Join us  

आईबाबांनी मुलांना चुकता द्यायला हवी 'जादू की झप्पी', तज्ज्ञ सांगतात, मिठी मारुन जवळ घेण्याचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 1:18 PM

Benefits of hugging your child daily : मुलांच्या मानसिक, भावनिक, बौद्धिक अशा सर्वांगीण विकासात ही मिठी महत्वाची भूमिका बजावू शकते.

मिठी मारणे हे प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. म्हणूनच आपण बऱ्याच दिवसांनी एखाद्या मित्र-मैत्रीणीला किंवा जवळच्या व्यक्तीला भेटलो की नकळत मिठी मारतो.वाटायला ही साधीशी गोष्ट असली तरी कामाच्या धावपळीत आपले त्याकडे दुर्लक्ष होते. एका मिठीमध्ये खूप मोठी जादू असते आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात हे माहित असूनही आपल्याला जवळच्या व्यक्तीला मिठी मारायचेही अनेकदा लक्षात येत नाही (Benefits of hugging your child daily). 

ही एक मिठी आपले आणि आपल्या मुलांमधले नाते घट्ट करण्यासाठी फार उपयुक्त ठरु शकते. मुलांच्या मानसिक, भावनिक, बौद्धिक अशा सर्वांगीण विकासात ही मिठी महत्वाची भूमिका बजावू शकते.आपल्या मुलांना रोज दिवसातून किमान एकदा तरी प्रेमाने मिठीत घेणे किती आवश्यक आहे, त्याचे फायदे काय याविषयी पालकत्व समुपदेशक रिद्धी देवरा यांनी काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत, ते कोणते समजून घेऊया.. 

काय आहेत मुलांना मिठी मारण्याचे फायदे..

(Image : Google)

१. भावनिक सुरक्षा : तुमची एक प्रेमाची मिठी मुलांना सुरक्षितता आणि प्रेमाची भावना देते, त्यांना त्यांच्या सभोवताली सुरक्षित वाटण्यास मदत करते.

२. बाँडिंग : मिठी मारल्याने तुमच्या नात्यातील शारीरिक स्नेह, भावनिक बंध अधिक घट्ट होतो. या मिठीने आपल्यात एक मजबूत आणि विश्वासाचे नाते  निर्माण होण्यास मदत होते. 

३. तणावमुक्ती : मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन मेंदूतूव स्त्रवते. हा "प्रेम संप्रेरक" तणाव आणि चिंता दूर करतो, ज्यामुळे तुमच्या मुलाला अधिक आराम वाटतो.

(Image : Google)

४. आत्मसन्मान वाढवते: नियमित मिठी मारल्याने तुमचे मूल तुमच्यासाठी महत्वाचे आणि आवश्यक आहे अशी भावना वाढते आणि त्यामुळे  स्वाभाविकपणे त्यांचा आत्मसन्मान वाढतो. याचा मुलांच्या वाढीत आणि तुमच्या नात्यावर सकारात्मक परीणाम होतो.

५. भावनिक विकास : मिठी मारणे हे आपल्या मुलास त्यांच्या भावनांचे व्यवस्थापन कसे करावे आणि निरोगी मार्गाने कसे व्यक्त व्हावे हे शिकण्यास मदत करते. त्यामुळे वाटताना लहान वाटणारी ही क्रिया मुलांसाठी मात्र अतिशय उपयुक्त असते.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमानसिक आरोग्य