Join us  

पालक म्हणून तुम्ही मुलांशी चांगलं वागता की वाईट? घ्या ही सोपी टेस्ट.. बघा पास की...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 7:40 PM

कोणीतरी दुसऱ्यानं तुम्ही तुमच्या मुलांशी जे वागता बोलता ते चुकीचं हे सांगण्याआधी पालकत्वात होणऱ्या चुका आपल्या आपण ओळखण्याचे / तपासण्याचे मार्गही आहेत.

ठळक मुद्देछोट्या मोठ्या प्रत्येक चुकीसाठी मुलांना शिक्षा करणं.पालकांच्या सततच्या ओरडण्यानं मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.मुलांवर सतत टीका केल्यानं मुलं प्रयत्न करण्यात कमी पडतात.

पालक म्हणून आपण मुलांशी जसं वागतो, बोलतो ते बरोबरच असं प्रत्येक आईबाबांना वाटतं. पालकांचा हेतू मुलांचं भलं व्हावं हा असला तरी पालकांचं वर्तन मुलांच्या मनसिकतेवर खोलवर परिणाम करतं. कोणीतरी दुसऱ्यानं तुम्ही तुमच्या मुलांशी जे वागता बोलता ते चुकीचं हे सांगण्याआधी पालकत्वात होणऱ्या  चुका  आपल्या आपण ओळखण्याचे / तपासण्याचे मार्गही आहेत. पालकत्व आणि मुलांचा मानसिक विकास यावर झालेला अभ्यास पालकांकडून कोणत्या चुका जाणते अजाणतेपणातून होतात याकडे लक्ष वेधतो.

Image: Google

पालकत्वात काय चुकतं?

अभ्यास सांगतो की, पालकत्व/ पॅरेण्टिंग हे साधं काम नसून ते एक चॅलेंज आहे. कारण मुलांशी नातं घट्ट करताना त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करुन देणं, मुलांना वाढवताना मदत करताना थोडं आपल्या कलानं, थोडं मुलांच्या कलानं घेणं हे मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलताना काही चुका होतात. त्या वेळीच लक्षात आल्या तर दुरुस्त करता येतात. 

Image: Google

1. मूल चुकलं की ती चूक पुन्हा मुलांकडून होवू नये यासाठी मुलांन छोटया- मोठ्या प्रत्येक चुकीसाठी शिक्षा केली जाते. अभ्यास सांगतो की हे वागणं चूक आहे. चुकलं की आई बाबा शिक्षा करतात ही बाब मुलांच्या मनावर ठसल्यास दोन टोकाचे परिणाम झालेले अभ्यासकांना आढळले. एक तर मुलं घाबरट होतात किंवा सततच्या शिक्षा भोगून कोडगी होतात. 

Image: Google

2. मुलांचं चुकल्यास आजूबाजूला कोणी आहे नाही याचं भान न बाळगता मुलांवर ओरडणं, त्यांना घालून पाडून बोलणं यामुळे मुलांचा स्वाभिमान दुखावतो. मुलांमध्ये स्वत:विषयी न्यूनगंड आणि पालकांबद्दल राग निर्माण होतो. 

Image: Google

3. वागताना- बोलताना मुलांनी चुका केल्यास , खेळात, अभ्यासात मुलं मागे पडल्यास त्यांच्यावर टीका करणं, सतत त्यांच्या चुका दाखवणं यामुळे मुलं दुखावतात. अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, की मुलं चुकल्यास त्यांच्यावर टीका न करता मुलांना विश्वासात घेऊन ,त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना समजावून सांगितल्यास त्याचा चांगला परिणाम मुलांवर होतो. मुलांच्या विकासात पालकांच्या या कृतीचा फायदा झाल्याचं आढळून आलं आहे. मुलांवर सतत टीका केल्यानं मुलं प्रयत्न करण्यात कमी पडतात. परिणामांचा विचार करुन कृती करण्यास घाबरतात असं अभ्यासात आढळून आलं आहे. 

Image: Google

4. मुलांचं कौतुक केल्यास ते बिघडतात असा समज मनात धरुन अनेक पालक मुलांशी वागताना शिस्तीचा, नियमांचा आग्रह धरतात. पण अभ्यास सांगतो मूल शिस्तीनं, धाकानं नाही तर प्रेमानं वाढवलं तर त्याचा मुलांच्या मानसिक विकासासाठी फायदा होतो.  अभ्यासातले हे चार निष्कर्ष म्हणजे आपलं पालकत्व तपासण्याची छोटी टेस्ट आहे. ती करुन पाहा आणि आपण पास की नापास ते ठरवा..  

टॅग्स :पालकत्व