Join us  

मुलांचे फोटो येताजाता सोशल मीडियात शेअर करता? लाइक्ससाठी पालकांनी मुलांचा वापर करणं धोक्याचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2023 4:48 PM

मुलांचं खासगीपण जपायला नको का? मुलांचे फोटो सोशल मिडियात पालक शेअर करतात पण ते धोक्याचं कारण, पोलीस सांगतात.. (Don't be a sharent)

ठळक मुद्देआपल्या मुलांचे फोटो कधी कुठे वापरले जातील हे पालकांच्या हातात उरतं का?

#डोण्टबीअशॅरेण्ट नावाची एक मोहीम आसाम पोलिसांनी नुकतीच सोशल मीडियात जोरदार चालवली. पालकांचे जरा कान टोचले आणि पालकांना विचारले की तुम्ही ‘पॅरेण्ट’ आहात की ‘शॅरेण्ट’? आता शॅरेण्ट म्हणजे काय तर आपल्या मुलांविषयी, त्यांचे फोटो असे वाट्टेल ते सोशल मीडियात पोस्ट करणारे पालक. आसाम पोलिस अशा पालकांनाच सल्ला देतात की मुलांसाठी हे सारं काही बरं नाही. तुम्ही हे थांबवा. कारण मुलं म्हणजे काही पालकांनी सोशल मीडियात मिरवायची ट्रॉफी नव्हे. आपल्या मुलांविषयी सतत माहिती सांगून इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचे खटाटोपही बरे नव्हेत. हे सारं करताना पालक मुलांचे वाट्टेल तेवढे फोटो काढतात, त्यांचा इनोसन्सच संपवून टाकतात. मात्र त्यापुढे जाऊन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समाज माध्यमात मुलांचे फोटो, त्यांची खासगी माहिती टाकताना पालक स्वत:ला हा प्रश्न विचारतात का की, मुलांच्या खासगीपणाचं काय? त्यांना आपलं आयुष्य खासगी ठेवण्याचा अधिकार नाही का? त्यांना सांगायची असेल एखादी गोष्ट जगजाहीर तर ते भविष्यात सांगतीलही, पण पालकांनी सारं जगजाहीर करणं हे मुलांच्या खासगीपणावर अतिक्रमण नव्हे का?आणि त्याहून महत्त्वाचं आपल्या मुलांचे फोटो कधी कुठे वापरले जातील हे पालकांच्या हातात उरतं का?

असे सारे प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारावेत, असा त्या मोहिमेचा हेतू होता.हे प्रश्न आज साऱ्याच पालकांनी स्वत:ला विचारायला हवेत की आपण खरंच आपल्या मुलांचं खासगीपण चव्हाट्यावर ठेवतो आहोत का?आणि तसं करत असू तर पालक म्हणून चुकतोय आपण... 

टॅग्स :आसामपालकत्वलहान मुलं