या अशा बोलण्याने सुमितासारख्या मुली मोकळ्या होतात. त्यांच्या मनावरचं दडपण उतरतं. वाढीच्या वयात शरीरात होणाऱ्या बदलांना त्या अधिक आत्मविश्वासाने सामोऱ्या जातात. या बोलण्याने आईचं आणि मुलीचं नातं अधिक घट्ट होतं ते वेगळंच.
विशेष माहिती सहकार्य : डॉ . वैशाली देशमुख( टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ)वयात येणाऱ्या मुलींशी आईने काय बोलायचं, तिच्याशी कसं वागायचं याबद्दल अधिक वाचा या लिंकवरhttps://urjaa.online/why-breast-size-increase-during-puberty/