- डॉ. श्रुती पानसेअरे, हा साहिल बघ, मघापासून अभ्यासाचं नाटक करत बसलाय. विज्ञानाचं पुस्तक हातात आहे. डोळे पुस्तकातल्या ओळींवर आहेत; पण शब्द पुढेच सरकत नाहीये. जागच्या जागी नजर थिजली आहे. झोप लागली म्हणावं तर तसंही नाही. साहिल, अरे काय करतो आहेस? कुठे आहे लक्ष?' - त्याच्या मेंदूनं त्याला आतूनच हलवलं. साहिल एकदम भानावर आला.साहिलने डोळे चोळले. आपल्याला झोप लागली होती की काय? नाही नाही. झोप लागून कसं चालेल? आजचा अभ्यास आज संपायलाच पाहिजे.
साहिलने पुन्हा वाचायला सुरुवात केली. पाचव्याच मिनिटाला जांभया यायला सुरुवात झाली त्या थांबेचनात. मग मात्र तो उठला. खोलीतल्या खोलीत फिरला. पाणी पिऊन, चेहऱ्यावर पाणी मारून खिडकीतून पाच मिनिटं बाहेर बघत बसला. त्यानंतर पुन्हा वाचायला सुरुवात केली. झोप येऊ नये म्हणून फरशीवर बसला.आता मात्र पंधरा वीस मिनिटं चांगला अभ्यास झाला. तो काय वाचत होता ते त्याला समजत होतं. गेला तासभर वाया गेला होता, तो सगळा वेळ या नंतरच्या अभ्यासानं भरून निघाला.
(Image :google)असं का होतं?१. तुम्ही म्हणाल, हा तर आमचा रोजचा अनुभव. अनेकदा कंटाळा येतो. खूप खूप कंटाळा येतो, अभ्यासाचा.२. कंटाळा नेमका कशाने जातो? पहिली गोष्ट म्हणजे, चालल्यामुळे शरीराची हालचाल झाली. जरासं चाललं - फिरलं की मेंदूला ऑक्सिजन मिळतो. फिरल्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना ऑक्सिजन मिळतो. शरीरात उत्साह निर्माण होतो. ३. एक साधीशी गोष्ट केली तरी छान वाटतं. इथे चाललं, पळलं, उड्या मारल्या, तर जास्तच छान वाटेल. अजून उत्साही वाटतं.४. दुसरी गोष्ट म्हणजे, पुस्तक वाचताना आपली दृष्टी फार लांब जात नाही. त्यामुळे डोळ्यांवर एक प्रकारे ताण येतो. सारखं असं कमी अंतरावरची वस्तू बघत बसणं डोळ्यांसाठी चुकीचं असतं. तिथून उठून साहिलने खिडकीतून बाहेर बघितलं. त्यामुळे त्याची दृष्टी लांबवर गेली. डोळ्यांवरचा ताण काहीसा कमी झाला. खिडकीतून बाहेर बघितलं, हिरवी झाडं, निळं आकाश बघितलं की या शांत रंगांमुळे डोळे सुखावतात. एक दोन वेळा डोळे हलकेच मिटून उघडले की डोळ्यांच्या आसपासच्या नसांना व्यायाम मिळतो.
५. तिसरी गोष्ट म्हणजे, पाण्याचा उपयोग. पाणी आपला मूड बदलून टाकतं. दमायला झालं, कंटाळा आला असताना पाणी प्यायलं की शरीराला ताजंतवानं वाटतं. खरं तर आपण फक्त तहान लागली की पाणी पितो. किंवा आपल्याला वाटतं की जेव्हा आपण खूप शारीरिक श्रम करतो, तेव्हा घशाला कोरड पडते, तेव्हा पाणी प्यायला पाहिजे. पण खरं तर विचार करत असताना, पाठ करत असताना, एखादी गोष्ट समजून घेताना, आकलन करून घेताना, मेंदू पाणी वापरत असतो. अशा वेळी पुन्हा पुन्हा थोडं थोडं पाणी पीत राहावं, ते अभ्यासासाठी खूपच चांगलं असतं.६. कंटाळा आलेला असतानाही तसाच अभ्यास रेटला तर मग वेळ वाया जातो, कष्ट वाया जातात आणि अभ्यास तर लक्षात राहातच नाही. तेव्हा आपल्या मेंदूला आलेला कंटाळा घालवण्याचे सोपे उपाय करुन मन लावून अभ्यास करता येतो, हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल!
(लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)ishruti2@gmail.com