पालकत्व ही एक शिक्षण प्रक्रियाच आहे. मुलांना धाकात ठेवावे का, कितपत ठेवावे याबाबत अनेकदा पालकांच्या मनात शंका असतात. आपल्याला आपली मुले आत्मविश्वासू, जिद्दी आणि यशस्वी हवी असतात. त्यासाठी वेळोवेळी आपण त्यांना धाकात ठेवायचा प्रयत्न करतो. आपण तसे केले नाही तर ती हाताबाहेर जातील की काय अशी आपल्याला शंका असते. उत्तम पालकत्त्वाची अशी कोणतीही व्याख्या उपलब्ध नसून परिस्थितीनुसार प्रत्येक पालक आपल्या मुलाला योग्य गोष्टी शिकवत असतो. पालकत्त्वामध्ये प्रामुख्याने चार प्रकार पाहायला मिळतात. परवानगी देणारे, अधिकार गाजवणारे, दुर्लक्ष करणारे आणि हुकूमशाही गाजवणारे पालक.
आता हे चारही प्रकार समजून घेण्यासाठी प्रत्येक प्रकारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असतो ते पाहावे लागेल. परवानगी देणारे पालक आपल्या पाल्याला त्याचे निर्णय घ्यायला लावतात. यामुळे त्यांना फारसा ताण येत नाही आणि मुलांची निर्णयक्षमता वाढते. अधिकार गाजवणारे पालक म्हणजे ते मुलांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांसाठी काही नियम घालून देतात. यामध्ये पालक आणि मुलांमध्ये अतिशय मोकळा संवाद असतो. तर हुकूमशाही करणाऱे पालक हे कायम ड्रायव्हींग सीटवर असतात. ते आपल्या मुलांसाठी एकदम कडक नियम करतात आणि त्याप्रमाणेच त्यांना वागायला लावतात. तर दुर्लक्ष करणाऱ्या पालकांचे आपल्या मुलांकडे विशेष लक्षच नसते. त्यांना मुलांच्या भावनिक गरजांची जाणच नसते.
या सगळ्यात अधिकार गाजवणारे पालकत्व सर्वात उत्तम असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशाप्रकारच्या पालकांची मुले शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक, भावनिक आणि वागणूकीच्या दृष्टीने योग्य रितीने वाढतात. हे पालक आपल्या मुलांकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात पण त्यांच्यासमोर ते तशाप्रकारची उदाहरणेही ठेवतात. अशाप्रकारच्या पालकांची काही वैशिष्ट्ये समजून घेऊया...
१. या पालकांच्या अपेक्षा जास्त असतात, आपल्या पाल्याच्या भावनिक गरजांना ते प्रतिसाद देतात. २. मुलांशी वारंवार संवाद साधण्याची त्यांना गरज वाटते आणि मुलांच्या भावनांना ते कमी समजत नाहीत.३. नैसर्गिकपणे गोष्टी पार पडू देतात पण त्यातून आपल्या मुलाने योग्य तो धडा घ्यावा यासाठी ते मदत करतात.४. मूल विचार करु शकेल आणि तर्क मांडू शकेल अशा वातावरणाची निर्मिती करतात. ५. आपल्या मुलांच्या वाढीत हे पालक पूर्णपणे गुंतलेले असतात.
अधिकारयुक्त पालकत्व मानसोपचारतज्ज्ञांना जास्त चांगले वाटते कारण ते एखादी समस्या लक्षात येणे आणि ती सोडविणे यासाठी ते पाल्यांना मदत करतात. ते मर्यादा ठरवतात पण आपण म्हणतो म्हणून मुलांनी ते आणि तसेच करावे असे त्यांचे म्हणणे नसते. हे पालक मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्यास सांगतात आणि आपण नेमून दिलेल्या नियमांचे महत्त्व पटवून देतात.