सायली कुलकर्णी (सायकॉलॉजिस्ट)
कोणत्याही पालकाला आपल्या मुलाने यशस्वी व्हावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यासाठी मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी पालक प्रयत्नही करत असतात. मात्र मुलांच्या भवितव्याचा मार्ग सुलभ, सुखकर व्हावा यासाठी त्यांना मदत करणे आणि त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊच नये यासाठी सतत तत्पर रहाणे यात फरक आहे. याच आधारावर सध्याच्या मॉडर्न पालकत्वाच्या युगात नव्यानं रूढ होत चाललेली एक पालकत्व शैली म्हणजेच 'बुलडोझर पेरेंटिंग'. बुलडोझर जसे रस्त्यातील अडथळे दूर करत पुढे जातो तसेच हेही पालक मुलांच्या आयुष्यातील छोटे-मोठे अडथळे दूर करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पालकांचे हे वागणे अगदी केजी ते पीजी वयोगटासाठी लागू असल्याचे दिसते.
(Image :google)
हे बुलडोझर पालक नेमके असतात तरी कसे?
१.बुलडोझर पालक हे मुलांच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम येऊच नये यासाठी सतत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत इनव्हाँल्व होतात.
२. मुलांचे अगदी छोट्यातल्या छोटे प्रॉब्लेम ते आधीच सोडवतात.
३. असे पालक मुलांना सतत प्रोटेक्ट करतात.
४. हे पालक मुलांचे शिक्षक, कोच यांनाही सतत अडथळ्यांबाबत सूचित करतात.
५. मुलांचे भविष्य, मुलांचे यश, त्यासाठीची स्ट्रॅटेजी याच विषयी सतत विचार करतात.
६.मुलांच्या मित्रांच्या बरोबरच्या भांडणात हे मुलांच्या आधी पुढे सरसावतात.
७. मुलं वस्तू विसरतील या भीतीने ते मुलांची दप्तरे भरतात. मुले मोठी झाली तरीही..
८. असे पालक मुलांना कोणतीही भौतिक सेवा देण्यात मागे पडत नाहीत.
९. मुलांनी कोणतीही गोष्ट मागण्या आधीच ती पुरवण्याकडे यांचा कल असतो.
१०. असे पालक मुलांसाठीची ध्येये आपण स्वतःच ठरवतात.
११. हे पालक मुलांना अनावश्यक व अति प्रमाणात सोयी सुविधा पुरवतात.
१२. परीक्षेतील गुणांना, फक्त आणि फक्त यशालाच असे पालक अनावश्यक महत्त्व देतात.
१३. मुलांच्या पुढे प्रश्नच उभे राहू नयेत यासाठी आधीच त्या प्रश्नांची उत्तरे शोधतात.
१४. असे पालक आपल्या धावपळीच्या जीवनातील वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट्स वापरतात, रेडिमेड पॉलिसीज देऊ करतात. इत्यादी…
(Image :google)
आता बघा, तुम्ही बुलडोजर पॅरेण्ट आहात का? आणि असाल तर ते योग्य आहे का?
पालकांचे हे असे वागणे आपल्याला सर्वसामान्यतः अतिशयोक्ती वाटले तरी अशा पालकांना मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी ते आवश्यक वाटते. बघा हं, जर एखाद्या फुलपाखराला कोषातून बाहेर पडण्यासाठी मदत केली गेली तर ते उडू शकेल का हो? नाही, मुळीच नाही. फुलपाखराला उडण्यासाठी त्याच्या पंखामध्ये ताकदीची गरज असते. कोषातून बाहेर पडत असताना जो संघर्ष फुलपाखरू करते तोच संघर्ष पुढे जाऊन त्याच्या पंखांना उडण्याची ताकद देतो. मग याच दाखल्याचा मुलांच्या बाबत विचार करता या अशा बुलडोझर पालकत्व शैलीमुळे मुलं खरंच यशस्वी, मानसिक दृष्ट्या सक्षम होत असतील का हो? नक्कीच नाही.
वरवर पाहत बुलडोझर पेरेंट मुलांच्या भविष्याचा विचार करत आहेत असे त्यांना वाटत असले तरी बहुतेकदा ते मुलांच्या शॉर्टटर्म, नजीकच्या भविष्यासाठी पाऊले उचलत असतात.
(Image :google)
त्यामुळे मुलांचा काय होतं?
१. या मुलांमध्ये निर्णयक्षमता विकसित होत नाही.
२. ही मुले मानसिकदृष्ट्या दुबळी निपजतात.
३. अशी मुले समस्येचा परिहारात्मक म्हणजेच सोडवण्याच्या दृष्टीने विचार करू शकत नाहीत.
४. या मुलांचा AQ adversity quotient विकसित होत नाही.
५. अशी मुले प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम बनत नाहीत.
६.आव्हानात्मक व ताणजन्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स यांच्यामध्ये विकसित होत नाहीत.
७. अशी मुले अपयशाने खचून जातात.
८. ही मुले नकाराचा सामना करु शकत नाहीत.
९. या मुलांना अपयशाचा अनुभव नसल्याने छोट्या छोट्या अपयशांमुळे त्यांना मानसिक अस्वस्थतेला, उद्रेकाला सामोरे जावे लागते.
१०. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की पुढे जाऊन या मुलांना बरेचदा एन्झायटी डिसऑर्डर ला सामोरे जावे लागते.
मग करायचे काय?
मुलांमध्ये स्वावलंबन आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पालकांची नेमकी भूमिका काय असावी?
१. यशापयशा बद्दलच्या पालक म्हणून तुमच्या संकल्पनांवर पुन्हा नव्यानं विचार करा.
२. मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी संधी द्या.
३. मुलांना त्यांचे प्रश्न हाताळू द्या.
४. मुलांना नकार, अपयश यांना सामोरे जाऊ द्या.
५. आयुष्यातील प्रश्नांची रेडीमेड उत्तरे देण्यापेक्षा ती शोधत असताना मुलांना साथ द्या.
६. पराभवाला सामोरे जाणे, त्यावर मात करण्याची कौशल्ये मुलांना शिकवा.
७. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करा.
८. मुलांना वयानुरूप जबाबदाऱ्या द्या.
९. मुलांच्या चुका सहजपणे स्वीकारा आणि त्यांना त्या स्वीकारण्यासाठी मदत करा.
१०. चुकणं साहजिक आहे पण त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचा आहे हे मुलांना तुमच्या वागण्यातून समजू द्या.
११. फायनल रिझल्ट बरोबरीने मुलांना प्रक्रियेचा, प्रोसेसचा आनंद घ्यायला शिकवा.
१२. इनवाँलमेन्ट आणि ओव्हर-इनवाँलमेन्ट यांच्यातली नेमका फरक लक्षात घ्या.
१३. बी अ 'बिग पिक्चर' पेरेंट. अर्थातच छोट्या यशापेक्षा मुले आपल्या आयुष्यात यशस्वी, समाधानी कशी होतील यावर भर द्या. तुमच्या मुलांच्या 'सुंदर फुलपाखरु होण्याच्या' या प्रवासास अनेक शुभेच्छा..
(लेखिका पुणेस्थित सायकॉलॉजिस्ट आहेत.)