Join us  

कोरोनानंतर मुलं शाळेत परतणार; पण पालकांचं काय? त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा जीव गुदमरेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 1:53 PM

शनिवार-रविवारची सुटी आणि सोमवारी शाळा इतकं सोपं नाही मुलांसाठी २ वर्षांनंतर पूर्णवेळ शाळेत जाणं. वाढलेला स्क्रीन टाइम ते मानसिक-सामाजिक आरोग्याच्या समस्या आणि अभ्यासाचा ताण असं सारं सोबत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पालक काय करणार?

ठळक मुद्देअभ्यासक्रमातील पायाभूत कौशल्य शिकण्याबरोबरच मानसिक, भावनिक, सामाजिक- शारीरिक शिक्षण या पातळीवर मुलांचं नुकसान झालेलं आहे.

सुवर्णा खराडे

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सज्ज होत आहेत. खरंतर कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि मुलांनी शिकण्यासाठी प्रयत्न केले गेले. मध्ये काही दिवस शाळा सुरू झाल्यादेखील. पण, हे खरंय की, आपली मुलं एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत ढकलली गेली आहेत. ‘ढकलणं’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरत आहे कारण आपल्या मुलाचं शिक्षण आधीच्याच इयत्तेत थांबलेले आहे. आता इयत्ता बदलली असली आपली मूल शाळेत जाणार असले तरी हे शैक्षणिक वर्षे सुरू होत असताना पालकांनी काही गोष्टी जाणीव आणि उणिवेच्या पातळीवर स्वत:शीच बोलायची गरज निर्माण झालेली आहे.आता आपली लगबग सुरू आहे की, मुलं शाळेत जाणार तर त्याला ज्या ज्या भौतिक गोष्टींची गरज आहे, त्या खरेदी करायच्या. त्याला शाळेत पाठवायचं. पण, त्याला जितकी गरज भौतिक गोष्टी देण्याची आहे, त्यासोबतच पालक म्हणून भावनिक, मानसिक आणि सामाजिक पातळ्यावरही आपली मुलं खरंच शाळेत जायला तयार आहे का? त्याच्या मनात अजूनही असा विचार येतोय की, नको आता कंटाळा आलाय? आणि आपण पालक खूप उत्साहात त्याला शाळेत पाठवण्याची तयारी करत आहेत. थोडं थांबून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे.गेले दोन वर्षात प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव न घेता ऑनलाइन पद्धतीने आपली मुलं शाळा शिकत होती. म्हणजेच फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. अर्थात काही मुलांना ही ऑनलाइन शिकण्याची साधनंही उपलब्ध नव्हती. पण, ज्यांना ती साधने उपलब्ध होती ती मुलं ते सारं वापरायला शिकली आणि आपण कधी कौतुकाने तर कधी त्रासून या ऑनलाइन शिकण्याविषयी व्यक्त होत राहिलो. मात्र या साऱ्याच अभ्यासक्रमातील पायाभूत कौशल्य शिकण्याबरोबरच मानसिक, भावनिक, सामाजिक- शारीरिक शिक्षण या पातळीवर मुलांचं नुकसान झालेलं आहे. ते भरून काढण्यासाठी पालक म्हणून नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं हे, उमजून घेणं महत्त्वाचं आहे.

(Image : google)

प्रश्नांची उत्तरं शोधणार कशी?

