-सायली कुलकर्णी
मुलांची संख्या, जन्मक्रम या घटकांचा मुलांच्या विकासावर होणारा परिणाम याबाबत विशेष संशोधन करण्यात जगभरातील डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीस्ट्सना विशेष रस असलेला दिसून येतो. त्यामुळेच याबाबतची अनेक संशोधने आजही नव्याने केली जात आहेत. संशोधनातून समोर आलेल्या फॅक्ट्स, त्याबाबतचे विविध विचार प्रवाह, मुलांबरोबर वाढत असताना पालकांची नेमकी भूमिका आणि घरात एकच मूल असणं या साऱ्यातून काही गोष्टी ठळकपणे दिसतात. गेल्या काही दशकांत भारतातही अनेक घरांमध्ये एकच मूल होऊ देण्याकडे जोडप्यांचा कल असल्याचे दिसून येते. मुलांना क्वालिटी ऑफ लाइफ देणं, आर्थिक गणितांची सांगड बसवणं, मुलांना सांभाळायची व्यवस्था, वैद्यकीय स्थिती, वेळेचा अभाव ही आणि अशी अनेक कारणं असल्यानं जोडपी एकच मूल हवं या निर्णयाप्रत येतात. मात्र, एकच मुलं असणं योग्य की अयोग्य याबाबतही अनेक मतं दिसतात.
(Image : google)
मात्र, याबाबत मानसशास्त्रीय विचार प्रवाह नेमके काय सांगतात?
१. सन १९६८मध्ये अलफ्रेड या मानसोपचारतज्ज्ञाने द न्यूयॉर्क टाइम्समध्ये ‘द ओन्ली चाइल्ड सिंड्रोम’ ही थिअरी मांडली आणि या विषयावर चर्चा सुरू झाली. या थिअरीनुसार एकुलते एक मूल हे लाडावलेले, फक्त आणि फक्त कौतुकाचीच अपेक्षा करणारे, सोशल स्किल्सचा अभाव असलेले, टीका हाताळू न शकणारे अशा नकारात्मक गोष्टी असणारे असते, असे चित्र मांडण्यात आले. याकाळात या मताचा एवढा पगडा लोकांवर होता, की एकुलते एक मूल म्हणजे ‘मानसिक आजार’ असेही समजले जायचे. हा प्रभाव पुढील काही दशके टिकून राहिलेला दिसून येतो.२. पुढे टेक्सास युनिव्हर्सिटीमधील सामाजिक मानसशास्त्रज्ञ टोनी फाल्बो हिने ‘ओन्ली चाइल्ड’ या विषयावर आधारित ५०० संशोधनांचा चिकित्सात्मक अभ्यास केला. एकुलते एक मूल आणि भावंडांसोबत वाढलेले मूल यांच्यात भावनिक स्थिरता, औदार्य, लोकप्रियता, समायोजन, मॅच्युरिटी यात नेमका काय फरक जाणवतो, याचा अभ्यास तिने केला. आश्चर्य म्हणजे टोनीला या संशोधनात एकुलते एक मूल आणि भावंडांसोबत वाढलेले मूल यांच्यात वरील घटकांबाबत कोणताही लक्षणीय फरक आढळला नाही.३. उलट तिला एकुलत्या एक मुलांची शैक्षणिक प्रगती-प्रेरणा ही भावंडं असणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त असल्याचे आढळले. त्यांचे आई-वडिलांशी असणारे बंध अधिक घट्ट, मित्रत्वाचे असल्याचे दिसून आले.४. एकंदरीतच अनेक संशोधनांमधून एकुलत्या एक मुलांची पुढील काही ठळक गुणवैशिष्ट्ये दिसून आली आहेत.५. एकुलती एक मुले एकटी, कमी शेअर करणारी, ममाज् बॉय, हळवी, सामाजिकीकरणाची कमतरता असलेली आदी नकारात्मक गुणवैशिष्ट्ये असणारी असतात; पण त्याचबरोबर स्वावलंबी, स्वयंपूर्ण, अधिक फोकस्ड प्रेरणा असलेली, आई-वडिलांशी अधिक घट्ट बंध असणारी, निष्ठावंत मित्रत्व संबंध जपणारीही असतात. अशी सकारात्मक गुणवैशिष्ट्येही त्यांना आढळली.
