Join us  

अक्षय कुमार म्हणतो, 'मातीचा सहवास - निसर्गात मस्ती मुलांना द्याल की नाही?' - पालक म्हणून, तुम्ही काय देता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 4:48 PM

मुलांना निसर्गात फिरण्याचा आनंद देण्याची मजाच और...मॉलमध्ये फिरवण्यापेक्षा ते केव्हाही चांगले

ठळक मुद्देमुलांना कृत्रिम गोष्टींपेक्षा निसर्गाचा अनुभव देणे जास्त गरजेचे शहरीकरणात वाढणाऱ्या मुलांनी निसर्गात रमायला हवे

आमच्या लहानपणी असं होतं, आम्ही मोबाइलमध्ये रमण्यापेक्षा अमुक गोष्टीत रमत होतो असे आपल्या पालकांडून आपल्याला कायम ऐकू येते. आताची पिढी अशी, आताची पिढी तशी हे सांगताना त्यांनी ज्या गोष्टींचा आनंद घेतला तो आपण घेत नाही याची खंत त्यांच्या सांगण्यात असते. गावाकडे अंगणात मातीत खेळणे, गुराढोरांना खायला घालण्यातली मजा घेणे, गारेगार वाऱ्यांतून गावभर भटकणे, नदीच्या पाण्यांमध्ये उड्या मारुन मनसोक्त डुंबणे यांसारख्या गोष्टींचा आनंदाला आपल्यातील अनेक जण मुकले.  मात्र आजही आपण काही गोष्टींच्या माध्यमातून आपल्या मुलांना हा आनंद देऊ शकतो. मॉलमध्ये किंवा प्ले झोनमध्ये नेऊन खेळवण्यापेक्षा त्यांना निसर्गात रमवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सांगतो. नुकतेच अक्षयने आपली मुलगी नितारा हिच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये अक्षय मुलगी नितारासोबत एका गायीला चारा खायला घालताना दिसत आहे. अक्षय आपल्या कुटुंबासोबत रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात फिरायला गेला आहे. यावेळी तो आपली मुलगी नितारा हिच्यासोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. आधी अक्षय गायीला आपल्या हाताने खायला घालतो आणि तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवतो. त्यानंतर तो नितारालाही तसे करायला सांगतो पण ती घाबरत असल्याचे दिसते. नितारा गायीच्या जवळ जायला घाबरत असून तो तिची भिती घालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. या पोस्टला कॅप्शन देताना अक्षय म्हणतो, “मातीचा सुगंध, गायीला चारा देणे, झाडांमधून येणारी थंडगार हवा या गोष्टींचा अनुभव आपल्या मुलांना देणे यात वेगळाच आनंद आहे. आता उद्या जंगलातला वाघ दिसायला हवा, म्हणजे सोने पे सुहागा अशा भावना अक्षयने व्यक्त केल्या आहेत. अतिशय सुंदर अशा रणथंबोरला भेट देत आहोत, अशा सुंदर जागा तयार करण्यासाठी देवाचे रोज आभार मानायला हवेत.”

२४ तासांच्या आत अक्षयच्या या पोस्टला १४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी त्याच्या या पोस्टला आपल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले आहे. अक्षय नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. आपल्या कौटुंबिक गोष्टी तो बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर मांडत असतो. सोशल मीडियावर त्याचे मोठे फॅन फॉलोइंग असून त्याच्या पो्स्टना भरपूर रिस्पॉन्स मिळताना दिसतो. त्यामुळे पालक म्हणून आपण मुलांना नेमका कोणत्या प्रकारचा आनंद देतो हा प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवा. मुलांना मॉलमध्ये किंवा गेमिंग झोनमध्ये आणि मोबाइलमध्ये रमवण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सानिध्यात रमवणे केव्हाही चांगले असचे अक्षयला यातून सांगायचे असेल. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. मुलगा आरव आता लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंअक्षय कुमारट्विंकल खन्ना