डॉ. लीना मोहडीकर
आजच्या माध्यमांच्या जगात लहान मुलांचं लैंगिकता शिक्षण फार लवकर चालू होतं. विशेषतः गेल्या दोन वर्षात ‘ऑन लाइन’ हेच माध्यम सर्वांनाच स्वीकारावं लागलं होतं. त्यामुळे संगणकावर मुलं फक्त शालेय शिक्षण घेत आहेत की इतरही काही त्यांच्या वयाला न शोभणारं त्यांना दिसतय याबद्दल पालकांना खात्री वाटू शकत नाही. तंत्रज्ञानातील प्रगती चांगलीच आहे आणि आपण ती रोखू शकत नाही. पण मुलं जे बघतात त्याचा मुलपणावर काही वाईट परिणाम होऊ नये यासाठी त्यांना योग्य त्या शब्दात माहिती पुरवणं गरजेचं आहे. बालकांचा विचार करताना आपल्याला त्यांचे वेगळे गट करून मगच पुढील व्यक्तिमत्व शिक्षणाचा (त्यातच लैंगिकता शिक्षणाचा अंतर्भाव आहे) अभ्यासक्रम ठरवावा लागतो. याचा अर्थ लैंगिकता शिक्षण नावाचा स्वतंत्र विषय शिशू वर्गापासूनच असायला पाहिजे असं नाही. योग्य वयात मुलांना योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळायला हवी (Parenting Tips about How to talk to kids about Sexual Education).
१. बाल्यावस्था - जन्म ते ४ वर्ष
२. शैशवावस्था – ४ वर्ष ते ६ वर्ष
३. किशोरावस्था – ६ वर्ष ते १२ वर्ष
४. पौगंडावस्था – १२ वर्ष ते १८ वर्ष
या सर्व गटांमधली सीमारेषा अस्पष्ट असते, प्रत्येक मुलागणिक हे वय मागेपुढे होऊ शकते, हे सुद्धा लक्षात ठेवायला लागतं. लहान मुलांचं लैंगिक शिक्षण म्हणजे त्यांचे इतरांशी भावबंध, स्नेहबंध वाढवण्याच्या प्रवृत्ती जोपासण्याचं शिक्षण. त्यासाठी मुलांना स्वतःच्या लैंगिक अवयवांबद्दल घृणा, भीती, निर्माण होणार नाही असं घरातल्या इतरांचं वागणं हवं. शरीर स्वछतेबाबत आणि नैसर्गिक क्रियांबद्दल त्यांना वास्तव ज्ञान द्यायला पाहिजे. कुतुहलातून विचारलेल्या त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या बुद्धीची कुवत लक्षात घेऊन भीती किंवा न्युंनगंड निर्माण न करणारी उत्तरं अशावेळी देणं आवश्यक आहे.
मुलांकडे योग्य लक्ष पुरवलं गेलं, त्यांचे अती लाड किंवा अती धाक टाळणे, हट्टीपणा, रडकेपणा वाढणार नाही ही काळजी घेतली तर त्यांची मानसिक वाढ बळकट होते. मनाने खंबीर होणं हे मुलांच्या भावी कामजीवनासाठी चांगला पाया ठरतं. बालकातून जबाबदार माणूस निर्माण करण्याचं, घडवण्याचं शिक्षण म्हणजेच मुलांचं लैंगिक शिक्षण हे लक्षात ठेवावं. खरं तर विवाहपूर्व मार्गदर्शन करताना भावी पतीपत्नींना अनुरूपतेबद्दल आणि इतर अनेक बाबींबाबत विचार करायला, परस्परांशी मोकळेपणाने बोलायला आपण सांगतो. तसचं मूल झाल्यावर त्याच्यावर संस्कार कसे करायचे याबाबतची चर्चाही त्या दोघांच्यात घडायला हवी. बालकांना वयानुसार लैंगिक शिक्षण देण्याबाबतच्या मुद्यांचा उहापोह पुढील लेखांमध्ये..
(क्रमश:)
(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)