मुलांना खरं बोल असं शिकवणं सोपं, मात्र ते आपल्या मनातलं खरंच बोलले तर पालकांची पंचाईत होते. मुलं अडचणीत आणणारे प्रश्न विचारतातच पण अडचणीत आणणारं बोलतात, इतकं खरं पचवण्याची मोठ्यांची सवय मोडलेली असते. मात्र मोकळेपणानं -खरं बोलायला हिंमत लागले आणि मनाचा नितळपणाही, त्याबद्दल माझ्या लेकीचं कौतुक करू की काय करू हेच कळत नाहीये असं म्हणत एका आईने लेकीनं शाळेत सबमिट केलेला फीडबॅक फॉर्मच ट्विट केला आहे. ही गोष्ट तशी जुनी आहे. ती ही ऑस्ट्रेलियातली. पण आता ती पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.
मसॉन क्रॉस या महिलेनं हे ट्विट केलं आहे. तिच्या लेकीनला शाळेत फीडबॅक फॉमे भरुन द्यायला सांगण्यात आला होता. शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल काय वाटतं यासह एक प्रश्न होता, थिंग्ज माय टिचर्स कॅन डू बेटर..त्यावर या मुलीनं थेट लिहिलं की, साऱ्या वर्गालाच सामूहिक शिक्षा तुम्ही करता ते योग्य नव्हे. ज्यांनी काहीच केलेलं नसतं, ज्यांची काहीच चूक नसते त्यांनाही त्यामुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागते. बरं हे एवढंच लिहून ती थांबली नाही तर तिनं पुढे इतिहासाचा दाखल देत, स्मार्ट युक्तिवादही केला.
ती पुढे चक्क म्हणते जिनीव्हा कन्व्हेंशननुसार दोष नसलेल्या निरापराध माणसांना शिक्षा होणे हा वॉर क्राइम आहे. छोट्या मुलीने वर्गातल्या शिक्षेला युध्दजन्य गुन्ह्यापर्यंत पोहोचवलं. तिच्या आईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुलीचे हे म्हणणे पोस्ट केले आहे. मुलीने अशापद्धतीने शिक्षकांना रिमार्क दिल्यामुळे मी आता काय करु, लेकीला लपवू कुठं की हे सांगण्याचं धाडस केलं म्हणून भरपूर आईस्क्रीम खाऊ घालू? मुलांची खरं बोलण्याची ही हिंमत टिकवली पाहिजे, पालकांनी नाही का?