Join us  

म्हशीचं की गायीचं, मुलांसाठी कोणतं दूध जास्त पोषक? योग्य कोणतं, कसं ठरवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 2:05 PM

Cow vs Buffalo Milk Which is Better For Child : गाईच्या दूधातून जास्त पोषण मिळते की म्हशीच्या आणि दोन्हीमध्ये काय मुलभूत फरक असतो याविषयी समजून घेऊया...

ठळक मुद्देम्हशीचे दूध तुलनेने घट्ट असल्याने त्यापासून पनीर, चीज, दही, कुल्फी हे पदार्थ बनवले जातात. आपल्या मुलाची प्रकृती, त्याची आवड, शरीरयष्टी लक्षात घेऊन त्याला कोणते दूध योग्य ते निवडायला हवे

मुलं दूध पीत नाहीत म्हणून किंवा कधी मूल फक्त दूधच पितं आणि इतर काहीच खात नाही म्हणून तक्रार करणारे पालक आपल्या आजुबाजूला असतात. मुलांनी दोन्ही वेळेस नीट दूध प्यावं असा पालकांचा अट्टाहास असतो खरा पण मुलांना मात्र दूधापासून पळवाट शोधायची असते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ असे सगळेच घटक जास्त प्रमाणात असल्याने मुलांचे पोषण होण्यासाठी दूध अतिशय उपयुक्त असल्याने डॉक्टरही अनेकदा दूध पिण्याचा सल्ला देतात. (Cow vs Buffalo Milk Which is Better For Child) हे सगळे जरी खरे असले तरी मुलांना गरम दूध द्यावे की गार, कोणत्या वेळेला दूध प्यायलेले चांगले, तेही गायीचे असावे की म्हशीचे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. गाईच्या दूधातून जास्त पोषण मिळते की म्हशीच्या आणि दोन्हीमध्ये काय मुलभूत फरक असतो याविषयी समजून घेऊया...

(Image : Google)

१. फॅटसचे प्रमाण

गायीच्या दूधात फॅटसचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन कमी करायचे असेल किंवा स्निग्धता कमी हवी असेल तर गायीचे दूध केव्हाही चांगले. दुधामध्ये व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि रिबोफ्लेविन सारखे गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. गायीच्या दुधात ३ ते ४ टक्के फॅटस असतील तर म्हशीच्या दुधात याच फॅटसचं प्रमाण ७ ते ८ टक्के असतं. 

२. पाण्याचे प्रमाण 

गायीच्या दूधात पाण्याचे प्रमाण जास्त असते. मूल पाणी नीट पीत नसेल आणि त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर अशावेळी गायीचे दूध दिलेले केव्हाही चांगले. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते आणि पोटही साफ होते. 

३. प्रोटीन

लहान मुलांची वेगाने वाढ होत असल्याने त्यांच्या शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अशा सगळ्याच घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. म्हशीच्या दूधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने हाडांच्या बळकटीसाठी म्हशीचे दूध चांगले मानले जाते. 

(Image : Google)

४. कॅलरीजचे प्रमाण

म्हशीच्या दूधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेत कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांची ऊर्जा दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी म्हशीचे दूध फायदेशीर ठरते. म्हशीचे दूध तुलनेने घट्ट असल्याने त्यापासून पनीर, चीज, दही, कुल्फी हे पदार्थ बनवले जातात. तर गायीच्या दूधापासून रसगुल्ला, रसमलाई यांसारखे दुधाचे पदार्थ तयार केले जातात. 

मग मुलांसाठी कोणते दूध चांगले ? 

म्हशीचे दूध पचण्यासाठी जड असते, त्यामुळे शक्यतो मूल ५ ते ७ वर्षाचे असेपर्यंत त्याला गायीचे दूध दिलेले केव्हाही चांगले. म्हशीच्या दूधात स्निग्ध पदार्थ आणि कॅलरीज जास्त असल्याने ते पचायला जड असते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येण्याची शक्यता असते. मात्र मूल वजनाने कमी असेल किंवा वरचे अन्न नीट खात नसेल किंवा खात असल्यास त्याचे अन्नातून पुरेसे पोषण होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हशीचे दूध घ्यायला हरकत नाही. 

टॅग्स :पालकत्वदूधलहान मुलंआहार योजनाहेल्थ टिप्स