काजोल ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री. १९९० चा काळ काजोलने आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवला. त्यानंतरही वेगवेगळ्या भूमिकांमधून ती आपल्यासमोर आली. अभिनेता अजय देवगणशी लग्न केल्यानंतर या दोघांना १ मुलगा आणि १ मुलगी झाल्याने काजोल काही प्रमाणात संसारात रमल्याचे दिसले. बेधडक वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली काजोल नेहमीच आपले स्पष्ट मत मांडत असते. आई होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर काजोलने मातृत्त्वाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत काजोलने आपले स्पष्ट मत व्यक्त केले (Bollywood Actress Kajol talk about Motherhood).
यावेळी काजोल म्हणाली, प्रत्येक आई वेगळी असते आणि तिची आपल्या मुलांना वाढवण्याची पद्धतही वेगळी असते. कोणत्याही एका आईने दुसऱ्या एका आईला मातृत्त्वाबद्द्ल सल्ले देऊ नयेत. अगदी त्या आईच्या आईनेही असे सल्ले देणे चुकीचे असल्याचे काजोलचे म्हणणे आहे. आपल्या आजुबाजूला असे १०० लोक असतात जे एखाद्या आईला मला असं वाटतं किंवा हे माझं मत आहे असं करुन काही ना काही सांगत असतात. मला वाटतं तू असं केलं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे असं लोक वेगवेगळ्या रुपाने सांगत राहतात. पण इतर लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपल्याला आपल्या बाबतीत आणि आपल्या मुलांच्या बाबतीत जे योग्य वाटतं तेच आपण करायला हवं.
आपली परिस्थिती, आपल्या आणि मुलांच्या मर्यादा आणि क्षमता यांबाबत आपल्याला पुरेशी माहिती असते. त्यामुळे इतर कोणाचंही मत आपल्यासाठी महत्त्वाचं नसलं पाहिजे. आ पल्या किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत एखादी चुकीची गोष्ट झाली तरी त्यासाठी आपल्यावरच आरोप केले जातात. तसेच एखाद्या गोष्टीचे क्रेडीट द्यायचे वेळ आली तर तेही आपल्यालाच मिळणार असते. त्यामुळे आई म्हणून प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेऊन आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायला हवं असा अतिशय मोलाचा सल्ला काजोल या निमित्ताने देते.