Join us  

मुलगेही लवकर वयात येत आहेत, अकाली मोठं होणाऱ्या मुलांच्या गोंधळलेल्या शरीराला थ्रीलचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 6:41 PM

मुलग्यांचं मोठं होण्याचं वय हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. अर्धवट मोठं होण्याचे गंभीर परिणाम त्यांच्यावर सध्या दिसत आहेत.

ठळक मुद्दे. मुलं काय पाहतात, त्यावर काय विचार करतात, हे पालकांना सतत जाणून घ्यावं लागेल, शाळेमध्ये शिक्षकांनाही ते करावं लागेल.

प्रसाद मणेरीकर(शास्त्रीय शिक्षण, पालक मुलं समुपदेशन क्षेत्रात कार्यरत)वयात येऊ लागलेली म्हणजेच साधारणतः टीन एज मधली मुलं आणि त्यांचे प्रश्न याचं स्वरूप गेल्या काही काळामध्ये बदलू लागलं आहे. ते अधिक सामाजिक प्रश्न निर्माण करणारं, गंभीर होऊ लागलं आहे. याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत . एक म्हणजे त्यांचं वय, या वयात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल. दुसरं म्हणजे सध्याच्या जगात अनेक गोष्टींसाठी मिळणार अनिर्बंध असं एक्सपोजर. मुळात या दोन्ही गोष्टी आता मोठ्यांच्या हातातच नाहीत. वाढतं वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्रेरणा कुणी थांबवू शकत नाही आणि एक्सपोजरपासून दूर जाण्यासाठी कुठेतरी आडगावी जाऊन राहू शकत नाही. पण, मग करायचं काय?

या वयात होतं काय?१. एक म्हणजे मुलांचं वाढतं वय आणि त्यामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल. हे बदल ‘मोठं’ होऊ लागल्याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करतात. मुलांच्या मेंदूमध्ये बदल होतात, शरीर बदलायला लागतं, स्वतःच्या शरीराकडे आता ते 'वेगळ्या' नजरेने पाहायला लागतात. मुलं आणि मुली दोघांच्याही बाबतीमध्ये हे घडतं. भावनिक बदलही दिसायला लागतात. चिडचिड वाढते, आई-वडिलांनी सांगितलेलं पटेनासं होतं, घरात एकटं किंवा मित्र - मैत्रिणींसोबत राहायला आवडतं. मुलांच्या बोलण्यात मुलींबद्दलचे आणि मुलींच्या गप्पांमध्ये मुलांबद्दलचे विषय येऊ लागतात. मुलांच्या बोलण्यात शरीर स्वरुपाचे शब्द खूप येतात.२. मुलांचं मोठं होण्याचं वय आता हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. म्हणजेच साधारणतः पंधरा - वीस वर्षांपूर्वी जी ‘बायोलॉजिकल मॅच्युरिटी’ मुलांना असायची, ती आता अकराव्या आणि बाराव्या वयात यायला लागलेली आहे. म्हणजेच मुलं अर्धवट मोठी होऊ लागली आहेत.३. या वयात काहीतरी वेगळं थ्रिलिंग करावं, असं मुलांना वाटत असतं. त्यातून ते आनंद मिळवतात. मित्र - मैत्रिणींची चेष्टा करणं, त्यांना वेगवेगळी नावं ठेवणं, त्यांच्याशी पंगा घेणं, वर्गात शिक्षकांना नावं ठेवणं, स्वतःचा वेगळेपण सिद्ध करण्यासाठी म्हणून अशा गोष्टी करणे हे मुलांकडून व्हायला लागतं.

४. याच वयामध्ये नैसर्गिकपणे विरूद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं. त्यामुळे मुलांना आपली किती मुलींशी मैत्री आहे हे इतर मुलांमध्ये दाखवण्याची गरजही साहजिकच वाटायला लागते. त्यातून थ्रील आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी ते मिळवतात. शाळेत मुलींनी आपल्याकडे पाहावं, यासाठी अनेक गोष्टी करत राहतात. इतर मुलांकडून हेवा किंवा चेष्टारुपात त्याला खतपाणी मिळत राहातं.५. गेल्या काही काळामध्ये सोशल मीडियाचा अनिर्बंध स्वरुपामध्ये वापर मुलांकडून वाढला आहे. या माध्यमांतून अनेक प्रकारचा शारीरिक स्वरूपाचा मजकूर आणि व्हिडीओ सातत्याने सर्वांसमोर येत राहतो. मुलांसमोरही तो येतो. स्त्रियांसंदर्भात ज्या प्रकारची रील्स, फोटो या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात ते दुर्दैवाने या वयातल्या मुलांना जास्त आकर्षित करतात. मुलांमध्ये स्त्रीबद्दल असलेल्या आकर्षणाला या समाजमाध्यमांवरील गोष्टींमुळे अधिक प्रोत्साहन मिळतं. स्त्रीदेहाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुलांचा त्यामुळे बदलून जातो.