१. आपलं मूल शालेय पातळीवर शरीराने आणि मनाने उपस्थित राहावं यासाठी जो स्क्रीन टाइम वाढलेला आहे तो कमी करायचा आहे. त्यासाठी प्रत्यक्ष छोट्या छोट्या अनुभवाच्या पातळीवर जाऊन संवाद वाढवायचा आहे.२. दोन वर्षांत प्रत्यक्ष शैक्षणिक अनुभव न घेता आता आपलं मूल शाळेत पाऊल ठेवत आहे. हा काळ मोठा होता, शनिवार जाऊन रविवारची सुट्टी आणि परत सोमवारी शाळेत जायचं इतकं सोपं नाही ते मुलांसाठी. याकाळात जी एक पोकळी निर्माण झालेली आहे, म्हणजेच जी दोन वर्षे गेली ती एकदम भरून काढण्याचा अट्टहास न करता आता ज्या इयत्तेत मुलं आहे ते तिथंच असून तिथूनच सुरुवात करायची आहे, अशी मनाची तयारी असायला हवी.३. शाळा ही सामूहिक पातळीवरची संस्था आहे. तिथं येणारं प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या पातळीवर अनुभव घेऊन आलेलं असणार आहे. म्हणून आपलं मूल मागे पडण्याची भीती वाटून घेण्यापेक्षा मुलांना त्यांच्या पातळीवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. कोरोनाकाळात दैनंदिन व्यवहारात बदललेल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सवयी पूर्वपदावर आणण्यासाठी वर्तनाच्या पातळीवर सकारात्मक पद्धतीने कोणत्या प्रकारची छोटी छोटी पाऊल उचलावीत यासाठी शाळेसोबत कुटुंब आणि पालकांनाही संवादी रहावं लागेल.४. शिकताना मुलांना भावनिक आधाराची फार गरज आहे आणि पालक म्हणून आपण ती अधिक सजगतेने आपण समजून घेऊ शकतो, हे मनाशी नक्की असावे.५. कोरोना काळात प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकण्याची कोणत्याच प्रकारची संधी नव्हती आणि त्यामुळे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर अगदी सहज मिळतात आणि इंटरनेट वापरण्याची साधने बहुतांश पालकांकडे अगदी सहज उपलब्ध आहेत.

(Image : google)

६. पालकांना वाटतंच की, आपलं मूल मार्कांच्याबाबतीत पुढेच असायला हवं. त्यात लक्षात किती राहतं यावर आपली परीक्षापद्धत आधारलेली आहे. पण या सगळ्यात मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुळात प्रत्येक मूल एकाच पद्धतीने शिकत नाही. त्यामुळे शाळेत मिळालेल्या टक्क्यांवरून मुलांच्या गुणवत्तेची तुलना करत बसू नये. त्यापेक्षा मुलांना वेळ देऊन त्यांना प्रथमत: शैक्षणिक वातावरणात आनंदी व सुरक्षित कसं वाटेल, हे महत्त्वाचं आहे. मुलांचं सामाजिक आणि भावनिक आरोग्य जपणं आणि त्यासाठी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे.७. सर्वाधिक गरज आहे ती संयम ठेवून मुलांना सामाजिक पातळीवर खेळाच्या, गाण्याच्या, प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून बोलत करणं. अनेक मुलांना आपल्याला काय वाटतं, हे नेमकेपणे सांगता येत नाही, कारण त्यांची समज पक्की झालेली नसते. विशेषत: कोरोना महामारीच्या काळात तर प्रत्यक्ष अनुभव न मिळाल्याने त्यांना व्यक्त होता आलेलं नाही. तेव्हा त्यांनी बोलतं व्हावं म्हणून कृतियुक्त अनुभव शाळेसह घरातही देता यायला हवेत. घरात खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांचीच आहे.८. मुलांचा बुद्धिमत्ता विकास म्हणजे फक्त गुण मिळवणं नाही. मुलांनी सर्वांगीण शिक्षण घेताना, अभ्यासक्रम शिकताना कृतियुक्त अनुभव घ्यायला हवेत. तरच मुलं पूर्ण क्षमतेने शिकतात. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अंगांनी विचार करून अनुभवावर आधारित शिक्षण मुलांना मिळायला हवं. त्यासाठी पालक म्हणून तयारी व्हावी.९. शाळेत येताना मूल हसत येईल आणि दुसऱ्यादिवशी ते पुन्हा फुलपाखराप्रमाणे उडत-बागडत शाळेत येण्यासाठी तयार होईल, असं उत्साही वातावरण शाळेत असावं आणि घरीही. आपलं मूल आनंदाने शिकेल, असा विश्वास वाटावा, हेच तर पालक म्हणून आपण शोधत असतो. थोडे प्रयत्न केले तर ते नक्की सापडेल!(लेखिका शिक्षणा फाउंडेशनच्या दौंड तालुका समन्वयक आहेत.)kharadesuvarna9@gmail.com

टॅग्स :शाळाकोरोना वायरस बातम्याशिक्षण