(Image : google)
६. अर्थातच मुलांची संख्या हा एकमेव घटक त्यांचे व्यक्तिमत्त्व तयार होण्यास कारणीभूत नसतो तर पेरेंटिंग स्टाइल, संधीची उपलब्धता, कौटुंबिक परस्पर संबंध यासह अनेक घटकांचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो, हे विसरून चालणार नाही.७. एकुलते एक असल्याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये सकारात्मक गुणवैशिष्ट्यांच्या सोबत काही नकारात्मक गुणवैशिष्ट्येही आढळतात, असे गृहीत धरल्यास ती कमी करण्यासाठी पालक काही पावले उचलू शकतील का? केवळ एकुलत्या एक मुलांबाबतच असे गुणदोष दिसतात की, दोन मुले असली तरीही काही प्रमाणात ही वैशिष्ट्ये आढळण्याची शक्यता आहे, हादेखील आगामी संशोधनाचा विषय असू शकतो.एकच मूल असलेल्या पालकांनी काय करावं?१. मुलांना त्यांच्या समवयस्कांना (मित्रमंडळी, चुलत-मावस-आत्ये भावंडे) भेटण्याची, बोलण्याची, खेळण्याची, सोबत राहण्याची संधी आवर्जून उपलब्ध करून घ्यायला हवी.२. ‘प्ले डेट्स’ अर्थातच एकत्र खेळण्याला, आंतरक्रिया करायला वाव द्यायला हवा. मित्रही हवेत.३. मुलांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळायला हवी.४. त्यासाठी मुलांच्या मित्रमंडळींना घरी खेळायला बोलावणे, एकत्र बागेत जाणे किंवा फिरायला घेऊन जाणे.५. मुलं आणि त्यांच्या मित्रमंडळींसोबत बालनाट्य पाहणे. खेळाची प्रत्यक्ष मॅच पाहणे, सोबत एन्जॉय करणे.६. मुलांच्या खेळावर लक्ष असू द्या, (मोकाट नको); पण इंटरफेअरन्स कटाक्षाने टाळा.७. डोंगरावर जाणे, पिकनिक, ट्रेक्स, प्रदर्शन अशा ॲक्टिव्हिटीज आवश्यक आहेत.८. पॉटलक, एकत्र जेवण याचाही आस्वाद घ्या.९. अर्थात अती काहीच नको. या सर्व गोष्टी अधूनमधून असू द्या. त्यावरील अवलंबितता टाळा, त्या मागचा हेतू लक्षात असू द्या.१०. मुलांना आंतरक्रियेला वाव देणाऱ्या यथायोग्य अशा जबाबदाऱ्या द्या. त्यासाठी सेवाकार्य हा एक उत्तम पर्याय आहे.
(Image : google)
११. मुलांमधील सामाजिकीकरणाची कमतरता भरून काढण्यासाठी हे आणि असे उपाय सांगता येतील.१२. मुलांना अधूनमधून नकार ऐकण्याची सवय असू द्या. त्यांच्या अनाठायी मागण्यांना स्पष्टपणे, लॉजिकली व त्यांच्या मतांचा आदर ठेवत नकार द्या.१३. हार स्वीकारण्याची व पचवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करा. त्यासाठी त्यांना लुझिंग अ गेम, वेटिंग फॉर अ टर्न यांसारखे अनुभव द्या.१४. प्रोटेक्शन आणि ओव्हर प्रोटेक्शन यातील फरक लक्षात घ्या. ओव्हर प्रोटेक्शन टाळा.१५. घरातील नियमांच्या बाबत स्पष्ट सीमा अर्थातच क्लिअर बाउंड्रीज सेट करा.१६. हळवेपणाला संवेदनशीलतेमध्ये बदलण्यासाठी त्यांना भावनिक कौशल्य शिकवा.१७. मुलांना वेळीच वेळ द्या.१८. मुलांसोबतच्या ‘लोनली टू लकी’ या आधुनिक पालकत्वाच्या प्रवासास शुभेच्छा.(लेेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)