Join us  

मुलं वयात आली-शारीरिक बदल होऊ लागले तर कसं डील करायचं? वाचा तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 6:31 PM

Adolescent Physical Changes in Body Parenting Tips : शरीरातील बदलांमुळे येणारा अस्वस्थपणा, मनातील कामुक भावना यांना तर मुलामुलींना सामोरं जावं लागतं. हे बदल पालक म्हणून आपण नक्कीच समजून घ्यायला हवेत.

ठळक मुद्देपौंगडावस्थेत मुला-मुलींमध्ये काय बदल होतात हे समजून घेणे आवश्यक असते.शारीरिक बदलांच्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो हे समजून घ्यायला हवे.

डॉ. लीना मोहाडीकर

आपलं मूल वयात आलं की त्याच्या शरीरात आणि मानसिकतेत अचानक बदल व्हायला लागतात. हे बदल मुलांना आणि पालक म्हणून आपल्यालाही बरेच नवीन असतात. पण या बदलांशी योग्य पद्धतीने डील करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. त्यामुळे हा बदल सगळ्यांसाठीच सुकर होतो. मुलामुलीमधले हे बदल काही एकदम नाही घडत. जननेंद्रियांमधील स्थित्यंतरं दीड-दोन वर्षात हळूहळू घडतात. त्या काळात हे बदल विशेष जाणवत नाहीत. मात्र या काळीत मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते आणि मुलांमध्ये वीर्यपतन होऊन लिंग ताठरता येते. मुलींचं तारुण्यात पदार्पण करण्याचं वय १२ / १३, तर मुलांचं वय १४ / १५ असत. ही मुलं मुली शरीराने प्रजोत्पादनक्षम झाली असली तरी बुद्धीने, विचारांनी अपरिपक्व असतात. त्यामुळेच शरीरातील बदलांमुळे येणारा अस्वस्थपणा, मनातील कामुक भावना यांना तर मुलामुलींना सामोरं जावं लागतं. हे बदल पालक म्हणून आपण नक्कीच समजून घ्यायला हवेत (Adolescent Physical Changes in Body Parenting Tips).

(Image : Google)

मुलांमध्ये होतात हे शारीरिक बदल

वयात आलेल्या मुलांमध्ये पुरुष अंतस्रावांचं (टेस्टेस्टेरॉन या हॉर्मोनचं) प्रमाण वाढू लागतं. त्यांचा वापर करून अंडकोशातील पेशी शुक्राणूंची उत्पती सुरू करतात. त्याच स्त्रावामुळे लिंगाचा आकार मोठा होतो आणि लिंगताठरता वारंवार येऊ लागते. तयार होणाऱ्या शुक्राणूंच्या वहनासाठी आवश्यक अशा स्त्रावांची निर्मिती प्रोस्टेट, सेमिनल व्हेसिकल्स, कॉपर्स ग्रंथी या पुरुषग्रंथीमध्ये नियमितपणे होऊ लागते. हे स्त्राव आणि अंडकोशातील शुक्राणू मिळून वीर्य बनतं. दाढीमिशा येणं, स्वरयंत्राचा आकार वाढल्याने आवाज फुटणं ही पुरुषी लक्षणं शरीरावर दिसू लागतात. हाडं आणि स्नायू यांची वाढ होते, काखेत आणि जननेंद्रियांवर केस येतात.

(Image : Google)

मुलींमध्ये होणारे बदल मुलींमध्ये गर्भाशय, बीजांडकोष, बीजांडवाहिन्या, यांची वाढ होते. योनीमार्ग मोठा होतो. गर्भधारणेसाठी स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया आणि गर्भपालनासाठी गर्भाशयाच्या अंतर्रचनेत योग्य ते बदल हे स्त्री अंतस्रावांमुळे घडून येतात. तयार झालेल्या स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्राणूशी संयोग न झाल्यास स्त्रीबीज मृत होतं. आता गर्भाशयाच्या जास्त वाढलेल्या अंतस्त्वचेची जरूरी नसल्याने ती योनीमार्गातून बाहेर पडू लागते. या अंतस्त्वचेलाजोडलेल्या छोट्या रक्तवाहिन्याही फुटल्या गेल्याने रक्तस्त्राव सुरू होतो, ज्याला मासिक पाळी म्हणतात. मासिकपाळी आणि बीजनिर्मिती या घटना चक्राकार गतीने घडत राहतात ज्याला स्त्रीचं ऋतुचक्र म्हणतात. एका चक्रात एकच स्त्रीबीज (एका चक्रात डाव्या अंडकोषात, दुसऱ्या चक्रात उजव्या अंडकोषात याप्रमाणे) तयार होत असतं; बीजोत्पती सुरू झाली की ते बीज फलित होऊन गर्भाशयात वाढू लागलं की स्तनांमध्ये दुग्ध निर्मिती सुरू व्हायला हवी म्हणून आधीपासूनच स्तनांमध्ये दुग्धस्त्रावी ग्रंथींची, ग्रंथींच्या आधारासाठी चरबीची वाढ होत असते, त्यामुळे स्तनांचा आकार वाढलेला असतो. स्त्रीअंतस्त्रावांच्या प्रभावामुळेच स्त्रीच्या अवयवांना नाजुकपणा, गोलाई आणि कांतीला मोहकता येते. 

(क्रमश:)

टॅग्स :पालकत्वआरोग्य