६. या वयात मुलांच्या भावना तीव्र असतात. त्यामुळे आपण जे करतोय, त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार मुलं फारशी करत नाहीत. ती भावनिकदृष्ट्या 'एक्साइटेड' असतात. त्यामुळे साहजिकच त्या भावनिक आवेगात अशा कृती मुलांकडून घडायला लागतात. कोणी करत असेल तर दुसरी मुलं ते एन्जॉय करतात.७. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये मुलांच्या मनातल्या या शरीरविषयक भावना योग्य प्रकारे मार्गस्थ करण्यासाठीची व्यवस्थाच आपण उभी करू शकलो नाही. आपला प्रामुख्याने कल त्या भावना दाबून टाकण्याकडे असल्यामुळे मुलांच्या बाबतीत त्या उसळी मारून बाहेर येतात. बहुतांश वेळा मुलांना यासाठी शिक्षा केली जात असल्यामुळे त्या भीतीमुळे लपून - छपून करण्याकडेच त्यांचा जास्त कल असतो.

पूर्वी ‘असे’ विषय नव्हते का?

तर असं अजिबात नाही, ते होते. पण त्याला मर्यादा होत्या. आज सोशल मीडियामुळे त्या मर्यादा संपलेल्या आहेत.साहजिकच मुलांना आपणही याच प्रकारचं काहीतरी थ्रीलिंग करावं की, ज्यामुळे ‘सोशल मीडिया’मधून प्रसिद्ध होऊ, हे वाटायला लागतं. कारण आजचं प्रभावी माध्यम ‘सोशल मीडिया’ आहे, हेच मुलं पाहात असतात. तिथे लाइक्स, व्ह्यूज मिळतात, याचं गारुड या वयातल्या मुलांवर पडतं.

काय करावं लागेल?मी जे काही मुलांसोबत काम केलंय आणि करतोय त्यातून जाणवलेल्या बाबी आपल्यासमोर ठेवतो. त्यातून आपल्याला प्रश्न सोडवायला मदत होईल.१. मुलांना योग्य वयात त्यांच्यामध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत ते समजावून द्यावे लागतील. केवळ लेक्चर देऊन आणि तांत्रिक माहितीने ते होणार नाही. (ती माहिती तशीही त्यांना आपल्यापेक्षा जास्त असते!) त्यांच्यामध्ये सामावून घेऊन मैत्रीतून त्यांच्यासोबत काम करावं लागेल.२. मुलं आणि मुली यांच्यामध्ये मैत्रीचं वातावरण राहील, एकमेकांसोबत विविध गोष्टी करतील, याची काळजी समाज म्हणून आणि शाळेमध्येही आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम जाणीवपूर्वक आणि सातत्याने करावे लागतील.३. सोशल मीडिया म्हणजे काय, तो कसा वापरायचा, कशासाठी वापरायचा, हे पालकांना / शिक्षकांना मुलांशी सतत बोलत राहावं लागेल. मुलं काय पाहतात, त्यावर काय विचार करतात, हे पालकांना सतत जाणून घ्यावं लागेल, शाळेमध्ये शिक्षकांनाही ते करावं लागेल.

४. मुलांना शिक्षा करणं हा पर्याय नाही. त्यातून मुलं जास्त आक्रमक होतील किंवा नकारात्मक विचार करू लागतील. ते जे करत आहेत त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव सातत्याने त्यांच्यामध्ये निर्माण करत राहावी लागेल.५. या वयात मुलांना जे थ्रील करावसं वाटतं, त्याच्यासाठीचे अनेक पर्याय मुलांसमोर उपलब्ध करावे लागतील. जसं की भरपूर खेळ, गिर्यारोहणासारखे उपक्रम, विविध प्रकारच्या स्वतःला सिद्ध करण्यासाठीच्या शालेय स्पर्धा, विविध प्रकल्प असतील, यामध्ये मुलांना सातत्याने सहभागी करावं लागेल.

pmanerikar@gmail.com 

टॅग्स :मुलांमध्ये तारुण्यशिक्षणआरोग्यपरिवारलहान मुलंपालकत्व