पुरुषप्रधान संस्कृती असल्याने मुलगी म्हणून आपल्याला समाजात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. पण अनेकदा घरातूनही मुलींना या लैंगिक भेदाचा सामना करताना कित्येक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. लहान वयापासूनच मुलींना घरात वेगळी वागणूक दिली जाते. सुरक्षेच्या नावाखाली त्यांना मर्यादा तर घातल्या जातातच पण एक चांगली बाई होण्यासाठी काय काय करावे लागते हे त्यांच्या मनावर चुकीच्या पद्धतीने बिंबवले जाते. चांगली बाई ही आधी चांगला माणूस असायला हवी पण हे सांगायला पालक खूप उशीर करतात आणि इतर गोष्टी तिच्या मनावर बिंबवत राहतात. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलींना अजिबात सांगू नयेत किंवा त्यांच्या मनावर ठसवू नयेत.
१. कुटुंबात महिलांना तडजोड करावी लागते
भारतीय संस्कृतीत महिला लग्नानंतर पतीच्या घरी जाते. त्यामुळे तिला त्या घराचा भाग होण्यासाठी थोडा वेळ लागतो. आपल्या आयुष्याची बसलेली घडी मोडून दुसरीकडे जाऊन नव्याने आयुष्य सुरु करताना तुला कुटुंबात तडजोड करावी लागेल असे मुलीला कायम सांगतिले जाते. पण ते चूक आहे. संसार आणि कुटुंब म्हटल्यावर तडजोड दोन्ही बाजुने व्हायला हवी. मुलीनेच कायम तडजोड करायची असा कुठेही नियम नसून असे सांगणे चुकीचे आहे.
२. स्वयंपाक शिक नाहीतर सासू म्हणेल आईनी काही शिकवलं नाही
अशाप्रकारची वाक्ये साधारणपणे आईकडून येतात. यामध्ये त्या केवळ आपली मुलगी किंवा सासूवर आरोप करत नाहीत. तर त्या स्वत:लाही यामध्ये विनाकारण दोष देतात. पण असे म्हणणे चुकीचे आहे.
३. नोकरी करु नको असे आम्ही म्हणत नाही, पण लग्न तर करावेच लागेल
मुलगी मोठी झाली, तिचे शिक्षण होत आले की ती करीयरच्यादृष्टीने चांगली नोकरी शोधते नाहीतर व्यवसाय करुन आपली स्वप्ने पूर्ण करत असते. अशावेळीच पालक या मुलीला तु नोकरी करु नको असे आम्ही म्हणत नाही पण लग्न तर करावेच लागेल असे ऐकवतात. पण ही पालकांची भावना असली तरी तुम्ही ती मुलीवर अशाप्रकारे लादू शकत नाही.
४. आपली प्रतिष्ठा तुझ्या हातात आहे
पालक म्हणून तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या मुलीच्या हातात नसून ती पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि या गोष्टीवर चर्चा करत असताना प्रतिष्ठा म्हणजे नेमके काय याबाबत आपल्याला स्पष्टता असायला हवी.
५. मोठ्यांना उलट उत्तरे देऊ नकोस
मोठे चुकत असतील तर त्याबाबत बोलणे यात काहीच गैर नाही. त्यामुळे अशाप्रकारे चघळून जुनी झालेली वाक्ये मुलांना सांगू नका. शांतपणे आणि विनम्रपणे आपल्याला पटत नसलेल्या गोष्टीबाबत मोठ्यांना सांगणे यात काहीच गैर नाही.
६. करीयर म्हणजेच सर्वस्व नाही
आपण आपल्या मुलीला भरपूर शिकवतो, तिने स्वत:च्या पायावर उभे राहावे म्हणून तिला पुरेसे सक्षम करतो. पण प्रत्यक्ष ती करीयर करत असते तेव्हा मात्र तिला ऐकवतो. पण अशाप्रकारे पालकांनी तिला करीयरवरुन ऐकवणे योग्य नाही.
७. डोन्ट बी डिमांडींग
तू सतत नवनवीन गोष्टींसाठी डिमांड म्हणजेच मागणी करु नकोस असे मुलींना सांगितले जाते. पण यापेक्षा एक चांगला व्यक्ती म्हणले तुला जे हवं ते माग
८. तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही
आज अनेक घरात मुलगीही मुलांच्या बरोबरीने कमावते. मात्र घरातील गोष्टींसाठी तिच्याकडून पैसे घेणे कमीपणाचे किंवा चुकीचे मानले जाते. त्यामुळे अशाप्रकरची वाक्ये तिला ऐकवली जातात.
९. तुझ्याएवढी असताना तुझ्या आईच्या पदरात दोन मुलं होती
हल्ली मुलींचे लग्न करण्याचे आणि पुढील गोष्टींचे वय बदलले आहे. शिक्षणामुळे मुली नोकरी, करीयर या गोष्टींना महत्त्व द्यायला लागल्या आहेत. त्यामुळे उशीला लग्न आणि मुलेही उशीरा असे होते. पण पालकांकडून मुलींना वारंवार हे ऐकवले जाते जे चुकीचे आहे.
१०. नवऱ्याला खूश ठेवणे ही तुझी जबाबदारी
आपल्या सोबतच्या व्यक्तीला खूश ठेवणे ही आपली जबाबदारी नाही तर इच्छा असायला हवी. आणि तो व्यक्ती जर आपल्यासोबत चांगला नसेल तर अशी इच्छा आपल्याला होणारच नाही. त्यामुळे मुलींशी काही वाक्ये बोलताना जपून, विचार करुन बोलायला हवीत.