Join us  

बाळाची जीभ पांढरी दिसते? काहीबाही उपाय टाळा, बघा डॉक्टर काय सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 1:22 PM

How To Clean Tongue Of A Baby : नवजात बाळाच्या जिभेच्या स्वच्छतेची काळजी घेणे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

नवजात बाळाची आपण अगदी नाजूक फुलाप्रमाणे काळजी घेतो. लहान बाळाच्या प्रत्येक अंगांची लक्षपूर्वक काळजी घेणे महत्वाचे असते. बाळाच्या शारीरिक स्वच्छतेपासून ते सभोवतालच्या स्वच्छतेकडेही आपण व्यवस्थित लक्ष देत असतो. सुरुवातीच्या काळात बाळाच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या सगळ्या वेळा आपण पाळतो. बाळ जन्मल्यानंतर किमान ६ ते ८ महिने बाहेरचे काहीच न खाता फक्त आईचे दूध पित असते. कित्येकांना बाळ केवळ आईचे दुध पित आहे म्हणून त्याच्या तोंडाची व जिभेची स्वच्छता करणे गरजेचे नाही असे वाटते. परंतु असे न करता वेळोवेळी बाळाचे तोंड व जीभ स्वच्छ करणे आवश्यक असते. नवजात बाळाची जीभ व तोंड स्वच्छ करणे हे वाटते तितके सोपे काम नसते. बाळाची जीभ स्वच्छ करण्यासाठी काय करता येईल? किंवा कसे करावे असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. बाळाची जीभ व तोंड स्वच्छ करण्यासाठी एक सोपा उपाय लक्षात ठेवू(How To Clean Tongue Of A Baby).

बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सुमित्रा मीना यांनी आपल्या babynamahq या इंस्टाग्राम पेजवरून बाळाची जीभ कशी स्वच्छ करावी याबद्दल एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. बाळाच्या ओरल केअर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा महत्वाचा व्हिडीओ पहा.  

बाळाची जीभ स्वच्छ करण्यासाठी सोपा उपाय... 

१. सर्वप्रथम तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवावे. २. स्वच्छ सूती कापड घ्या आणि ते कोमट पाण्यात भिजवा. ३. हे कापड तुमच्या बोटाला किंवा करंगळीला गुंडाळा.  ४. बाळाचे तोंड हळू हळू उघडा आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी तुमचे बोट आत न्या. ५. बोट तोंडात घातल्यानंतर ते हळूवारपणे जिभेवर वर्तुळाकार फिरवा.

काय काळजी घ्यावी... 

१. बाळाला खायला किंवा दूध पाजल्या नंतर तोंड व जीभ पूर्णपणे स्वच्छ करा आणि दिवसातून एकदा त्याची जीभ स्वच्छ करा.२. जबरदस्तीने जीभ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे बाळाला दुखापत होऊ शकते.३. लहान बाळाचे तोंड स्वच्छ करताना त्याच्या जिभेवर पांढरा थर आहे का ते पहा. हे ओरल थ्रश असू शकते. असे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.४. बाळाचे दात आल्यानंतर त्यांला तपासणीसाठी दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा. तसेच डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार फिंगर टूथब्रश किंवा टंग क्लीनर वापरा.

टॅग्स :पालकत्व